Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात” द्वारे साधलेल्या संवादाचा


माझ्या प्रिय देशबांधवांनो,

उद्या 29 ऑगस्टला हॉकीचा जादूगार ध्यानचंद यांची जन्मदिन आहे. हा दिवस देशभरात “राष्ट्रीय क्रीडा दिन” म्हणून साजरा केला जातो. ध्यानचंदजी यांना मी श्रध्दांजली अर्पण करतो आणि यानिमित्ताने, त्यांनी केलेल्या योगदानाचे स्मरणही करु इच्छितो. त्यांनी 1928, 1932, 1936 मध्ये ऑलिंम्पिक खेळात भारताला हॉकीतले सुवर्ण पदक मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. आपणा सर्व क्रिकेटप्रेमींना “ब्रॅडमन” यांचे नाव माहिती आहे. त्यांनी ध्यानचंद यांच्याबाबत असे म्हटले होते की, ‘He scores goals like runs’. ते धावांप्रमाणे गोल करतात. ध्यानचंदजी म्हणजे खेळातले चैतन्य आणि देशभक्तीचे उत्कृष्ट उदाहरण आहेत, आदर्श आहेत. एकदा कोलकाता येथे हॉकी सामन्याच्या दरम्यान, प्रतिस्पर्धी खेळाडूने ध्यानचंदजींच्या डोक्यावर हॉकी स्टीक मारली. सामना संपायला केवळ दहा मिनिटे बाकी होती आणि त्या शेवटच्या दहा मिनिटात, ध्यानचंद यांनी तीन गोल केले आणि म्‍हणाले दुखापतीचे उत्तर गोल करुन दिले.

माझ्या देशबांधवांनो, जशी जशी “मन की बात”ची वेळ जवळ येवू लागते, तशा तशा माय गव्हवर अथवा नरेंद्र मोदी ॲपवर अनेकांच्याळ सूचना येऊ लागतात. विविध सूचना असतात. पंरतु यावेळी मला जाणवले की, बहुतांश लोकांनी मला आग्रह केला की, रिओ ऑलिंम्पिक संबंधात काही बोलावे, सर्वसामान्य नागरिकांचे रिओ ऑलिंम्पिकच्या प्रति इतके प्रेम, एवढी जागरुकता आणि यावर बोलण्यासाठी देशाच्या प्रधानमंत्र्याकडे आग्रह, याकडे मी खूप सकारात्मक दृष्टीने पाहतो. क्रिकेटशिवायही भारतीयांमध्ये इतर खेळांप्रतिसुध्दा एवढी आपुलकी आहे, एवढी जागरुकता, एवढी माहिती आहे. माझ्यासाठी हा संदेश देणे, याकरता ते एक प्रेरणा स्रोत ठरले. कारण ठरले. अजित सिंह यांनी नरेंद्र मोदी ॲपवर असे लिहिलेय की, कृपया मन की बातमध्ये मुलींचे शिक्षण आणि खेळातल्या त्यांच्या सहभागाबद्दल जरुर बोलावे. कारण रिओ ऑलिम्पिंकमध्ये त्यांनी पदके मिळवून देशाचा गौरव केलाय. सचिन म्हणतात, या वेळच्या मन की बातमध्ये सिंधु, साक्षी आणि दीपा कर्माकर यांच्याविषयी जरुर बोलावे. आपल्याला जी पदके मिळाली, ती मुलींनी मिळवून दिली. आपल्या मुलींनी हेच सिध्द करुन दाखवले की, आम्ही कुणापेक्षाही कमी नाहीत.

या मुलींमध्ये एक, उत्तर भारतातून आहे, एक दक्षिण भारताची, तर कोणी पूर्व भारताची तर कोणी हिंदुस्तानच्या आणखी एका भागाची आहे. त्यामुळे असे वाटते की, जसे संपूर्ण देशाच्या या मुलींनी भारताचे नाव उज्ज्वल करायचा जणू विडाच उचलला आहे. माय गव्हवर शिखर ठाकूर लिहितात की, आपण ऑलिम्पिमध्ये यापेक्षा चांगली कामगिरी करु शकलो असतो. ते म्हणतात, आदरणीय मोदी सर सर्वप्रथम रिओमध्ये दोन पदके मिळविल्याबद्दल अभिनंदन ! परंतु मी याकडे आपले लक्ष वेधून घेऊ इच्छितो की, खरेच आपली कामगिरी चांगली होती का ? आणि उत्तर आहे, नाही ! आपल्याला क्रीडा क्षेत्रात लांबचा पल्ला गाठायची आवश्यकता आहे. आमचे आई-वडिल आजसुध्दा अभ्यासावरच भर देतात. समाजही असेच मानतो की खेळ म्हणजे वेळेची नासाडी ! समाजाला प्रोत्साहनाची गरज आहे. हा‍िविचार बदलण्याची आवश्यकता आहे आणि हे काम आपल्याशिवाय जास्त चांगले कोण करु शकेल ?

