Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (92 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद


 

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2022

माझ्या प्रिय देशवासियांनो,

नमस्कार. या ऑगस्ट महिन्यात, तुमच्या सर्वांच्या पत्रांनी, संदेशांनी आणि कार्ड्सनी माझ्या कार्यालयाला अगदी तिरंगामय केले आहे. तिरंगा नसलेले किंवा तिरंग्याचा आणि स्वातंत्र्याचा उल्लेखनसलेले पत्र माझ्याकडे आल्याचे मला फारसे आठवत नाही. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या अमृत महोत्सवानिमित्त लहान मुलांनी आणियुवा मित्रमंडळींनी अनेक सुंदर चित्रे आणि कलाकृती पाठवल्या आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या महिन्यात आपल्या संपूर्ण देशभरात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात अमृत महोत्सवाची अमृतधाराबरसते आहे. अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्यदिनाच्या या विशेष प्रसंगी आपल्याला देशाच्या सामूहिक शक्तीचे दर्शन घडले आहे. चैतन्याची अनुभूती आपण अनुभवली आहे. आपला एवढा मोठा देश, एवढी विविधता, पण तिरंगा फडकवताना आपल्या सर्वांच्या मनात एकच भावना दाटून आल्याचे दिसत होते. तिरंग्याच्या गौरवाचे रक्षक म्हणून लोकांनी स्वत: पुढाकार घेतला. स्वच्छता मोहिम आणि लसीकरण मोहिम राबवतानाही आपण देशाचा हा उत्साह अनुभवला आहे. आता स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवात देशभक्तीची तीच भावना अनुभवायला मिळते आहे. आपल्या सैनिकांनी उंच पर्वतांच्या शिखरांवर, देशाच्या सीमांवर आणि समुद्राच्या मध्यभागी तिरंगा फडकवला. तिरंगा मोहिमेसाठी लोकांनी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण कल्पनाही राबवल्या. कृष्णील अनिल जीहे आपले युवा सहकारी, एक पझल आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी मोज़ॅक कलेच्या माध्यमातून विक्रमी वेळेत सुंदर तिरंगा तयार केला आहे. कर्नाटक मधील कोलार येथील लोकांनी 630 फूट लांब आणि 205 फूट रुंद तिरंगा हातात धरून एक अनोखा देखावा सादर केला. आसाममधील सरकारी कर्मचाऱ्यांनी दिघालीपुखुरी युद्ध स्मारकावर तिरंगा फडकवण्यासाठी स्वत:च्या हाताने 20 फुटांचा तिरंगा तयार केला, तर इंदूरमधील लोकांनी मानवी साखळीच्या माध्यमातून भारताचा नकाशा तयार केला. चंदीगडमधल्या तरुणाईनी महाकाय मानवी तिरंगा साकारला. या दोन्ही विक्रमांची नोंद गिनीज रेकॉर्डमध्ये झाली आहे. हिमाचल प्रदेशच्या गंगोट पंचायतीमध्ये अशा प्रकारचं एक मोठं प्रेरक उदाहरणही पाहायला मिळालं. या ठिकाणी पंचायतीच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्थलांतरित मजुरांच्या मुलांचा समावेश करण्यात आला होता.

 

मित्रांनो,

अमृत महोत्सवाचे हे रंग केवळ भारतातच नाही, तर जगातील इतर देशांमध्येही पाहायला मिळाले. बोत्सवाना येथे राहणाऱ्या स्थानिक गायकांनी भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी देशभक्तीपर 75 गाणी गायली. विशेष म्हणजे हिंदी, पंजाबी, गुजराती, बंगाली, आसामी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि संस्कृत या भाषांमध्ये ही 75 गाणी गायली गेली. दुसरीकडे नामिबियामध्ये भारत-नामिबिया यांच्यातील सांस्कृतिक-पारंपारिक संबंधांवर आधारित विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे.

