Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान व्हिएतनाम दौऱ्यावर: चीन मधील हांगझोऊ येथे होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (2 सप्टेंबर) आणि उद्या (3 सप्टेंबर) व्हिएतनाम दौऱ्यावर आहेत. त्यानंतर दिनांक 3 ते 5 सप्टेंबर 2016 या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या जी-20 समुहातील राष्ट्र प्रमुखांच्या वार्षिक शिखर परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहतील.

पंतप्रधानांनी “फेसबुक” वरुन या दौऱ्याविषयी माहिती देणाऱ्या संदेशाची मालिकाच प्रसिध्द केली आहे.

“व्हिएतनामी जनतेला त्यांच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा. व्हिएतनाम आमचा मित्रदेश असून आम्ही हे संबंध जिव्हाळ्याने जपतो”.

आज सायंकाळी मी व्हिएतनाम मधील हनोईला पोहचणार आहे. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध भविष्यात अधिक दृढ होण्यासाठी ही भेट महत्वपूर्ण ठरणार आहे. भारत-व्हिएतनाम यांच्या भागीदारीचा लाभ आशिया आणि उर्वरित जगासाठी मिळणार आहे, हे लक्षात घेऊन आपल्या सरकारने व्हिएतनामशी द्विपक्षीय संबंधांना महत्व दिले आहे.

या भेटीत, आपण पंतप्रधान न्यूइन झुआन फूक यांच्याशी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करणार आहे. उभय देशांतील संबंधांचा संपूर्ण आढावा घेण्यात येणार आहे.

आपण व्हिएतनामचे राष्ट्रपती त्रान-दाई क्वांग, व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेटरी न्यूयेन फू ट्राँग, व्हिएतनामच्या राष्ट्रीय विधिमंडळाच्या अध्यक्षा न्यूयेन थी किम नगन यांचीही भेट घेणार आहोत.

व्हिएतनामशी आर्थिक संबंध अधिक दृढ झाले तर त्याचा लाभ उभय देशांच्या नागरिकांना होणार आहे. जनतेशी थेट संबंध मजबूत करण्यावर आपण या व्हिएतनामच्या दौऱ्यात विशेष प्रयत्न करणार आहोत.

20 व्या शतकातील एक महान नेते हो ची मिन्ह यांना श्रध्दांजली वाहण्याची संधी आपल्याला या व्हिएतनाम दौऱ्यात मिळणार आहे. व्हिएतनाममधील राष्ट्रनायक, हुतात्मे यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करणार असून क्वान सू पॅगोडालाही आपण भेट देणार आहे.

व्हिएतनामची महत्वपूर्ण भेट आटोपून मी चीनमधील हांगझोऊ येथे जाणार आहे. दिनांक 3 ते 5 सप्टेंबर या कालावधीत जी-20 समुहातील राष्ट्रांच्या प्रमुखांची शिखर परिषद होत आहे, त्याला आपण उपस्थित राहणार आहे.

जी-20 शिखर परिषदेला जगभरातील आलेल्या इतर राष्ट्रप्रमुखांची भेट घेण्याची संधी मिळणार आहे. या परिषदेत जगापुढे असलेली आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय प्राधान्यक्रम यावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. सामाजिक, आर्थिक आणि सुरक्षाविषयक आव्हानांना सामोरे जातानाच जागतिक अर्थव्यवस्थेने शाश्वत विकास, वृध्दीच्या दिशेने मार्गक्रमणा केली पाहिजे, यावर शिखर परिषदेत चर्चा होईल.

या सगळ्या समस्यांवर ठोस पर्याय शोधण्यावर भारताचा प्रयत्न तर असणारच आहे, त्याचबरोबर शाश्वत आंतरराष्ट्रीय विकासाला प्राधान्य देणार आहे. जगभरातील विकसनशील देशांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या विशिष्ट गरजा ओळखून, त्यांच्या कल्याणासाठी कृती कार्यक्रम निश्चित केला जावा, असे भारताला वाटते.

या शिखर परिषदेतून काही भरीव कार्य होईल, अशी आपल्याला आशा आहे.

B.Gokhle/S. Bedekar/V.Deokar