सत्यप्रकाश मेहरा नरेंद्र मोदी ॲपवर म्हणतात, मन की बातमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त उपक्रमांवर भर द्यायची आवश्यकता आहे, खास करुन मुले आणि युवकांच्या खेळांबाबत ! या मुद्यांबाबत, हजारो लोकांनी लिहिले आहे. हा भाव व्यक्त केला आहे. आपल्या अपेक्षेनुसार आपण कामगिरी करु शकलो नाही, याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. काही गोष्टीत असे झाले आहे की, जे खेळाडू भारतात चांगली कामगिरी करत होते, येथील खेळात जी कामगिरी करत होते, ते तिथे दाखवू शकले नाही आणि पदक तालिकेत केवळ दोन पदके मिळाली. आणखी एक गोष्ट खरी आहे की, पदके मिळाली नाहीत तरी नीट पाहिले तर जाणवेल की, पहिल्यांदाच भारतीय खेळाडूंनी बऱ्याच खेळात काहीसे चांगले कर्तृत्व दाखवले आहे. आत हेच बघा, नेमबाजीमध्ये आपले अभिनव बिंद्राजी चौथ्या स्थानावर राहिले, आणि फार कमी फरकाने पदक हुकले. ऑलिम्पिकमध्ये जिमनॅस्टिमध्ये दीपा कर्माकरने तर कमाल केली. ती चौथ्या स्थानावर राहिली. थोडक्यात पदक निसटले. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेली ती पहिली भारतीय महिला ठरली, हे आपण विसरु शकत नाही. अशीच गोष्ट टेनिसमध्ये, सनिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा जोडीची झाली. ॲथलेटीक्समध्ये आपण चांगली कामगिरी केली. पी. टी. उषानंतर, 32 वर्षांमध्ये पहिल्यांदाच ललिता बाबरने ट्रॅक फिल्डच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली… 36 वर्षांनंतर महिला हॉकी टीम ऑलिंम्पिकपर्यंत पोहोचली, हे बघून आपल्याला निश्चितच आनंद होईल. मागच्या 36 वर्षात, पहिल्यांदाच पुरुषांच्या हॉकी संघाला नॉक आऊट फेरीपर्यंत पोहचण्यात सफलता मिळाली. आपला संघ मजबूत आहे आणि गमंतीचा भाग असा की, अर्जेंटीना – ज्यांनी सुवर्णपदक मिळवले, त्यांनी संपूर्ण स्पर्धेत एकच सामना गमावला, त्यांना पराभूत करणारे कोण होते ? भारतीय खेळाडूच होते. आता येणारा काळ निश्चितच आपल्यासाठी चांगला असेल.
मुष्टि युध्दात विकास कृष्ण यादव उपउपांत्य फेरीपर्यंत पोहोचले, मात्र कांस्य पदक मिळू शकले नाही. काही खेळाडूंची कामगिरी चांगली होती, उदाहरणार्थ आदिती अशोक, दत्तू भोकनळ, अतनु दास… माझ्या देशबांधवांनो, आपल्याला बरेच काही करायचे आहे पण आतापर्यंत जे काही करत आलोत, तसेच काही करत राहिलो तर पुन्हा आपल्या पदरी निराशा येईल… मी एका समितीची घोषणा केली आहे. भारत सरकारची ही समिती सखोल अभ्यास करेल. जगभरात खेळांबाबत काय काय केले जाते, याचा अभ्यास समिती करेल. आपण काय चांगले करु शकतो, या बाबतचा आराखडा समिती तयार करेल. 2020, 2024, 2028 आपल्याला दूरदृष्टीने योजना बनवायची आहे. राज्य शासनांनाही माझा आग्रह आहे की त्यांनीही अशा समित्या स्थापन कराव्यात, क्रीडा क्षेत्रात आपण काय करु शकतो, आपले एकेक राज्य काय करु शकते, राज्यांनी एक, दोन खेळ पसंत करावेत आणि त्या खेळात आपण किती ताकद दाखवू शकतो, याचा विचार करावा.