 

मित्रांनो,

आणखी एक आनंदाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. काही दिवसांपूर्वीच मला भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. तिथे त्यांनी दूरदर्शनवरील स्वराजया मालिकेचे स्क्रीनिंग ठेवले होते. तो प्रीमियर पाहण्याची संधी मला मिळाली. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या पण दुर्लक्षित राहिलेल्या नायक-नायिकांच्या प्रयत्नांची ओळख, देशाच्या युवा पिढीला करून देण्याचा हा एक उत्तम उपक्रम आहे. हा कार्यक्रम दर रविवारी रात्री 9 वाजता दूरदर्शनवर प्रसारित होतो. तो 75 आठवडे चालणार असल्याचे मला सांगण्यात आले आहे. तुम्ही वेळात वेळ काढून हा कार्यक्रम स्वतः बघा आणि तुमच्या घरातल्या मुलांनाही दाखवा, अशी विनंती मी तुम्हाला करतो.  शाळा कॉलेजचे लोक तर हा कार्यक्रम रेकॉर्ड करू शकतात आणि  सोमवारी विद्यार्थ्यांना दाखवू शकतात जेणेकरून आपल्या देशात जागरुकता निर्माण होईल. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव पुढील वर्षापर्यंत म्हणजे ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा होणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या महानायकांची कहाणी अवघ्या देशापर्यंत पोहोचवावी यासाठी रेकॉर्ड केलेल्या कार्यक्रमावरून एक विशेष कार्यक्रमही तयार करू शकतात. देशासाठी, स्वातंत्र्यसैनिकांसाठी, जे लेखन- आयोजन आपण करत आलो आहोत, ते काम आपल्याला यापुढेही करत राहायचे आहे.

 

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

आपल्या पूर्वजांचे ज्ञान, आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी आणि आपल्या पूर्वजांचे चिंतन आजही किती महत्त्वाचे ठरते आहे, हे आपल्याला समजते, जेव्हा आपण त्याबद्दल सखोल माहिती मिळवतो, तेव्हा आपण आश्चर्याने थक्क होतो. आपला ऋग्वेद तर हजारो वर्ष जुना आहे. ऋग्वेदात म्हटले आहे,

ओमान-मापो मानुषी: अमृक्तम् धात तोकाय तनयाय शं यो: |

यूयं हिष्ठा भिषजो मातृतमा विश्वस्य स्थातु: जगतो जनित्री: ||

अर्थात् -हे पाण्या, तू मानवतेचा सर्वात चांगला मित्र आहेस. तूच जीवन देणारा आहेस, तुझ्यापासूनच अन्न तयार होते आणि तुझ्यापासूनच आमच्या मुलांचे कल्याण होते. तू आमचा रक्षक आहेस आणि आम्हाला सर्व वाईटांपासून दूर ठेवणारा आहेस. तूच सर्वश्रेष्ठ औषध आहेस आणि तूच या विश्वाचे पालनपोषण करणारा आहेस.

विचार करा, हजारो वर्षांपूर्वी आपल्या संस्कृतीत जल आणि जल संरक्षणाचे महत्त्व सांगितले गेले आहे. हे ज्ञान आजच्या संदर्भात पाहिले की आपण रोमांचित होतो, पण जेव्हा हेच ज्ञान, आपले राष्ट्र आपली ताकद म्हणून स्वीकारते तेव्हा त्याची क्षमता अनेक पटींनी वाढते. तुम्हाला आठवत असेल, चार महिन्यांपूर्वी मन की बातमध्ये मी अमृत सरोवराचा उल्लेख केला होता. त्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने जमवाजमव केली, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक लोक एकत्र आले आणि बघता-बघता अमृत सरोवराची उभारणी ही लोकचळवळ झाली आहे. जेव्हा देशासाठी काहीतरी करण्याची प्रखर भावना मनात असते, कर्तव्याची जाणीव असते, येणाऱ्या पिढ्यांची काळजी असते, तेव्हा बळही मिळते आणि संकल्प उदात्त होऊन जातो. तेलंगणामधील वारंगल इथल्या अशाच एका चांगल्या कामाबद्दलची माहिती मला मिळाली आहे. त्या ठिकाणी एक नवीन ग्रामपंचायत स्थापन झाली असून तिचे नाव मंगत्या-वाल्या थांडाअसे आहे. हे गाव वनक्षेत्रापासून जवळ आहे. या गावाजवळ एक अशी जागा होती, जिथे पावसाळ्यात भरपूर पाणी साचत असे. ग्रामस्थांच्या पुढाकाराने आता अमृत सरोवर अभियानांतर्गत ही जागा विकसित करण्यात येते आहे. यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या पावसामुळे हा तलाव पाण्याने काठोकाठ भरला आहे.

