Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अहमदाबादमधील बोपल येथे पंतप्रधानांनी IN- SPACe च्या  मुख्यालयाचे केले उद्घाटन

अहमदाबादमधील बोपल येथे पंतप्रधानांनी IN- SPACe च्या  मुख्यालयाचे केले उद्घाटन


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद मधील बोपल येथे भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन आणि  प्राधिकरण केंद्राच्या (IN-SPACE)  मुख्यालयाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात अंतराळ -आधारित ऍप्लिकेशन्स आणि सेवांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या इन स्पेस  आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. अंतराळ क्षेत्रातील खाजगी संस्थांना प्रोत्साहन आणि सक्षम केल्यास अंतराळ क्षेत्राला मोठी चालना मिळेल  आणि भारतातील प्रतिभावान युवकांसाठी  संधीचे नवीन दालन खुले होईल. केंद्रीय मंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि अंतराळ उद्योगाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांना  संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की 21 व्या शतकातील आधुनिक भारताच्या विकासाच्या प्रवासात आज एक अद्भुत अध्याय जोडला गेला आहे आणि  भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन आणि  प्राधिकरण केंद्राच्या  मुख्यालयासाठी त्यांनी सर्व देशवासियांचे आणि वैज्ञानिक समुदायाचे अभिनंदन केले.  इन स्पेस चे उदघाटन  हा भारतीय अंतराळ उद्योगासाठी उत्कंठावर्धक अर्थात  वॉच धिस स्पेसक्षण आहे कारण अनेक विकास कामे आणि संधींसाठी ही नांदी  असल्याचे पंतप्रधान म्हणाले.  इन-स्पेस भारतातील युवकांना  त्यांची प्रतिभा भारतातील सर्वोत्तम वैज्ञानिकांसमोर  दाखवण्याची संधी देईल. ते सरकारी क्षेत्रात काम करणारे असोत किंवा खाजगी क्षेत्रात , इन-स्पेस  सर्वांसाठी उत्तम संधी निर्माण करेल.असे पंतप्रधान  म्हणाले, इन-स्पेस मध्ये भारताच्या अंतराळ उद्योगात क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे. म्हणूनच  मी म्हणेन – वॉच धिस स्पेस ‘. “इन-स्पेस अंतराळासाठी आहे, इन-स्पेस वेगासाठी आहे, इन-स्पेस सामर्थ्यासाठी  आहे”.

पंतप्रधान म्हणाले की, अवकाश उद्योगातील खाजगी क्षेत्राकडे फार पूर्वीपासून केवळ विक्रेता म्हणून पाहिले जात आहे, एक अशी व्यवस्था  जिने या उद्योगातील खाजगी क्षेत्राच्या प्रगतीचे मार्ग नेहमीच अडवून ठेवले.  पंतप्रधान म्हणाले की केवळ मोठ्या कल्पनाच विजेते निर्माण करतात.  अंतराळ क्षेत्रात सुधारणा करून, सर्व बंधनांपासून मुक्त करून, इन-स्पेस च्या माध्यमातून  खाजगी उद्योगाला पाठिंबा देऊन, देश आज विजेते घडवण्याच्या दिशेने मोहीम सुरू करत आहे. खाजगी क्षेत्र हे केवळ विक्रेताच राहणार नाही तर अंतराळ क्षेत्रात बलाढ्य विजेत्याची भूमिका पार पाडेल.  “जेव्हा सरकारी अंतराळ  संस्थांची ताकद आणि भारताच्या खाजगी क्षेत्राचा सहभाग यांची सांगड घातली जाईल , तेव्हा आकाशही अपुरे पडेल  असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, यापूर्वीच्या व्यवस्थेत भारतातील युवकांना त्यांची क्षमता पूर्णपणे साकारण्याची संधी मिळत नव्हती. भारतीय युवक त्यांच्यासोबत अभिनवता ऊर्जा आणि संशोधनाची भावना आणतात.  हे देशाचे दुर्दैव आहे की काळाच्या ओघात नियमन  आणि निर्बंध यातील फरक विसरला गेला आहे.   आज आपण आपल्या युवकांसमोर  त्यांच्या योजना केवळ सरकारी मार्गाने राबवण्याची अट ठेवू शकत नाही  यावर पंतप्रधानांनी भर दिला. अशा निर्बंधांचे युग संपले आहे आणि सरकार आपल्या तरुणांच्या मार्गातून  अशी सर्व बंधने दूर करत  असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी संरक्षण उत्पादन, आधुनिक ड्रोन धोरण, भौगोलिक-स्थानिक डेटा संबंधी मार्गदर्शक तत्त्वे आणि दूरसंचार/माहिती तंत्रज्ञान  क्षेत्रातील कुठूनही काम करण्याची सुविधा यासारखी सरकारचा उद्देश स्पष्ट करणारी  उदाहरणे दिली. भारतातील खाजगी क्षेत्रासाठी जास्तीत जास्त व्यवसाय सुलभतेचे वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून देशाचे खाजगी क्षेत्र देशवासियांचे राहणीमान सुधारण्यात सहाय्यक ठरेल यावर पंतप्रधानांनी भर दिला.