माझा खेळ जगतातल्या संघटनांनाही आग्रह आहे की, त्यांयनीही नि:पक्षपणाने चिंतन करावे आणि हिंदुस्तानच्या नागरिकांनाही आवाहन आहे, ज्यांना त्यात आवड आहे, त्यांनी नरेंद्र मोदी ॲपवर सूचना द्याव्यात…. संघटनांनी चर्चा करुन निवेदने सरकारकडे पाठवावी. राज्यशासनांनी सखोल चर्चा करुन आपल्या सूचना पाठवाव्या. आपण संपूर्ण तयारी करु आणि मला विश्वास आहे की, आपण सव्वाशे कोटी देशवासीय 65 टक्के युवक लोकसंख्या असलेला देश, आपण मिळून, क्रीडा जगतात उत्तम स्थिती प्राप्ता करुया… या संकल्पाने पुढची वाटचाल करायची आहे.

देशबांधवांनो, पाच सप्टेंबर शिक्षक दिन ! काही वर्षांपासून शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी विद्यार्थ्यांबरोबर वेळ देतो आहे आणि त्यांच्यातीलच एक विद्यार्थी होऊन मी वेळ घालवत होतो. मी या विद्यार्थ्यांकडूनही बरेच काही शिकत होतो. माझ्यासाठी 5 सप्टेंबर हा “शिक्षक दिन” ही होता आणि “शिक्षण दिनही”! परंतु यावेळेस जी-20 शिखर परिषदेसाठी मला जावे लागत आहे…..त्यामुळे मनात असा विचार आहे की, याविषयी मन की बातमध्ये माझ्या भावना व्यक्त कराव्यात…

जीवनात “आईचे” जे स्थान आहे तेच स्थान “शिक्षकांचेही” आहे. असेही शिक्षक मी पाहिलेत की “स्वत:पेक्षाही ज्यांना आपल्या माणसांची चिंताच अधिक असते. ते आपल्‍या शिष्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, आपले आयुष्य वेचतात. सध्या रिओ ऑलिंम्पिकनंतर, सगळीकडे पुल्लेला गोपीचंद यांची चर्चा आहे. ते क्रीडापटू तर आहेतच, परंतु उत्कृष्ट शिक्षक कसा असतो, याचे उदाहरणच त्यांनी सादर केले आहे. मी गोपीचंदजी यांना आज खेळाडू व्यतिरिक्त शिक्षकाच्या रुपात पाहतो आहे आणि शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुल्लेला गोपीचंदजी यांना त्यांची तपस्या, खेळाप्रती त्यांचे समर्पण आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आनंद मानण्याच्या त्यांच्या वृत्तीला, मी सलाम करतो. आपल्या सर्वांच्या जीवनात शिक्षकांचे योगदान नेहमीच जाणवते. 5 सप्टेंबर, भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, आणि संपूर्ण देश या दिवसाला शिक्षक दिन म्हणून मानतो. ते जीवनात कोणत्याही स्थानावर पोहोचले तरीही, त्यांनी स्वत: शिक्षकाच्या भूमिकेतच जगण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर, ते म्हणायचे, “चांगला शिक्षक तोच, की ज्याच्यातला विद्यार्थी कधी संपत नाही”. राष्ट्रपती पदावर असूनही, आपल्यातला विद्यार्थी जागृत ठेवणे, शिक्षकांचे मन जागते ठेवणे असे अद्‌भूत जीवन डॉ. राधाकृष्णजी यांनी आपल्यासमोर ठेवले आहे.

मी कधी कधी विचार करतो तेव्हा मला माझ्या शिक्षकांच्या बऱ्याच गोष्टी आठवतात कारण आमच्या छोटया गावातले तेच तर आमचे नायक होते-हिरो होते. पण आज मी आनंदाने सांगतोय, की माझ्या एका शिक्षकाचे वय नव्वदीचे आहे. आजही प्रत्येक महिन्याला त्यांचे पत्र मला येते. हाताने लिहिलेली चिठ्ठी येते. महिन्याभरात त्यांनी कोणती पुस्तके वाचली, त्याचा विचार असतो, विशेष नोंदी असतात. महिन्याभरात मी काय केले, त्यांच्या दृष्टीने ते चांगले होते की नाही… जसे आजही ते वर्गात येऊन शिकवत आहेत. आजही दुरस्थ पध्दतीचे शिक्षणच जणू ते देत आहेत. आज नव्वदीतही, त्यांचे जे हस्ताक्षर आहे, त्याने मी चकित होतो….की, इतक्या सुंदर हस्ताक्षरात लिहितात आणि माझे स्वत:चे अक्षर खूपच खराब आहे. त्यामुळे कोणाचे चांगले हस्ताक्षर दिसले, की माझ्या मनात आदरभाव वाढतो. आपल्या शिक्षकांमुळे, आपल्या जीवनात जे काही चांगले घडले, हे जर आपण इतरांना सांगितले तर शिक्षकांच्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात परिवर्तन येईल. गौरव होईल. समाजात शिक्षकांचा गौरव वाढवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आपण नरेंद्र मोदी ॲपवर आपल्या शिक्षकांसह फोटो असेल, चांगली आठवण असेल, प्रेरक गोष्ट असेल, तर आपण जरुर शेअर करा…लक्षात घ्या, विद्यार्थ्यांच्या नजरेतून शिक्षकांचे योगदान पाहणे, आपल्यासाठी मौल्यवान असेल.

