Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

11 व्या खेळ महाकुंभाचे उद्घाटन झाल्याची पंतप्रधानांनी केली घोषणा

11 व्या खेळ महाकुंभाचे उद्घाटन झाल्याची पंतप्रधानांनी केली घोषणा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद येथे 11 व्या खेळ महाकुंभाची सुरुवात करून दिली. याप्रसंगी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी स्टेडीयममध्ये लोटलेल्या युवा उर्जेच्या आणि उत्साहाच्या महासागराची दखल घेतली आणि ते म्हणाले की हा फक्त खेळांचा महाकुंभ नाहीये तर गुजरातच्या युवा शक्तीचा देखील महाकुंभ आहे. पंतप्रधानांच्या भाषणाआधी भव्य समारंभ झाला.

महामारीमुळे गेली दोन वर्षे या महाकुंभाचे आयोजन करता आले नाही असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, आजच्या ह्या भव्य समारंभाने क्रीडापटूंमध्ये नवा आत्मविश्वास आणि उर्जा जागृत केला आहे. ते म्हणाले, जे बीज मी 12 वर्षांपूर्वी पेरले त्याचा आता वटवृक्ष झाला आहे.पंतप्रधान जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी हा क्रीडा महोत्सव सुरु केला होता.

तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली गुजरातमध्ये 2020 साली 16 क्रीडाप्रकार आणि 13 लाख खेळाडूंसह सुरु झालेल्या या खेळ महाकुंभात आज 36 सर्वसाधारण क्रीडाप्रकार तर  विशेष खेळाडूंसाठीचे क्रीडाप्रकार समाविष्ट केलेले आहेत. या 11 व्या खेळ महाकुंभासाठी 45 लाखाहून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, पूर्वी भारतीय खेळांच्या पटलावर केवळ थोड्या क्रीडाप्रकारांचे वर्चस्व होते आणि त्यात स्वदेशी खेळांकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. खेळाच्या क्षेत्रात देखील घराणेशाहीचा शिरकाव झाला होता, तसेच खेळाडूंच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव हा देखील महत्त्वाचा घटक होता. खेळाडूंची खरी प्रतिभा समस्यांशी संघर्ष करण्यात वाया जात होती. त्या दुष्टचक्रातून बाहेर पडून आज भारताचा युवक आकाशाला गवसणी घालत आहे. देशाच्या क्रीडापटूंनी कमावलेली सुवर्ण तसेच रौप्य पदके देशाच्या विश्वासाला नवी झळाळी देत आहेत.त्यांनी सांगितले. टोक्यो ऑलिम्पिक तसेच पॅरालिम्पिक्ससारख्या मोठ्या क्रीडास्पर्धांमध्ये भारताने आज विक्रमी संख्येने पदके मिळविली आहेत. भारताने 7 पदकांची कमाई करण्याची कामगिरी पहिल्यांदा टोक्यो ऑलिम्पिकमध्ये केली. टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये देखील भारताच्या सुकन्या आणि सुपुत्रांनी अशीच विक्रमी कामगिरी केली. भारताने या जागतिक क्रीडास्पर्धेत 19 पदके मिळवली. पण, ही तर केवळ सुरुवात आहे. या प्रवासात भारत आता थांबणार तर नाहीच पण थकणार देखील नाही, पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले.

युक्रेनहून सुखरूप परत आलेले विद्यार्थी, भारताच्या तिरंग्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान वाढला असल्याचेच द्योतक आहे. त्याचप्रमाणे, क्रीडा मंचावर सुद्धा, भारताचा हाच सन्मान आणि देशभक्ती स्पष्टपणे दिसते आहे, असे पंतप्रधान म्हणाले. विविध क्षेत्रांत, युवकांचे नेतृत्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘ स्टार्ट अप इंडिता पासून स्टँड अप इंडिया पर्यंत, मेक इन इंडिया पासून ते आत्मनिर्भर भारतापर्यंत आणि व्होकल फॉर लोकलपर्यंत, भारतातील युवकांनीच नव्या भारतातील सर्व मोहीमांची जबाबदारी घेतली आहे. आपल्या युवकांनी भारताच्या क्षमतांना प्रत्यक्ष साकार केले आहे. असे त्यांनी सांगितले.