मध्य प्रदेशमध्ये मंडला येथील मोचा ग्रामपंचायतीत बांधलेल्या अमृत सरोवराबद्दलही मला तुम्हाला सांगायचे आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यानाजवळ हे अमृत सरोवर बांधण्यात आले असून त्यामुळे या परिसराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. उत्तर प्रदेशात ललितपूर येथे नव्याने बांधलेले शहीद भगतसिंग अमृत सरोवरही लोकांना आकर्षित करते आहे. इथल्या निवारी ग्रामपंचायतीत बांधलेल्या तलावाने 4 एकरक्षेत्र व्यापले आहे. या तलावाच्या काठावर वृक्षारोपण केल्यामुळे त्याची शोभा वाढली आहे. सरोवराजवळ उभारलेला 35 फूट उंच तिरंगा पाहण्यासाठी लोक दूरवरून येत आहेत. अमृत सरोवराची ही मोहीम कर्नाटकमध्येही जोरात सुरू आहे. तिथल्या बागलकोट जिल्ह्यात बिलकेरूर गावात लोकांनी अतिशय सुंदर असे अमृत सरोवर बांधले आहे. खरे तर या भागात डोंगरातून खाली येणाऱ्या पाण्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत असे, शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या पिकांचेही नुकसान होत असे. अमृत सरोवर बनवण्यासाठी गावातील लोकांनी डोंगरावरून येणारे सर्व पाणी, चर खोदून एका बाजूला वळवले. त्यामुळे या परिसरातला पुराचा प्रश्नही सुटला. अमृत सरोवर मोहिम आपल्या आजच्याच अनेक समस्या सोडवते असे नाही तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठीही ही मोहिम तितकीच आवश्यक आहे. या मोहिमेंतर्गत अनेक ठिकाणी जुन्या जलाशयांचाही कायापालट केला जातो आहे. जनावरांची तहान भागवण्यासाठी तसेच शेतीसाठी या अमृत सरोवरांचा उपयोग केला जात आहे. या तलावांमुळे आजूबाजूच्या परिसरातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर या परिसरात सगळीकडे हिरवळही वाढते आहे. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी लोक अमृत सरोवरात मत्स्यपालन करायच्या तयारीत आहेत. मी तुम्हा सर्वांना, विशेषत: माझ्या युवा सहकाऱ्यांना विनंती करतो की अमृत सरोवर मोहिमेत सक्रीय सहभाग घ्या आणि जलसंधारण आणि जलसंरक्षणासाठीच्या प्रयत्नांना बळ द्या, ते यशस्वी करून दाखवा.

 

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

आसाममधील बोंगई गावात एक रंजक प्रकल्प राबवला जात आहे – प्रकल्प संपूर्णा. कुपोषणाविरुद्ध लढा हा या प्रकल्पाचा उद्देश असून या लढ्याची पद्धतही अतिशय अभिनव आहे. या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्रातील एखाद्या सुदृढ बालकाची आई दर आठवड्याला एखादया कुपोषित बालकाच्या आईची भेट घेते आणि पोषणविषयक माहितीवर चर्चा करते. म्हणजेच एक आई दुसऱ्या आईची मैत्रीण होऊन तिला मदत करते, तिला शिकवते. या प्रकल्पाच्या मदतीने या भागात एका वर्षात 90 टक्क्यांपेक्षा जास्त बालकांचे कुपोषण दूर झाले आहे.