देशबांधवांनो, काही दिवसातच गणेशोत्सव येईल. गणेशजी विघ्नहर्ता आहेत. आपल्या सगळयांना असे वाटते की आपला देश, आपला समाज, आपला परिवार, प्रत्येक व्यक्ती, त्यांचे जीवन निर्विघ्न असावे. जेव्हा गणेशोत्सवाचा आपण विचार करतो, तेव्हा लोकमान्य टिळक यांची आठवणे येणे, स्वाभाविक आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा हे लोकमान्य टिळकांचे देणे आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाद्वारा, या धार्मिक निमित्ताला त्यांनी राष्ट्र जागृतीचे पर्व बनवले. सामाजिक संस्काराचे पर्व बनवले. या माध्यमातून समाज जीवनाला स्पर्श करणाऱ्या विषयांवर चर्चा व्हायला हवी. कार्यक्रमांची रचना अशी हवी की, समाजाला नवी प्रेरणा, नवे तेज मिळावे, याबरोबरच त्यांनी दिलेला “स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” हा मंत्र केंद्रस्थानी असावा की. आजसुध्दा केवळ महाराष्ट्रातच नाही तर हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात गणेशोत्सव होऊ लागलाय. सगळे युवक या उत्सवासाठी जय्यत तयारीही करतात. प्रचंड उत्साह असतो. आतापर्यंत काही लोकांनी लोकमान्य टिळकांनी जी भावना ठेवली होती, त्याचे अनुकरण करायचा खूपसा प्रयत्नही केला आहे. सार्वजनिक विषयांवर चर्चा केली जाते, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा भरवल्या जातात. त्या मधूनसुध्दा कलात्मक ढंगातून सामाजिक विषयांना स्पर्श केला जातो. एक प्रकारच्या लोकशिक्षणाचे अभियानच जणू गणेश उत्सवाच्या माध्यमातून सुरु असते, लोकमान्य टिळकांनी आपल्याला स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, हा प्रेरक मंत्र दिला. आता आपण स्वतंत्र हिंदुस्थानात आहोत. आता आपण सुराज आमचा हक्क आहे, सुराजाच्या दिशेने वाटचाल करुया, सुराजाला आमचे प्राधान्य आहे या मंत्राचा संदेश आपण सार्वजनिक गणेश उत्सवातून नाही देऊ शकत का ? मी आपल्याला निमंत्रण करत आहे.

ही गोष्ट खरी आहे की, उत्सव ही समाजाची शक्ती असते. उत्सवामुळे व्यक्ती आणि समाजात नवचैतन्य येते. उत्सवाशिवाय जीवन अशक्य आहे. परंतु काळाच्या मागणीप्रमाणे त्यात बदल होणे अपेक्षित आहे.