कोणी वैज्ञानिक असेल किंवा शेतकरी-मजूर, कोणाला  विज्ञानाचे तंत्र समजत असेल किंवा समजत नसेलही , पण या पलीकडे जाऊन आपली अंतराळ मोहीम देशातील सर्व लोकांचे मिशन बनते  आणि भारताची ही भावनिक एकता आपण चांद्रयान मोहिमेदरम्यान पाहिली आहे, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. देशातील 60  हून अधिक खासगी कंपन्या अंतराळ क्षेत्रात अद्ययावत तयारीसह आघाडीवर आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देशाच्या अंतराळ क्षेत्रात हा महत्त्वपूर्ण बदल घडवून आणल्याबद्दल त्यांनी इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले. अंतराळ क्षेत्र खुले करणे हा महत्त्वाचा टप्पा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आणि या उपक्रमाच्या यशाचे श्रेय इस्रोच्या कोशल्याला आणि निर्धाराला दिले.  भारताचा अंतराळ कार्यक्रम ही आत्मनिर्भर भारत अभियानाची सर्वात मोठी ओळख आहे, असे ते म्हणाले.

21 व्या शतकातील एका मोठ्या क्रांतीचा आधार स्पेस-टेक बनणार आहे. स्पेस-टेक आता केवळ दूरच्या नव्हे तर आपल्या वैयक्तिक स्पेसचे तंत्रज्ञान बनणार आहे, असे त्यांनी सांगितले.  अंतराळ तंत्रज्ञानाचा फायदा देशातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इन-स्पेसने सतत काम करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. खाजगी अवकाश कंपन्यांनी गोळा केलेला डेटा भविष्यात त्यांना मोठी शक्ती देणार आहे. जागतिक अंतराळ उद्योगाचे मूल्य 400 अब्ज अमेरिकी  डॉलर आहे आणि 2040 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर उद्योग बनण्याची क्षमता आहे. जागतिक अंतराळ उद्योगात भारताचा वाटा वाढवणे आवश्यक आहे आणि खाजगी क्षेत्र त्यात मोठे योगदान देईल असे त्यांनी स्पष्ट केले. अंतराळ पर्यटन आणि अंतराळ मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रातही भारताची भूमिका लक्षणीय राहिली असे त्यांनी सांगितले. आपल्या देशात अनंत संधी आहेत पण मर्यादित प्रयत्नांनी कधीच असीम शक्यता साकारता येत नाहीत असे मत त्यांनी मांडले.  अंतराळ क्षेत्रातील सुधारणांची ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. खाजगी क्षेत्राची बाजू ऐकून त्यांना समजून घेतले पाहिजे आणि शक्यता काय आहेत याचे योग्य विश्लेषण केले पाहिजे, यासाठी एक मजबूत यंत्रणा तयार करण्यात आली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. खाजगी क्षेत्राच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी इन स्पेस  एकल विंडो, स्वतंत्र नोडल एजन्सी म्हणून काम करेल. सरकारी कंपन्या, अंतराळ उद्योग, स्टार्टअप आणि संस्था यांच्यात समन्वय साधण्यासाठी भारत नवीन भारतीय अंतराळ धोरणावर काम करत आहे. अंतराळ क्षेत्रातील व्यवसाय सुलभ करण्यासाठी आम्ही लवकरच एक धोरण आणणार आहोत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

मानवतेचे भविष्य, त्याचा विकास याचा विचार करता येत्या काळात दोन क्षेत्रे सर्वात प्रभावशाली असणार आहेत, ती आहेत – अवकाश आणि समुद्र. भारताने या क्षेत्रांमध्ये विलंब न लावता पुढे जाण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. या क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगती आणि सुधारणांबाबत जागरूकता वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले. शाळांमधील अटल टिंकरिंग लॅब यामध्ये भूमिका बजावत आहे आणि श्रीहरिकोटा येथे उपग्रह प्रक्षेपणाचे साक्षीदार म्हणून 10 हजार लोकांसाठी प्रेक्षागार तयार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

गुजरात झपाट्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या संस्थांचे केंद्र बनत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी जामनगर येथील जागतिक  आरोग्य संघटनेचे पारंपारिक औषधांचे जागतिक केंद्र, राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ, पंडित दीनदयाल एनर्जी युनिव्हर्सिटी, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, चिल्ड्रन्स युनिव्हर्सिटी, भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस अॅप्लिकेशन्स अँड जिओइन्फॉरमॅटिक्स-BISAG आणि आता इन स्पेस  या संस्थांचा उल्लेख केला. त्यांनी संपूर्ण भारतातील विशेषतः गुजरातमधील तरुणांना या संस्थांचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी आमंत्रित केले.

इन स्पेस  च्या स्थापनेची घोषणा जून 2020 मध्ये करण्यात आली होती. ही अंतराळ विभागातील एक स्वायत्त आणि एकल खिडकी  नोडल एजन्सी आहे.  सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही अवकाश कार्यक्रमांना प्रोत्साहन देणारी आणि त्यांचे नियमन करणारी ही संस्था खाजगी संस्थांद्वारे इस्रोच्या सुविधांचा वापर सुलभ करते.

***

N.Chitale/S.Kane/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com