कुपोषण संपुष्टात आणण्यासाठी गीत-संगीत आणि भजन यांचाही उपयोग होऊ शकतो, असा विचार तुम्ही करू शकता का? मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात “मेरा बच्चा अभियान”! ही अशा प्रकारची मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यात भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले, त्यात पोषण गुरू असणाऱ्या शिक्षकांना पाचारण करण्यात आले. यावेळी मडके कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत महिला, अंगणवाडी केंद्रात मूठभर धान्य आणतात आणि याच धान्याचा वापर करून शनिवारी बालभोजकार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांची उपस्थिती वाढली आणि कुपोषणाचे प्रमाणही कमी झाले आहे. कुपोषणाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी झारखंडमध्येही एक अनोखी मोहीम सुरू आहे. झारखंडमधील गिरिडीहमध्ये साप-शिडीचा खेळ तयार करण्यात आला आहे. या खेळाच्या माध्यमातून मुले चांगल्या आणि वाईट सवयी कोणत्या, ते शिकत आहेत.

 

मित्रहो,

कुपोषणाशी संबंधित अनेक अभिनव प्रयोगांबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे, कारण येत्या महिनाभरात आपणा सर्वांना या मोहिमेत सामील व्हायचे आहे. सप्टेंबर महिना हा सणांचा महिना असला तरी तो पोषणाशी संबंधित एका मोठ्या मोहीमेला समर्पित आहे. आपण दरवर्षी 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत पोषण महिना साजरा करतो. कुपोषणाविरुद्ध देशभरात अनेक सर्जनशील आणि वैविध्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. तंत्रज्ञानाचा उत्तम वापर आणि लोकसहभाग हा पोषण अभियानाचा अविभाज्य घटक बनला आहे. देशातील लाखो अंगणवाडी सेविकांना मोबाईल उपकरणे देण्यात आली आहेत तसेच अंगणवाडी सेवांवर देखरेख ठेवण्यासाठी पोषण ट्रॅकर सुद्धा सुरू करण्यात आला आहे.

सर्व आकांक्षी जिल्हे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये, 14 ते 18 वयोगटातील मुलींना सुद्धा पोषण मोहिमेच्या कक्षेत सामावून घेतले आहे. कुपोषणाच्या समस्येच्या निराकरणाचे प्रयत्न या उपाययोजनांपुरतेच मर्यादित नाहीत. या लढ्यात इतर अनेक उपक्रमसुद्धा महत्वाची भूमिका बजावत आहे. जल जीवन मिशनचे उदाहरण घ्या. भारत कुपोषणमुक्त करण्याच्या कामी या मिशनचाही मोठा परिणाम दिसून येणार आहे. कुपोषणाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सामाजिक जागृतीच्या प्रयत्नांची भूमिका महत्वाची असते. येत्या पोषण महिन्यात कुपोषण दूर करण्याच्या प्रयत्नात तुम्ही सहभागी व्हावे, अशी विनंती मी तुम्हा सर्वांना करतो.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

चेन्नई येथील श्रीदेवी वर्दराजनजी यांनी मला एक स्मरणपत्र पाठवले आहे. त्यांनी मायगव्हवर लिहिले आहे की जेमतेम पाच महिन्यांमध्ये नव्या वर्षाचे आगमन होईल. येणारे नवीन वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे, हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. त्यांनी मला देशाचा बाजरीचा नकाशाही पाठवला आहे.

मन की बातच्या पुढच्या भागात तुम्ही यावर चर्चा करू शकता का? असे त्यांनी मला विचारले आहे. देशवासीयांच्या मनातला असा उत्साह पाहून मलाही मनापासून आनंद होतो. तुम्हाला आठवत असेल की संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारताच्या या प्रस्तावाला 70 पेक्षा जास्त देशांचा पाठिंबा मिळाला आहे, हे जाणून तुम्हाला निश्चितच आनंद होईल. आज जगभरात बाजरी या भरड धान्याबद्दल आकर्षण वाढते आहे. मित्रहो, आज भरड धान्याबद्दल तुमच्याशी बोलताना, भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी मी करत असलेल्या एका प्रयत्नाबद्दल मला तुम्हाला सांगायचे आहे.