यावेळी माझ्या असे लक्षात आले आहे की, काही लोकांनी, विशेष करुन गणेशोत्सव, दूर्गापूजा यावर बरेच लिहिलेय आणि त्यांना चिंता आहे, पर्यावरणाची ! शंकर नारायण प्रशांत लिहितात-त्यांनी आग्रहाने म्हटलेय की, मोदी जी, मन की बातच्या माध्यमातून लोकांना सांगा की प्लॅस्टर ऑफ पॅरिसने बनवलेल्या मूर्ति वापरु नका. गावच्या तलावातल्या मातीतून तयार झालेल्या गणेश मूर्तीचा उपयोग करा. पीओपी मधून बनवलेल्या मूर्ती पर्यावरणाला अनुकूल नाहीत. ही वेदना तीव्रपणाने जशी त्यांनी मांडली तशी इतरांनीही ती सांगितली आहे. माझी आपणा सर्वांना प्रार्थना आहे की, पुरातन काळासारखे शाडूच्या गणेश आणि दुर्गामातेच्या मूर्तीचा उपयोग करावा आणि आपल्या जुन्या परंपरा का अनुसरु नयेत. पर्यारणाचे रक्षण, आपल्या नदी तलावाचे संरक्षण, प्रदूषणापासून छोटया छोटया जीवांचे रक्षण ही सुध्दा एक प्रकारे ईश्वर सेवाच आहे. गणेशजी विघ्नहर्ता आहेत. म्‍हणूनच आपल्याला अशा गणेशमूर्ती नकोत की ज्यातून विघ्न निर्माण होईल. माझ्या या मुद्दयांना आपण कोणत्या भावनेतून घ्याल, याची मला माहिती नाही, मात्र मी एकटाच हे सांगत नाही तर अनेकांचे हेच मत आहे. काहींच्या मतातून असे जाणवले की पुण्याचे मूर्तिकार अभिजीत धोंडफळे, कोल्हापूरच्या संस्था-निसर्ग मित्र, विज्ञान प्रबोधिनी! विदर्भातला निसर्ग कट्टा, पुण्याची ज्ञान प्रबोधिनी, मुंबईतला गिरगावचा राजा, अशा अनेक संस्था शाडूच्या गणपतींसाठी खूप कष्ट घेतात. प्रचार करतात. पर्यावरण स्नेही गणेशोत्सव- ही देखील एक समाजसेवाच आहे. दूर्गापूजेला बराच वेळ आहे. जे जुने परिवार – जे अशा मूर्ती तयार करतात त्यांनाही रोजगार मिळेल, ज्या तलावाच्या मातीतून मूर्ति बनतील, त्या पुन्हा तिथेच जातील. यातून पर्यावरणाचे संरक्षणही होईल. आपल्या सर्वांना गणेशचतुर्थीच्या खूप शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारत रत्न मदर तेरेसा यांना 4 सप्टेंबरला संत उपाधीने विभूषित केले जाईल. मदर तेरेसा यांनी आपले संपूर्ण जीवन भारतातल्या गरीबांच्या सेवेसाठी समर्पित केले होते. त्यांचा जन्म तर अल्बानी यामध्ये झाला होता. त्यांची भाषाही इंग्रजी नव्हती. पण त्यांनी आपले जीवन वेचले, गरीबांच्या सेवेयोग्य बनण्यासाठी खूप प्रयत्न केले. ज्यांनी आयुष्यभर भारतातल्या गरीबांची सेवा केली, अशा मदर तेरेसा यांना संत उपाधी मिळते, तेव्हा सर्व भारतीयांना अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. 4 सप्टेंबरला हा समारंभ होईल, त्यात सव्वाशे कोटी भारतीयांच्या वतीने भारत सरकार, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ तिथे पावेल. संत, ऋषि-मुनी यांच्याकडून प्रत्येक क्षणी आपल्याला काही न काही शिकवण मिळते. आपल्याला काही न काही प्राप्त होते. माझ्या प्रिय देशबांधवांनो, विकास जेव्हा जन आंदोलन बनते, तेव्हा मोठे परिवर्तन होते. जनशक्ति हे ईश्वराचे रुप. भारत सरकारने मागच्या काही दिवसात, पाच राज्य सरकारच्या सहकार्याने स्वच्छ गंगा, गंगेच्या स्वच्छतेसाठी लोकांना एकत्र आणायचा यशस्वी प्रयत्न केला. या महिन्याच्या वीस तारखेला अलाहाबाद इथे गंगा किनाऱ्यावरच्या गावप्रमुखांना निमंत्रित केले गेले. पुरुषही होते; महिलाही होत्या. ते सर्वजण गंगेच्या किनाऱ्यावर आले आणि गावप्रमुखांनी गंगामातेच्या साक्षीने प्रतिज्ञा केली की, गंगेच्या किनाऱ्यावर असलेल्या गावात उघड्यावर शौचाला जाणे, तात्काळ बंद करतील. ते शौचालय बनवायचे अभियान चालवतील आणि गंगा सफाईसाठी संपूर्ण गाव योगदान देईल. गंगेतही घाण होवू देणार नाही. या संकल्पासाठी अलाहाबाद इथे आल्याबद्दल या सर्व प्रमुखांना – कोणी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहारहून कोणी आले तर कोणी झारखंड, पश्चिम बंगालमधून आले, त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. मी भारत सरकारच्या सर्व मंत्रालयांचे, मंत्र्यांचे अभिनंदन करतो – ज्यांनी ही कल्पना साकार केली. मी त्या सर्व पाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचेही अभिनंदन करतो कि, त्यांनी जनशक्तिला एकत्र आणून गंगेच्या स्वच्छता मोहिमेत एक निश्चित पाऊल उचलले आहे.

