Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्‌घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्‌घाटन


नवी दिल्ली, 14 एप्रिल 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, नवी दिल्लीत प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्‌घाटन झाले.

यावेळी बोलतांना, पंतप्रधानांनी नमूद केले, आज देशात विविध उत्सव साजरे केले जात आहेत. त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. ज्या राज्यघटनेचे डॉ आंबेडकर मुख्य शिल्पकार होते, त्या राज्यघटनेने आपल्या लोकशाही व्यवस्थेचा पाया मजबूत झाला आहे. ही लोकशाही व्यवस्था सांभाळण्याची मुख्य जबाबदारी, देशाच्या पंतप्रधान कार्यालयावर असते. आज मला ह्या पंतप्रधान संग्रहालयाचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली, हे माझे सौभाग्यच आहे. असे मोदी म्हणाले. यावेळी देशातल्या आधीच्या पंतप्रधानांचे कुटुंबीय उपस्थित होते, त्यांचेही मोदी यांनी स्वागत केले.

‘देश जेव्हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे, अशावेळी हे संग्रहालय पूर्ण होणे, देशासाठी अत्यंत प्रेरणादायक आहे.या 75 वर्षात, देशाने अनेक अभिमानास्पद क्षण अनुभवले आहेत. इतिहासाच्या गवाक्षात डोकावून पाहिल्यास, या क्षणांचे महत्त्व अतुलनीय आहे, असे आपल्याला आढळेल असेही पंतप्रधान म्हणाले.

स्वातंत्र्यापासून, सर्व सरकारांनी देशाच्या जडणघडणीत  दिलेले योगदान अमूल्य आहे, असं पुनरुच्चार त्यांनी केला. स्वातंत्र्यानंतर देशात स्थापन झालेल्या प्रत्येक सरकारने देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. लाल किल्ल्यावरुन भाषण करतांना देखील मी याचा वारंवार उल्लेख केला आहे. या प्रत्येक सरकारच्या सामायिक वारशाचे हे संग्रहालय म्हणजे एक जिवंत प्रतिबिंब ठरले आहे, असेही त्यांनी सांगितले. घटनात्मक लोकशाहीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रत्येक पंतप्रधानांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांचे स्मरण करणे, म्हणजेच स्वतंत्र भारताचा प्रवास जाणून घेणे होय. या संग्रहालयात येणाऱ्या लोकांनादेशाच्या माजी पंतप्रधानांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख होईल, त्यांची पार्श्वभूमी, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या निर्मिती या सगळ्यांची माहिती होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

देशातील अनेक पंतप्रधान अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून आले होते, याविषयी त्यांनी अभिमान व्यक्त केला. भारतात अत्यंत गरीब, शेतकरी कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान पदांपर्यंत पोहोचतात,हे वस्तुस्थिती देशाच्या लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास अधिकच मजबूत करणारी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. देशातील लोकशाही व्यवस्थेत अगदी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती सर्वोच्च पदांपर्यंत पोहचू शकते, यामुळे देशातील युवकांचा आत्मविश्वास वाढतो. असे मोदी म्हणाले. या संग्रहालयामुळे युवा पिढीच्या अनुभवांच्या कक्षा विस्तारातील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या युवकांना स्वतंत्र भारतातील महत्वाचे प्रसंग जेवढे अधिक माहीत होतील, तेवढे त्यांचे निर्णय अधिकच योग्य आणि सुसंगत ठरतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भारत लोकशाहीचा जनक असल्याचे नमूद करत, पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या लोकशाहीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे की ती काळानुरूप बदलत जाते आहे. प्रत्येक युगात, प्रत्येक पिढीत लोकशाही अधिक आधुनिक आणि सक्षम करण्यासाठीचे प्रयत्न होत आले आहेत. असे त्यांनी सांगितले. एकदोन अपवाद सोडले तर, भारतात लोकशाही पद्धतीने लोकशाही मजबूत करण्याची अभिमानास्पद परंपरा अखंड सुरु आहे. म्हणूनच, ही लोकशाही पुढेही अधिक मजबूत करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. असे ते पुढे म्हणाले. भारतीय संस्कृतीतील सर्वसमावेशकता आणि सर्वांना सामावून घेण्याच्या प्रवृत्ती अधोरेखित करत, आपली लोकशाही आपल्याला आधुनिक होण्यासाठी आणि नवे विचार स्वीकारण्यासाठी प्रेरणा देत असते.

भारताच वैभवशाली इतिहास आणि समृद्ध काळाचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी, भारताचा वारसा आणि वर्तमान दोन्हीचे योग्य चित्र लोकांसमोर जाईल, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले. देशाबाहेर चोरून नेण्यात आलेल्या देशाच्या वारसावस्तू परत आणण्याचे सरकारचे प्रयत्न, संपन्न वारसा असलेल्या जागांवर उत्सव, जालियनवाला बाग स्मारक, बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करणारे पंततीर्थ, स्वातंत्र्यसेनानीचे संग्रहालय, आदिवासी इतिहास संग्रहालय या दिशेनेच टाकलेली पावले आहेत असे पंतप्रधान म्हणाले.

या संग्रहालयाच्या बोधचिन्हावर अशोक चक्र धरलेले अनेक हात दिसत आहेत, त्याविषयी बोलतांना ते म्हणाले, चक्र हे 24 तासांच्या अखंडतेचे प्रतीक आहे आणि या बोधचिन्हांत, समृद्धी आणि अविरत कष्टाचा निश्चय दिसत आहे. हा निश्चय, सदसद्विवेकबुद्धी आणि ताकद हीच भारताच्या येत्या 24 वर्षातील विकासाचे चित्र रेखटणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

आज जागतिक व्यवस्थेत बदल  होत असतांना, त्यात  भारताचा दर्जाही वाढत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आज जगाची नव्याने मांडणी होत आहे. संपूर्ण जग भारताकडे आशा आणि विश्वासाने बघत आहे. अशावेळी, नव्या ऊंचीवर पोहोचण्यासाठी प्रयत्न करणे ही भारताचीही जबाबदारी आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

 

 

  

 

 

 

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com