आजकाल काही वर्षांपासून माझ्या प्रयत्न असतो की, जेव्हा कोणीही परदेशी पाहुणे भारतात येतात, राज्याचे प्रमुख भारतात येतात, तेव्हा भारतातील मिलेट्स/ तृणधान्यापासून, भरड धान्यापासून बनवलेले पदार्थ त्यांना देण्यात/ वाढण्यात यावेत आणि असा अनुभव आला आहे की  या मान्यवरांना, हे पदार्थ खूप आवडतात आणि ते आपल्या  भरडधान्याबद्दल, तृणधान्याबद्दल बरीच माहिती गोळा करण्याचा देखील प्रयत्न करतात. प्राचीन काळापासून तृणधान्य हे आपल्या शेतीचा, संस्कृतीचा आणि परंपरेचा  भाग आहे. आपल्या वेदांमध्ये तृणधान्यांचा उल्लेख आहे आणि त्याचप्रमाणे पुराणनुरु आणि टोलकप्पियममध्येही त्यांचा उल्लेख आहे.

तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात गेलात तर तिथल्या लोकांच्याजेवणात तुम्हाला तृणधान्यांचे  विविध प्रकार नक्कीच पाहायला मिळतील. आपल्या संस्कृतीप्रमाणेच तृणधान्यांमध्येही खूप वैविध्य आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळे , कंगणी, चेना, कोडो, कुटकी, कुट्टू, ही सर्व तृणधान्येच आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा तृणधान्य उत्पादक देश आहे, त्यामुळे हा उपक्रम/ हे अभियान  यशस्वी करण्याची जबाबदारीही आम्हा भारतीयांच्या खांद्यावरच  आहे. आपण सर्वांनी मिळून याला एक जनआंदोलन बनवायचे आहे आणि देशातील जनतेमध्ये तृणधान्या विषयी  जागरूकता वाढवायची आहे.

आणि मित्रांनो, तुम्हाला तरचांगलंच माहिती आहे, तृणधान्ये शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर आहेत  आणि तीही विशेषतः लहान शेतकऱ्यांसाठी. खरं तर, ही पिके खूप कमी वेळात तयार होतात, आणि त्याला जास्त पाणीसुद्धा  लागत नाही. आपल्या लहान शेतकऱ्यांसाठी तर तृणधान्ये  विशेष फायदेशीर आहेत. तृणधान्यांचा पेंढा देखील सर्वोत्तम चारा मानला जातो.

आजकाल तरुण पिढी आरोग्यपूर्ण जीवन आणि अन्नाकडे  खूप लक्ष देते. त्या  दृष्टीने पाहिले तर तृणधान्यात भरपूर प्रथिने, तंतुमय पदार्थ आणि खनिजे असतात. बरेच लोक तर याला सुपर फूड देखील म्हणतात.

तृणधान्याचे केवळ एक नव्हे तर अनेक फायदे आहेत. लठ्ठपणा कमी करण्यासोबतच ते मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी करतात. यासोबतच ते पोट आणि यकृताच्या आजारांपासून वाचवण्यासाठी  मदत करतात.

कुपोषणाबद्दल आपण काही काळापूर्वी बोललो होतो. तृणधान्ये कुपोषणाशी लढण्यासाठी देखील खूप उपयोगी  आहेत, कारण ती  ऊर्जा तसेच प्रथिनांनी परिपूर्ण आहेत. आज देशभरात  तृणधान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बरेच काही केले जात आहे. यासंबंधित संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपयोगांवर  लक्ष केंद्रित करण्यासोबतच FPOs ला प्रोत्साहन दिले जात आहे, जेणेकरून उत्पादन वाढवता येईल.

आपल्या शेतकरी बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की, तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करा  आणि त्याचा लाभ घ्या.