देशबांधवांनो, काही काही गोष्टी माझ्या मनाला स्पर्शून जातात, भावतात, ज्यांना याची कल्पना येते त्यांच्याप्रति माझ्या मनात एक विशेष प्रकारचा आदरही आहे. पंधरा जुलै रोजी छत्तीसगढच्या कबीरधाम जिल्ह्यातल्या सतराशे शाळातल्या सुमारे सव्वालाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना चिठ्ठी लिहिली. कोणी इंग्रजीतून तर कोणी हिंदीतून लिहिली; तर कोणी छत्तीसगढीतून लिहिले की, आपल्या घरात शौचालय असायला हवे. शौचालय बनवण्याची मागणी त्यांनी केली. काही मुलांनी तर असे लिहिले की यावर्षी माझा वाढदिवस साजरा झाला नाही तरी चालेल, पण शौचालय जरुर बनवून घ्या. सात ते सतरा वर्षांच्या या मुलांनी हे काम केले. याचा एवढा प्रभाव पडला आणि भावनिक परिणाम झाला की, दुसऱ्या दिवशी शाळेला जाताना, शिक्षकांना देण्यासाठी आई-वडिलांनी चिठ्ठी लिहून दिली आणि त्या चिठ्ठीत आश्वासन होते की, अमूक एक तारखेपर्यंत घरात आम्ही शौचालय बनवून घेवू. ज्यांनी ही कल्पना मांडली त्यांचेही अभिनंदन, ज्यांनी त्यासाठी प्रयत्न केले, त्या विद्यार्थ्यांचेही अभिनंदन आणि पालकांचे विशेष अभिनंदन की त्यांनी मुलांची चिठ्ठी गांभीर्याने मनावर घेवून शौचालय बनवायचे काम करायचा निर्णय घेतला. अशा गोष्टीतूनच आम्हाला प्रेरणा मिळते.

कर्नाटकचा कोप्पाल जिल्हा. या जिल्ह्यातली सोळा वर्षाची एक कन्या- मल्लमा – या कन्येने तर आपल्या कुटुंबाविरोधातच सत्याग्रह पुकारला. सत्याग्रहाला ती बसली. असे सांगितले गेले की, तिने अन्नपाणी वर्ज्य केले. हे सर्व स्वत:साठी काही मागण्यासाठी नाही, चांगल्या कपडे मिळावे यासाठी नाही, मिठाईसाठी नाही तर या मुलीची जिद्द अशी की, आपल्या घरात शौचालय पाहिजे. त्या कुटुंबाची आर्थिक पत तेवढी नव्हती, पण ती मुलगी जिद्दीला पेटली होती. आपला सत्याग्रह सोडायला तयार नव्हती. गाव प्रमुख मोहम्मद शफींना ही गोष्ट समजली की मल्लमाने शौचालयासाठी सत्याग्रह केला. या गावप्रमुख मोहम्मद शफींची वैशिष्ट्य बघा; त्यांनी अठरा हजार रुपये जमा केले आणि आठवड्याच्या आत शौचालय बनवले. ही मल्लमाच्या जिद्दीची ताकत आहे, आणि गावप्रमुख मोहम्मद शफीची ताकत आहे. समस्या निवारणासाठी कसे मार्ग उपलब्ध होतात, हीच जनशक्ती आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, स्वच्छ भारत हे तर प्रत्येक भारतीयांचे स्वप्न झाले आहे. काही भारतीयांचा तो संकल्प आहे. काही भारतीयांनी तर आपले उद्दिष्ट बनवले आहे. परंतु, प्रत्येक जण या ना त्या रुपात जोडला गेला आहे, प्रत्येक जण कोणते ना कोणते योगदान देतो आहे. रोज बातम्या येत असतात – कोण काय काय प्रयत्न करतात! भारत सरकारने विचार मांडला, लोकांना आवाहन केले की, आपण दोन-तीन मिनिटांची स्वच्छतेवरची फिल्म बनवा. हा लघुपट भारत सरकारकडे पाठवा. संकेतस्थळावर ही माहिती मिळेल. त्यासाठी स्पर्धा होईल आणि विजेत्यांना 2 ऑक्टोबर गांधी जयंतीला बक्षीस दिले जाईल. मी तर टीव्ही वाहिन्यांना सांगेन की आपणही अशा स्पर्धा भरवा. नवनिर्मितीच्या कल्पना सुद्धा स्वच्छता अभियानाला ताकत देऊ शकतात. नवी घोषवाक्य मिळतील. नवीन तंत्र समजेल, नवी प्रेरणा मिळेल आणि हे सुद्धा जनता जनार्दनाच्या सहभागातून, सर्वसामान्य कलाकारांकडून आणि हे गरजेचे नाही की, मोठा स्टुडीओ पाहिजे – मोठा कॅमेरा पाहिजे, अरे, आजकाल तर आपण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने फिल्म बनवू शकतो. चला, पुढे या… आपल्याला माझे निमंत्रण आहे.

