Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चेन्‍नईतील अण्‍णा विद्यापीठाच्‍या 42व्‍या दीक्षांत समारंभात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन

चेन्‍नईतील अण्‍णा विद्यापीठाच्‍या 42व्‍या दीक्षांत समारंभात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन


नवी दिल्‍ली, 29 जुलै 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज चेन्नई येथील अण्णा विद्यापीठाचा बेचाळीसावा दीक्षांत समारंभ झाला. तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी, मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, केंद्रीय मंत्री एल मुरुगन यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. “अण्णा विद्यापीठाच्या ४२ व्या दीक्षांत समारंभात आज पदवीधर झालेल्या सर्वांचे अभिनंदन. तुम्ही सर्वांनी आपल्या मनात भविष्याबद्दल निश्चित ध्येय ठरवले असेल. त्यामुळे आजचा दिवस केवळ यशाचा  नव्हे तर आशा आकांक्षांचा आहे.” असे ते म्हणाले. हे विद्यार्थी उद्याचे नेते आहेत असे सांगत पंतप्रधानांनी पालकांचा त्याग , विद्यापीठातील शिक्षक  आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्याचीही दखल घेतली.

भारतीय युवकांच्या क्षमतांबाबत स्वामी विवेकानंद यांनी सुमारे 125 वर्षांपूर्वी तेव्हाच्या मद्रास मध्ये काढलेल्या उद्गारांचे पंतप्रधानांनी स्मरण केले. “संपूर्ण जग भारताच्या युवाशाक्तीकडे मोठ्या आशेने बघत आहे कारण ही युवाशक्ती भारताच्या विकासाचे इंजिन आहे आणि भारत हा जगाच्या विकासाचे इंजिन आहे.”, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अण्णा विद्यापीठाशी असलेल्या संबंधाचेही स्मरण केले. “त्यांचे विचार आणि मूल्ये तुम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहोत”, असे पंतप्रधान म्हणाले.

कोविड 19 ही एक आकस्मिक घटना होती, शतकातून एखादेवेळेस घडणाऱ्या या घटनेची कोणतीच माहिती कोणाला अवगत नव्हती. या महामारीने प्रत्येक राष्ट्राची परीक्षा घेतली, असे ते म्हणाले. आपण कशा तऱ्हेने घडलो आहोत याची जाणीव प्रतिकूल परिस्थितीच होते, भारताने अज्ञाताचा सामना आत्मविश्वासाने केला. या परिस्थितीशी लढा देताना ताकदीने उभे राहिलेल्या शास्त्रज्ञ, आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक – कर्मचारी आणि नागरिकांचे पंतप्रधानांनी आभार मानले. परिणामी, भारतातील प्रत्येक क्षेत्र आता नवीन जीवनाने गजबजले आहे. उद्योग, गुंतवणूक, नवोन्मेष किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार, या सगळ्यात भारत आघाडीवर दिसत आहे. गेल्या वर्षी भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश असल्याचे पंतप्रधान म्हणाले. नवोन्मेष हा जीवनाचा भाग बनला आहे. फक्त गेल्या 6 वर्षात मान्यताप्राप्त स्टार्ट अप्सची संख्या 15,000 टक्क्यांनी वाढली आहे, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी भारतात  83 अब्ज डॉलर्स इतकी थेट परकीय गुंतवणुक  झाल्याने नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. आमच्या स्टार्ट अप्सनाही महामारीनंतर विक्रमी निधी मिळाला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापार गतीमानतेत भारताची स्थिती आतापर्यंतची सर्वोत्तम आहे.

तंत्रज्ञानाच्या या युगात येणारे विविध अडथळे लक्षात घेता भारताच्या बाजूने तीन महत्वाचे घटक आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे तंत्रज्ञानाविषयीचा वाढता कल. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आयुष्य सुखदायी होत असल्याची भावना वाढीस लागत आहे.  गरीबातील गरीब व्यक्ती देखील तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. दुसरा घटक म्हणजे जोखीम  पत्करणाऱ्यांवर विश्वास आहे. याआधी एखाद्या युवकाला किंवा युवतीला एखाद्या सामाजिक प्रसंगी  तो किंवा ती उद्योजक आहे हे सांगणे अवघड जात असे. लोक त्यांना स्थिरस्थावर होण्याचा आणि नियमित वेतन मिळेल अशी नोकरी करण्याचा सल्ला देत असत. पण आता परिस्थिती पालटली आहे. तिसरा घटक म्हणजे सुधारणांचा ध्यास असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की याआधी अशी एक धारणा होती की मजबूत सरकार सर्व गोष्टींवर आणि सर्वांवर नियंत्रण ठेवते. पण आम्ही ती धारणा बदलली आहे. एक सक्षम सरकार सर्वगोष्टींवर  आणि सर्वांवर नियंत्रण ठेवत नाही. तर ते हस्तक्षेप करणाऱ्या यंत्रणेच्या आवेगावर नियंत्रण ठेवते. एक मजबूत सरकार  प्रतिबंधात्मक नाही तर प्रतिसादात्मक  असते. एक मजबूत सरकार प्रत्येक क्षेत्रात डोकावत नाही, स्वतः ला मर्यादा घालून  लोकांच्या  प्रतिभेला संधी देते.

मजबूत सरकारचे सामर्थ्य हे त्यांच्या विनयशील वृतीत असते जेव्हा सरकारला सर्व गोष्टी माहित असू शकत नाहीत  किंवा सरकारच सर्व काही करू शकत नाही हे स्वीकारण्याची सरकारची तयारी असते. म्हणूनच सुधारणा लोकांसाठी आणि त्यांच्या प्रतिभेसाठी प्रत्येक क्षेत्रात अधिक स्थान निर्माण करत आहेत. त्यांनी यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने युवकांना दिलेले स्वातंत्र्य आणि परिवर्तनशीलतेचे तसेच व्यवसाय सुलभतेसाठी आधी असलेल्या 25,000 अटी आणि नियम रद्द केल्याचे  उदाहरण दिले. एंजल कर, पूर्वलक्षी कर काढून टाकणे , कॉर्पोरेट कर कमी करणे अशा उपाय योजनांमुळे सरकार  गुंतवणूक आणि उद्योगांना प्रोत्साहन देत आहे. ड्रोन, अंतराळ आणि भू-स्थानिक क्षेत्रातील सुधारणा नवीन मार्ग उघडत आहेत,” असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी तरुणांची प्रगती आणि राष्ट्र यांच्यातील दुवा अधोरेखित केला. ते म्हणाले, “तुमची वाढ ही भारताची वाढ आहे. तुमची शिकवण ही भारताची शिकवण आहे. तुमचा विजय हा भारताचा विजय आहे.”

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी 69 सुवर्णपदक विजेत्यांना सुवर्ण पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान केली. अण्णा विद्यापीठाची स्थापना ४ सप्टेंबर १९७८ रोजी झाली. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री सी.एन. अन्नादुराई यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. यात 13 घटक महाविद्यालये, तामिळनाडूमध्ये पसरलेली 494 संलग्न महाविद्यालये आणि तिरुनेलवेली, मदुराई आणि कोईम्बतूर येथील 3 उपकेंद्रे आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

Jaydevi PS/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com