मला हे बघून खूप चांगले वाटते की आज असे अनेक स्टार्ट-अपस उदयाला येत आहेत, जे तृणधान्यावर काम करत आहेत. यापैकी काहीजण तृणधान्यांच्या कुकीज बनवत आहेत, तर काहीजण तृणधान्यांचा पॅन केक आणि डोसा देखील बनवत आहेत. असे काही आहेत जे तृणधान्यांचा  एनर्जी बार आणि नाश्ता तयार करत आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो.

या सणासुदीच्या काळात आपण अनेक पक्वान्न आणि पदार्थांमध्ये तृणधान्ये वापरतो. तुम्ही आपल्या घरात बनवलेल्या अशा पदार्थांची छायाचित्रे सोशल समाज माध्यमांवर  जरूर शेअर करा, त्यामुळे लोकांमध्ये तृणधान्यांबद्दल  जागरुकता वाढण्यास मदत होईल.

 

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

काही दिवसांपूर्वी मी अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यातील जोरसिंग गावातील एक बातमी पाहिली. ही बातमी अशा एका बदलाची होती ज्याची या गावातील लोक अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. खरे तर जोरसिंग गावात या महिन्यात, स्वातंत्र्यदिनाच्या दिवसापासून 4G इंटरनेट सेवा सुरू झाली आहे. जसे पूर्वी कधी खेड्यात वीज पोहोचली तेव्हा लोक खुश झाले होते, तसेच आता नवीन भारतात 4G पोहोचल्यावर लोकांना तसाच आनंद होतो आहे.

अरुणाचल आणि ईशान्येतील दुर्गम भागात 4G च्या रूपाने एक नवा सूर्योदय झाला आहे, इंटरनेट कनेक्टिव्हिटीने नवी पहाट आणली आहे. ज्या सुविधा पूर्वी फक्त मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध होत्या, त्या आता डिजिटल इंडियाने खेड्यापाड्यात आणल्या आहेत. त्यामुळे देशात नवीन डिजिटल उद्योजक तयार होत आहेत.

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील सेता सिंह रावत जी टेलर ऑनलाइन‘ ‘ई-स्टोअरचालवतात. तुम्हाला वाटेल हे काय आहे, टेलर ऑनलाईन!!

वास्तविक, सेठा सिंह रावत हे कोविडपूर्वी टेलरिंगचे काम करायचे. जेव्हा कोविड आला तेव्हा रावतजींनी हे आव्हान संकट मानले नाही तर संधी म्हणून स्वीकारले. ते  कॉमन सर्व्हिस सेंटरम्हणजेच CSC ई-स्टोअरमध्ये सामील झाले  आणि ऑनलाइन काम करू लागले.

त्यांनी पाहिले की ग्राहक मोठ्या संख्येने मास्कसाठी ऑर्डर देत आहेत. त्यांनी  काही महिलांना कामावर घेतले आणि मास्क बनवायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी शिंपी /टेलर ऑनलाइननावाने आपले ऑनलाइन स्टोअर सुरू केले ज्यामध्ये त्यांनी  इतरही  अनेक प्रकारचे कपडे शिवून, विकण्यास सुरुवात केली. आज डिजिटल इंडियाच्या सामर्थ्याने सेता सिंह जींचे काम इतके वाढले आहे की आता त्यांना संपूर्ण देशभरातून ऑर्डरस  मिळतात. त्यांनी शेकडो महिलांना आपल्या कंपनीत  रोजगार दिला आहे.