देशबांधवांनो, भारताचे नेहमीच शेजारी देशांशी सौहार्दाचे संबंध असावेत, अशी नेहमीच इच्छा राहिली आहे. एक महत्त्वाची गोष्ट गेल्या काही दिवसात घडली; आपले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कोलकातामध्ये एका नव्या कार्यक्रमाची सुरुवात केली – “आकाशवाणी मैत्री चॅनल” आता लोकांना असे वाटेल की, राष्ट्रपतींनी आता काय रेडियोच्या चॅनेलच उद्‌घाटन करावे का? मात्र, हे सामान्य रेडियोचे चॅनेल नाही. एक महत्त्वाचे पाऊल आहे. आपल्या शेजारी बांगलादेश आहे. बांगलादेश आणि पश्चिमबंगाल आज एकाच सांस्कृतिक परंपरेने जोडलेले आहे, हे आपल्याला माहिती आहे. इकडे आकाशवाणी मैत्री तर तिकडे “बांगलादेश बेतार! ते आपापसात संपर्क करतील आणि कल्पनांची देवाणघेवाण करतील. दोन्हीकडचे बांगलाभाषी लोक आकाशवाणीचा आनंद घेतील. ‘लोकांचा लोकांशी संपर्क’ ह्याबाबत आकाशवाणीचे मोठे योगदान आहे. राष्ट्रपतींनी हे चॅनलचे उद्‌घाटन केले. या कार्यक्रमासाठी आमच्या बरोबर राहून काम केले, त्याबद्दल बांगलादेशचे आभार! मी आकाशवाणीच्या सर्व मित्रांनाही शुभेच्छा देतो की, परराष्ट्र धोरणातही ते आपले योगदान देत आहेत.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपण माझ्याकडे भले पंतप्रधान पदाची धुरा सोपवली मात्र, शेवटी मी आपल्यासारखाच एक माणूस आहे. कधी कधी भावूक घटना मला जास्तच स्पर्शून जातात. अशा काही भावूक घटना नवीन शक्तिही देतात, प्रेरणाही देतात आणि यातून भारतीय लोकांसाठी काही ना काही करण्याची मलाही प्रेरणा मिळते. काही दिवसांपूर्वी मला एक पत्र मिळाले. ते पत्र माझ्या मनाला स्पर्शून गेले. एक 84 वर्षाची आई-जी निवृत्त शिक्षक आहे – त्यांनी मला पत्र लिहिले. माझे नाव घोषित करु नये, असे जरी मला सांगितले असले तरी त्यांचे नाव सांगावे, असे मनाला वाटत आहे. चिठ्ठीत त्यांनी असे म्हटलेय की, गॅस अनुदान सोडण्याचे आवाहन आपण केले, त्याचवेळी अनुदान सोडून दिले. नंतर मी हे विसरुन गेले. मात्र, काही दिवसांपूर्वी आपला कोणी एक माणूस आला आणि त्याने एक पत्र दिले. त्यात Give it up साठी मला धन्यवाद दिले. माझ्यासाठी भारताच्या पंतप्रधानांचे हे पत्र, पद्मश्रीपेक्षा कमी नाही.