युवकांनी आयुष्यात कोणतेही शॉर्ट कट घेऊ नयेत, असा सल्ला त्यांनी दिला. शॉर्टकटचा मार्ग अल्पजीवी ठरतो, असे त्यांनी सांगितले. यशस्वी होण्याचा केवळ एकच मंत्र आहे- दीर्घकालीन नियोजन आणि सातत्य राखण्याची काटिबद्धता ! विजय किंवा पराजय काहीही आपला पूर्णविराम असू शकत नाही. असे पंतप्रधान म्हणाले. 

क्रीडाक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी 360 अंश दृष्टिकोन असावा लागतो, असे सांगत, पंतप्रधान म्हणाले की देशात क्रीडाक्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार, सर्वसमावेशक प्रयत्न करत आहे. आणि याच विचारसरणीतून खेलो इंडिया या कार्यक्रमाचा जन्म झाला आहे. आम्ही देशातील क्रीडा नैपुण्य शोधण्यास सुरुवात केली. अशा गुणवान खेळाडूंना आवश्यक ते सर्व पाठबळ दिले. आपल्या देशातील मुलांमध्ये खेळविषयी इतकी गुणवत्ता असूनहीत्यांना योग्य प्रशिक्षण न मिळाल्यामुळे, ते कायम मागे राहत होते. आज त्याच मुलांना, उत्तमोत्तम प्रशिक्षण सुविधा मिळत आहेत. असे त्यांनी नमूद केले.

गेल्या सात-आठ वर्षात, क्रीडाक्षेत्रासाठीची आर्थिक तरतूद, 70 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना प्रोत्साहन तसेच, सवलती यांच्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

क्रीडा क्षेत्राला एक व्यवहार्य करियर म्हणून स्थापन करण्यात, झालेल्या प्रगतीचाही त्यांनी उल्लेख केला. या क्षेत्रांत अनेक नोकऱ्यांची संधी आहे, जसे की प्रशिक्षण, व्यवस्थापन, प्रशिक्षक सहकारी, आहारतज्ञ, क्रीडा समीक्षक इत्यादि अनेक क्षेत्रांत रस असणारे युवक-युवती, हेच त्यांचे करियर म्हणून निवडू शकतात. माणिपूर आणि मीरत इथल्या क्रीडा विद्यापीठांची स्थापना झाली असून, इतर अनेक संस्थांमध्येही क्रीडाविषयक अभ्यासक्रम सुरु केले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.  त्याशिवाय, भारताला एवढा मोठा समुद्रकिनारा लाभला असून, आपण बीच आणि जल क्रीडा क्षेत्राकडे देखील लक्ष द्यायला हवे, असे त्यांनी सांगितले. पाल्यांनी आपल्या मुलांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

क्रीडा महाकुंभाने गुजरातमध्ये क्रीडा व्यवस्थेत क्रांती घडवून आणली आहे. वयाची कुठलीही अट नसल्याने राज्यभरातून लोक या महिनाभर चालणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतात. हा महाकुंभ कबड्डी, खोखो, रस्सीखेच, योगासने, मलखांब या पारंपरिक क्रीडा प्रकारांचा आणि कलात्मक स्केटिंग, टेनिस आणि तलवारबाजी या खेळांचा अनोखा संगम आहे. जमिनी स्तरावरील क्रीडा कौशल्य हेरण्यात या महाकुंभाने महत्वाची भूमिका बजावली आहे. यामुळे गुजरातमध्ये दिव्यांग जनांसाठीच्या क्रीडा स्पर्धांना देखील चालना मिळाली आहे. 

***

R.Aghor/S.Chitnis/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com