डिजिटल इंडियाने उन्नाव, यूपी येथे राहणाऱ्या  ओम प्रकाश सिंह जी यांना देखील  डिजिटल उद्योजक बनवले आहे. त्यांनी आपल्या  गावात एक हजाराहून अधिक ब्रॉडबँड कनेक्शन्स स्थापन केली आहेत. ओम प्रकाश जी यांनी त्यांच्या कॉमन सर्व्हिस सेंटरभोवती मोफत वायफाय झोन देखील तयार केला आहे, ज्याची  गरजू लोकांना खूप मदत होत आहे. ओम प्रकाश जी यांचे काम आता इतके वाढले आहे की त्यांनी 20 पेक्षा जास्त लोकांना कामावर घेतले आहे. हे लोक गावागावातील शाळा, रुग्णालये, तहसील कार्यालये, अंगणवाडी केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्शन देत असून त्यातून त्यांना रोजगारही मिळत आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरप्रमाणे, सरकारी ई-मार्केट प्लेस अर्थात जीईएम पोर्टलवर अशा किती यशोगाथा पाहायला मिळतात.

 

मित्रांनो,

मला गावोगावातून असे अनेक संदेश मिळतात, जे इंटरनेटमुळे झालेल्या बदलांच्या विषयी सांगतात. इंटरनेटमुळे आमच्या तरुण मित्रांचा अभ्यास आणि शिक्षणाची पद्धतच  बदलली आहे. उदाहरणार्थ, यूपीच्या  गुडिया सिंग जेव्हा उन्नावच्या अमोईया गावात आपल्या  सासरच्या घरी आल्या तेव्हा त्यांना आपल्या  अभ्यासाची काळजी वाटत होती.  पण, भारतनेटने त्यांची चिंता दूर केली. गुडिया यांनी इंटरनेटद्वारे त्यांचा अभ्यास सुरू ठेवला आणि पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले.

खेड्या-पाड्यातील अशा कितीतरी  लोकांना  डिजिटल इंडिया मोहिमेतून नवी शक्ती मिळत आहे. तुम्ही मला खेड्यापाड्यातील डिजिटल उद्योजकांबद्दल जमेल तितके जास्तीत जास्त कळवत जा आणि त्यांच्या यशोगाथा सामाजिक माध्यमांच्यावरही शेअर करा.

 

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

काही दिवसांपूर्वी मला मन की बातचे हिमाचल प्रदेशातील श्रोते रमेश जी यांचे पत्र आले. रमेशजींनी त्यांच्या पत्रात पर्वतांच्या अनेक गुणांचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले की, डोंगरावरील वसाहती एकवेळ एकमेकांपासून दूर दूर असतीलही पण लोकांची मने मात्र एकमेकांच्या खूप जवळ आहेत.

खरंच, डोंगरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनातून आपण खूप काही शिकू शकतो. पर्वतीय जीवनशैली आणि संस्कृतीतून आपल्याला पहिली शिकवण मिळते ती म्हणजे परिस्थितीचे आपण दडपण घेतले नाही तर  आपण त्यावर सहज मात करू शकतो आणि दुसरी शिकवण म्हणजे  स्थानिक साधनसंपत्तीने आपण आत्मनिर्भर  कसे होऊ शकतो.

ज्या  पहिल्या शिकवणीचा मी उल्लेख केला होतात्याचे एक सुंदर चित्र सध्या स्पिती प्रदेशात पाहायला मिळत आहे. स्पिती हा एक जनजातीय भाग आहे. इथे आजकाल मटार – वाटाणा तोडण्याचे काम चालते. डोंगरावरील शेतातले हे काम  मोठे कष्टाचे आणि कठीण काम आहे. पण इथे गावातील स्त्रिया एकत्र जमतात, सर्वजणी एकमेकांच्या मदतीने शेतातून वाटाणे तोडतात. काम करता करता  महिला छपरा माझी छपराहे स्थानिक गाणेही गातात. म्हणजेच परस्पर सहकार्य हा देखील इथल्या  लोकपरंपरेचाच एक भाग आहे.