देशवासीयांनो, ज्यांनी स्वयंपाकाच्या गॅसवरची सबसिडी सोडून दिली, त्यांना एक पत्र द्यावे, याचा प्रयत्न केला. कोणी ना कोणी माझा प्रतिनिधी ते पत्र देईल. एक कोटीपेक्षा अधिक लोकांना पत्र द्यायचा माझा प्रयत्न आहे. त्या योजनेतूनच ते पत्र त्या आईला मिळाले. त्यांनी मला लिहिलेय की, तुम्ही चांगले काम करत आहात. गरीब मातांची चुलीच्या धुरापासून मुक्तता करायचे आपले अभियान आणि मी एक निवृत्त शिक्षिका, काही वर्षातच माझे वय नव्वद होईल. मी पन्नास हजार रुपयांचे देणगी पाठवत आहे, ज्यातून चुलीच्या धुरातून गरीब मातांची सुटका होईल, त्यासाठी ते उपयोगात आणावे. आपल्याला माहिती आहे की, एका सामान्य शिक्षकांच्या निवृत्ती वेतनातून उदरनिर्वाह करणारी एक आई, जेव्हा 50 हजार रुपये गरीब मातांच्या गॅस जोडणीसाठी देते. प्रश्न पन्नास हजार रुपयांचा नाही. प्रश्न त्या मातेच्या भावनेचा आहे. अशा कोटी कोटी माता-भगिनींचे हे आशिर्वादच आहेत, ज्यातून माझा देशाच्या भविष्यावरचा विश्वास दृढ होत जातो. त्यांनी ही चिठ्ठी मला पंतप्रधान या नात्याने लिहिली नाही तर साधेसुधे पत्र लिहिले – मोदी भैय्या! अशा मातेला मी प्रणाम करतो. अशा कोटी कोटी मातांनाही माझा प्रणाम! की जे स्वत: श्रम करुन इतरांचे भले करण्यासाठी झटतात.

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

गेल्या वर्षी दुष्काळामुळे आपण त्रस्त होतो. मात्र, या ऑगस्ट महिन्यात सातत्याने पूरस्थिती उद्‌भवते आहे. देशाच्या काही भागात वारंवार पूर परिस्थिती आली. राज्य शासनाने, केंद्र शासनाने, स्थानिक स्वराज्य संस्थांनी, सामाजिक संस्थांनी – नागरिकांनी जेवढे सहाय्य करता येईल तेवढे केले. प्रयत्न केले. परंतु, पूरपरिस्थितीच्या बातम्यांमधे काही बातम्या अशा आहेत की त्याचे स्मरण करणे आवश्यक होते. एकतेची ताकद काय असते, बरोबरीने साथीने वाटचाल केली तर किती मोठा परिणाम साधू शकतो, यासाठी हा ऑगस्ट महिना लक्षात राहील. ऑगस्ट 2016 मध्ये राजकीय विरोध असणारे पक्ष, एकमेकांविरुद्ध एकही संधी न दवडणारे पक्ष, या सर्व राजकीय पक्षांनी मिळून जीएसटी विधेयक मंजूर केली. याचे श्रेय सर्व राजकीय पक्षांना जाते आणि सर्व पक्ष मिळून एकत्र वाटचाल करु लागले तर केवढे मोठे काम होते; याचे हे उदाहरण आहे. अशा प्रकारे, काश्मीरमध्ये जे काही झाले, त्या स्थितीच्या संबंधाने, देशाच्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे एका स्वरात मुद्दा लावून धरला. जगाला संदेश दिला, फुटीरतावादी दलांनाही संदेश दिला आणि काश्मीरी नागरिकांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आणि काश्मीरप्रश्नी सर्व पक्षांबरोबर माझी जी चर्चा झाली, त्यातून एक विचार जागृत होत होता. थोडक्यात सांगायचे तर मी सांगेन की एकता आणि ममता या दोन गोष्टी मूलमंत्र होत्या. आपल्या सर्वांचे हे मत आहे, सव्वाशेकोटी देशबांधवांचे हे मत आहे. गावप्रमुखांपासून पंतप्रधानांपर्यंत मत आहे की, काश्मीरमध्ये जर कोणाला प्राणाला मुकावे लागले, मग तो युवक असो किंवा सैनिक, हे नुकसान आपलेच आहे, आपल्या देशाचे आहे. जे लोक या छोट्या छोट्या मुलांना पुढे करुन अशांतता निर्माण करायचा प्रयत्न करतात, पुढे जाऊन त्यांना कधी ना कधी निर्दोष बालकांना याची उत्तरे द्यावी लागतील.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, देश मोठा आहे. विविधतेने नटलेला आहे. विविधतेने नटलेल्या या देशाला एकतेच्या बंधनात बांधून, नागरिक या नात्याने, समाज या नात्याने, सरकार या नात्याने सर्वांचे हे दायित्व आहे की, एकतेला बळ देणाऱ्या गोष्टींना आपण ताकत देऊ आणि तेव्हाच देशाच भविष्य उज्ज्वल होईल. माझा सव्वाशे कोटी जनतेच्या शक्तिवर माझा पूर्ण विश्वास आहे.

बस, आज इतकेच! खूप खूप धन्यवाद!

M.Desai/S.Tupe/N.Chitale/Anagha