Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरातमधील माँ उमिया धाम विकास प्रकल्पाची कोनशीला ठेवण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले

गुजरातमधील माँ उमिया धाम विकास प्रकल्पाची कोनशीला ठेवण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले


नवी दिल्‍ली, 13 डिसेंबर 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील उमिया माता धाम मंदिर आणि मंदिर परिसराचा समावेश असलेल्या माँ उमिया धाम विकास प्रकल्पाची कोनशीला ठेवण्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.

पंतप्रधान म्हणाले की हा प्रकल्प म्हणजे ‘सबका प्रयास’चे उत्तम उदाहरण आहे कारण या पवित्र प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न उपयुक्त ठरणार आहेत. सामान्य लोकांची सेवा करणे हे सर्वात मोठे पुण्यकर्म असल्यामुळे, भाविकांनी या प्रकल्पाच्या कामात अध्यात्मिक उपासनेच्या तसेच समाज सेवेच्या भावनेने सहभागी झाले पाहिजे या मुद्द्यावर त्यांनी बोलताना अधिक भर दिला.

कोणत्याही संघटनेच्या सर्व पैलूंमध्ये कौशल्य विकासाच्या घटकाचा अंतर्भाव करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. “पूर्वी, आमच्या काळात, कौशल्याचा वारसा सहजपणे पुढच्या पिढीकडे दिला जाईल अशा पद्धतीने कुटुंबाची रचना केलेली असे. आता सामाजिक परिस्थितीमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे कौशल्याची परंपरा हस्तांतरित करण्यासाठीची आवश्यक यंत्रणा उभारून आपल्याला हे उद्दिष्ट साध्य करावे लागेल,” असे पंतप्रधानांनी सांगितले. 

बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेदरम्यान  उंझा येथील भेटीची मोदींनी आठवण करून दिली. त्या भेटीदरम्यान त्यांनी मुलींच्या जन्मदरात झालेली तीव्र घसरण हा कलंक असल्याचे म्हटले होते. आव्हान स्वीकारल्याबद्दल त्यांनी लोकांचे आभार मानले आणि आता हळूहळू अशी परिस्थिती निर्माण होत आहे ज्यात मुलींची संख्या जवळपास मुलांच्या इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे, त्यांनी उमिया मातेचे घेतलेले आशीर्वाद आणि त्या प्रदेशातील पाण्याची परिस्थिती हाताळण्यात भक्तांच्या सहभागाची आठवण सांगितली. ठिबक सिंचन पद्धतीचा मोठ्या प्रमाणात अवलंब केल्याबद्दल त्यांनी सहभागींचे आभार मानले.

पंतप्रधान म्हणाले की जर माता उमिया आध्यात्मिक मार्गदर्शक असेल तर आपली भूमी हे आपले जीवन आहे. प्रदेशात मृदा आरोग्य कार्डचा अवलंब केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी उत्तर गुजरात भागातील लोकांना सेंद्रिय शेतीकडे वळायला सांगितले. सेंद्रिय शेतीला शून्य बजेट शेती असेही म्हणता येईल. “ठीक आहे, जर तुम्हाला माझी विनंती योग्य वाटली नाही तर मी तुम्हाला एक पर्याय सुचवेन. तुमच्याकडे 2 एकर शेतजमीन असल्यास, किमान 1 एकरमध्ये सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न करा आणि उर्वरित 1 एकरवर नेहमीप्रमाणे शेती करा. आणखी एक वर्ष असा प्रयत्न करा. जर तुम्हाला ते फायदेशीर वाटले तर तुम्ही संपूर्ण 2 एकरासाठी सेंद्रिय शेतीकडे वळू शकता. यामुळे खर्चात बचत होईल आणि आपल्या जमिनीचे पुनरुज्जीवन होईल” असे ते म्हणाले. 16 डिसेंबर रोजी सेंद्रिय शेतीवरील कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण त्यांनी दिले. तसेच नवीन पीक पद्धती आणि पिके स्वीकारण्याची त्यांनी विनंती केली.

* * *

S.Tupe/Sushma/Sanjana/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com