स्थानिक संसाधनांच्या वापराचे उत्तम उदाहरणदेखील  स्पितीमध्ये आढळते. स्पितीमध्ये गायी पाळणारे शेतकरी, गाईचे  शेण वाळवून गोणीत भरतात. हिवाळा आला की गायी ज्या ठिकाणी राहतात त्याला इथे खुड म्हणतात. तर  त्या ठिकाणी या गोण्या टाकल्या जातात. बर्फवृष्टीच्या वेळी या गोण्या गायींना थंडीपासून संरक्षण देतात. हिवाळ्यानंतर हेच  शेण शेतात खत म्हणून वापरले जाते. म्हणजेच प्राण्यांच्या शेणाच्या मदतीनेच त्यांचे संरक्षण, तसेच शेतासाठी खतदेखील.  लागवडीचा खर्चही कमी व  शेतात उत्पादनही जास्त. त्यामुळेच तर हा परिसर आजकाल  नैसर्गिक शेतीसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

 

मित्रांनो,

असेच अनेक स्तुत्य प्रयत्न आपल्या आणखी एका पहाडी राज्यात, उत्तराखंडमध्येही पाहायला मिळत आहेत. उत्तराखंडमध्ये अनेक प्रकारची औषधे आणि वनस्पती आढळतात. जी  आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यापैकी एक फळ आहे – बेडू. त्याला हिमालयन अंजीर असेही म्हणतात. या फळामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. लोक याचे सेवन केवळ फळाच्या रूपातच करत नाहीत तर अनेक रोगांच्या उपचारातही यांचा  वापर केला जातो.

या फळाचे हे सर्व गुण लक्षात घेऊन आता बेडू  ज्यूस, फळापासून जाम, चटण्या, लोणचे आणि फळे सुकवून तयार केलेले ड्रायफ्रूट्स बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. पिथौरागढ प्रशासनाच्या पुढाकाराने आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने बेडू फळाला वेगवेगळ्या स्वरूपात बाजारपेठेत पोहोचवण्यात यश आले आहे. पहाडी  अंजीर असे ब्रँडिंग करून बेडू ऑनलाइन बाजारातही लाँच केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे साधन तर मिळालेच, पण बेडूच्या औषधी गुणधर्माचे फायदे दूरदूरपर्यंत पोहोचू लागले आहेत.

 

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

मन की बातच्या सुरुवातीला आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाविषयी बोललो. स्वातंत्र्यदिनाच्या महान पर्वासोबतच आगामी काळात आणखी अनेक सण येणार आहेत.

अवघ्या काही दिवसांनी श्रीगणेशाच्या पूजेचा सण गणेश चतुर्थी येत आहे. गणेश चतुर्थी, म्हणजेच गणपती बाप्पाच्या आशीर्वादाचा सण.

गणेश चतुर्थीच्या आधी ओणमचा सणही सुरू होत आहे. विशेषत: केरळमध्ये ओणम शांतता आणि समृद्धीच्या भावनेने साजरा केला जाईल.

हरतालिका तीजही 30 ऑगस्टला आहे. 1 सप्टेंबर रोजी ओडिशात नुआखाई हा सणही साजरा केला जाणार आहे. नुआखाई चा अर्थच आहे नवीन अन्नधान्य, खाद्यपदार्थ, म्हणजेच हा सण देखील इतर अनेक सणांप्रमाणेच आपल्या कृषी परंपरेशी निगडित सण आहे.

ह्याच दरम्यान, जैन समाजाचा संवत्सरी पर्वही येणार आहे. आपले हे सर्व सण आपल्या सांस्कृतिक समृद्धीचे आणि ऊर्जेचे, चैतन्याचे प्रतीक आहेत.

या सणांसाठी आणि विशेष उत्सवाच्यासाठी मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. या उत्सवांसोबतच उद्या 29 ऑगस्ट ह्या दिवशी, मेजर ध्यानचंद जी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनही साजरा केला जाणार आहे. आमचे युवा खेळाडू आमच्या तिरंग्याचा गौरव जागतिक मंचावर वाढवत राहोत, हीच ध्यानचंदजींना आमची श्रद्धांजली  असेल.

आपण सर्वजण मिळून देशासाठी काम करत राहू या, देशाचा सन्मान वाढवत राहू या, अशी मी कामना करतो व हयासोबतच इथे थांबतो. पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा तुमच्याशी मन की बातहोईल. खूप खूप धन्यवाद!

***

S.Tupe/AIR/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai