Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वातंत्र्य चळवळीच्या ७५ व्या उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण

स्वातंत्र्य चळवळीच्या ७५ व्या उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण

स्वातंत्र्य चळवळीच्या ७५ व्या उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण


आज ऑगस्ट क्रांती दिवस आहे. आठ ऑगस्ट रोजी महात्मा गांधीनी इंग्रजाना ‘भारत छोडो’ असे निर्वाणीचे आवाहन करत, संपूर्ण स्वातंत्र्याचा एल्गार पुकारला होता.आणि ९ ऑगस्टला इंग्रजांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरलेल्या सर्व वेड्या वीरांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. या घटनेला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या ऐतिहासिक घटनेला येत्या १५ ऑगस्टला ७० वर्षे पूर्ण होतील. त्यामुळे या स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करण्याचा, त्यांच्या बालीदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक उत्तम संधी आपल्याला मिळाली आहे. या सगळ्यांमुळेच आपण आज स्वतंत्र भारतात श्वास घेऊ शकतो आहोत. आज ज्या स्वातंत्र्याचा आपण उपभोग घेतो आहोत, ते स्वातंत्र्य झपाटलेल्या वीरांच्या कर्तृत्वामुळेच आपल्याला मिळाले आहे. आपल्या या पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावली, घरदारावर, कुटुंबावर तुळशीपत्र ठेवले. आपले सर्वस्व देशासाठी समर्पित केले. त्यांचे वंशज म्हणून आपले, सव्वाशे कोटी भारतीयांचे हे कर्तव्य आहे की, आपण या सर्व महापुरुषांचे स्मरण करावे. ज्या महान उद्दिष्टासाठी हे सर्व महापुरुष इंग्रजांशी आयुष्यभर लढले, त्या उद्दिष्टांची पूर्ती करण्याची शपथ आपण घ्यायला हवी. ज्या भारताचे स्वप्न त्यांनी पाहिले, जोपासले होते, समृद्ध भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी जो संकल्प केला होता, त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी आपण प्रत्येकाने काही ना काही तरी जबाबदारी घेऊन आपले कर्तव्य निभावले पाहिजे. प्रत्येक भारतीयांचे स्वप्न असायला हवे की मी देशासाठी काहीतरी करेन.

जेव्हा आपण तंट्या भिल किंवा भीमा नायक यांची आठवण करतो,जेव्हा आपण देशासाठी आयुष्य वेचणाऱ्या राणा बख्तियार यांचे स्मरण करतो तेव्हा अशा महापुरुषांचे जीवनचारित्र पहिले तर आपल्या लक्षात येत की हे सगळे स्वतःसाठी आयुष्याचा एक क्षणही जगले नाहीत, संपूर्ण आयुष्य देशसेवेला वाहून दिले.त्याना कदाचित शिक्षणाची संधी मिळाली नसेल मात्र स्वातंत्र्याचा अर्थ काय हे त्याना नक्की कळत होते, आणि ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जीवाची कुरवंडी करायला ते हसत हसत तयार झाले होते.

क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मभूमीत इथे आझाद मंदिरात येऊन वंदन करण्याची संधी मला मिळाली हे माझे सौभाग्य आहे. जेव्हा आपण अशा महापुरुषांचे स्मरण करतो, तेव्हा आपल्यालाही देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. बंधू भगिनीनो, आपल्यापैकी अनेकजण असे आहेत की जे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्माला आले आहेत. ज्यांनी पारतंत्र्य काय असते हे बघितलेच नाही, अशी मोठी लोकसंख्या आज भारतात आहे. आपण स्वतंत्र हिंदुस्थानात जन्माला आलो आहोत. जे लोक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, त्याना तर देशासाठी मरण्याची संधी मिळाली. देशासाठी सर्वस्वाचा, घरादाराचा त्याग करण्याची संधी मिळाली. ही संधी ज्यांना मिळाली, ते सगळे लोक अमर झालेत. आपल्याला मात्र ते सौभाग्य लाभले नाही. मात्र आज जेव्हा आपण ऑगस्ट क्रांतीचे ७५ वे वर्ष साजरे करतोय, आणि देशाच्या स्वातंत्र्याची 70 वर्षे साजरी करणार आहोत, तेव्हा आपणही संकल्प करायला हवा की आपल्याला चंद्रशेखर आझाद,भीमा नायक किंवा तंट्या भिल्ल यांच्याप्रमाणे देशासाठी मरण्याची संधी तर नाही मिळाली, मात्र देशासाठी जगण्याची संधी तर मिळाली आहे. आणि आपली कसोटी केवळ यातच नसते की आपण देशासाठी बलिदान दिले तरच महान होऊ. आज देशासाठी बलिदान देण्याची गरज नाही. तर जिवंत राहून देशासाठी कार्य करण्याची गरज आहे. गावं असेल, गरीब जनता असेल, दलित, पीडित, शोषित , वंचित अशा सर्वांच्या आयुष्यात बदल आणणायासाठी, सुख आणण्यासाठी, त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी नाही का? स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापनदिनाला आपण याचा संकल्प करायला हवा, की आपल्या देशातल्या प्रत्येक गावात वीज पोचायला हवी.

बंधू भगिनीनो, 70 वर्ष हा काही कमी काळ नाही मात्र आजही भारतात अशी अनेक गावे आहेत जिथे विजेचा एक खांबही नाही ,की विजेची तार पोहचलेली नाही.त्या गावातले लोक आज २१व्या शतकातही १८व्या शतकातील आयुष्यच जगताहेत. संध्याकाळी जेव्हा सूर्यास्तानंतर त्यांचे आयुष्य अंधारात बुडून जाते तेव्हा त्यांच्या मनातही विचार येत असेल की या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान केलं ,त्या स्वतंत्र देशात मला वीज कधी मिळणार ? बंधू भगिनींनो , मी जेव्हा सरकारमध्ये आलो,ते व्हा जरा हिशेब विचारला की किती गावांत वीज नाही ? तेव्हा मला कळलं की 18 हजारहून अधिक गावे अशी आहेत जिथे अद्याप वीज पोहचलेली नाही. आज 21 व्या शतकातही वीज काय असते याचा त्यांना अनुभवच घेतलेला नाही.त्यानंतर, बंधू भगिनींनो मी विडाच उचलला की या 18 हजार गावात वीज पोहचवेन. गेल्या वर्षी 15 ऑगस्टला लाल किल्यावरून केलेल्या भाषणात मी घोषणा केली होती की एक हजार दिवसांच्या आत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. जे काम गेल्या 70 वर्षात पूर्ण झालं नाही ते एक हजार दिवसात पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. माझ्या बंधू भगिनींनो ,अजून एक वर्षही पूर्ण झालेलं नाही आणि जवळपास अर्ध्यापेक्षा अधिक गावांत वीज पोचवण्याचे काम पूर्ण झाले आहे. वीज पोचली आहे , खांब लागले आहेत तारा लागल्या आहेत , घरात होल्डर लागले आहेत. मुलांनी विजेच्या प्रकाशात अभ्यासही सुरु केला आहे. विकास व्हायला हवा,प्रत्येक सरकार विकासासाठीच काम करत असते. मी असं म्हणत नाही की सत्तर वर्षात कोणी काही कामच केले नाही, मात्र सत्तर वर्षात जेवढे काम व्हायला हवे होते, तेवढे झाले नाही ,आणि त्याचेच दुष्परिणाम आपण आज भोगतो आहोत. मला या संकटातून देशाला बाहेर काढायचे आहे.

आपल्या देशातल्या मुलीबाळी आजही जर शिक्षणापासून वंचित राहत असतील , शाळा असेल, शिक्षक असतील, गावात बालके असतील आणि तरीही शिक्षण मिळत नसेल तर मग , माझ्या देशबांधवानो, आज स्वातंत्र्याच्या 70व्या वर्षी आपण संकल्प करूया की आपल्या गावातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, त्याला/ तिला शाळा सोडावी लागणार नाही, याची आपण काळजी घेऊया. आपण काही ना काही प्रयत्न करून त्याचे शिक्षण सुरु ठेवूया. माझे देशबांधव हा संकल्प पूर्ण करू शकणार नाही का ? शाळा आहेत, शिक्षक आहेत, सरकार शिक्षकांना पगार देते आहे, तरीही जर आपण आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रेरित करू शकलो नाही, प्रोत्साहन देऊ शकलो नाही तर आपला देश मागे राहील. देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर त्याची सर्वात मोठी ताकद असते ,लोकसंख्या ! रुपया- पैसा तर आपल्या प्रगतीसाठी महत्वाचा असतोच, मात्र देश प्रगती करतो तो लोकशक्तीमुळे, लोकशक्तीच्या भावनेमुळे,त्यांच्या संकल्पामुळे, लोकशक्तीच्या पुरुषार्थामुळे, लोकशक्तीच्या स्वप्नपूर्तीच्या ध्येयामुळे, बलिदानामुळे या सगळ्या गोष्टींची उर्जा मिळाली तरच देश पुढे जातो, प्रगती करतो! आणि म्हणूनच सव्वाशे कोटी भारतीय देशबांधवानी देशाला प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प ‘टीम इंडिया” म्हणून करावा.

सध्या संसदेचे अधिवेशन सुरु आहे. तुम्ही पाहिले असेल की जनाहिताचे अनेक कायदे संमत होत आहेत. दीर्घकाळापासून जनहिताचे कायदे मंजूर होत आहेत. मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी यंत्रणेने सर्वसामान्यांशी स्वतःला जोडून घेणे आवश्यक आहे, तरच या कायद्यांचे लाभ जनतेपर्यंत पोहोचू शकतील. बंधू भगिनीनो, आपल्या देशातील स्वातंत्र्यवीरांनी राष्ट्रासाठी बलिदान केले, देशाला सुजलाम सुफलाम बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. आपले काश्मीर, देशबांधवांसाठी स्वर्गभूमी आहे.प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते, की आयुष्यात एकदा तरी काश्मीरच्या स्वर्गभूमीत जाऊन यावे. मात्र जे काश्मीर संपूर्ण भारताचे इतके लाडके आहे, त्या काश्मीरमध्ये काही भरकटलेले लोक काश्मीरच्या महान परंपरेला धक्का पोहचवत आहेत. अटलबिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते, तेव्हा त्यांनी काश्मीरसाठी एक त्रिसूत्री ठरवली होती. “इंसानियात, काश्मिरियत और जमुरियत” . आम्ही त्याच मार्गावर चालणारे आहोत. आज चंद्रशेखर आझाद यांच्या या पवित्र जन्मभूमीवरून मी काश्मीरच्या माझ्या बंधू भगिनीना सांगू इच्छितो की, स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या त्या वेड्या वीरांनी जी शक्ती भारताला दिली आहे ,तीच शक्ती काश्मीरलाही मिळाली आहे. ज्या स्वातंत्र्याचा उपभोग प्रत्येक भारतीय घेतो, ते स्वातंत्र्य कश्मीरी व्यक्तीलाही आहे. काश्मीरची प्रत्येक ग्रामपंचायत आम्हाला सक्षम करायची आहे, काश्मीरच्या युवा पिढीसाठी रोजगाराची साधने उपलब्ध करायची आहेत. जम्मू काश्मीरच्या सरकारचे मी अभिनंदन करतो, की काही लोकांच्या दुष्ट हेतुना पुरून उरत त्यांनी मोठ्या दिमाखात अमरनाथ यात्रा सुरु ठेवली आहे. लाखो लोक ही अमरनाथची यात्रा साजरी करत आहेत. लडाखच्या भूमीवर सौर उर्जेच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत आहेत. मी माझ्या काश्मिरच्या युवक मित्रांना आवाहन करतो की, चला आपण सगळे एकत्र येत काश्मीरमध्ये शांतता, एकता , सद्‌भावना प्रस्थापित करू आणि काश्मीरला जगाचा स्वर्ग बनवण्यासाठी प्रयत्न करू.

बंधू भगिनींनो, कधी कधी खूप त्रास होतो. ज्या बालकांच्या हातात, ज्या युवकांच्या हातात laptop असायला हवेत, ज्या बालकांच्या हातात व्होलीबाल किंवा क्रिकेटची BAT असायला हवी, ज्यांनी बगीचात मनसोक्त खेळायला हवे , हातात पुस्तकं असायला हवा, आज अशा निर्दोष बालकांच्या हातात दगड दिले आहेत. या असल्या प्रकारांमुळे काही लोकांचे राजकारण कदाचित चालू शकेल, मात्र यातून या निरागस , निष्पाप बालकांचे काय होईल ? आणि म्हणूनच , माणुसकी, काश्मीरची परंपरा अशा गोष्टीना धक्का पोहचेल, त्याला कलंक लागेल असे कृत्य करायला नको. मैत्रीचा, लोकशाहीचा रस्ताच, संवादाचा रस्ता आहे. लोकशाहीच्या मूल्यांचा मार्ग आहे.

सगळा देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो आहे. आज देशात कुठे नक्षलवादाच्या नावाखाली,कुठे दहशतवादाच्या नावाखाली खांद्यावर बंदुका घेऊन फिरणाऱ्या युवकाना मी विचारू इच्छितो, की इतकी वर्षे तुम्ही हजारो निरपराधांचे रक्त सांडवले, मात्र त्यातून कोणाला काय मिळाले ? या आपण खांद्यावरच्या बंदुका फेकून देत नांगर हाती घेऊ या. ही रक्तरंजित भूमी तुमच्या श्रमाने हिरवीगार करुया. हा देश सुजलाम सुफलाम बनवू या.

बंधू भगिनींनो,जम्मू-कश्‍मीर मधील मेहबूबा मुफ्ती यांचे सरकार असो किंवा मग दिल्लीतील आमचे सरकार, आम्ही विकासाच्या मार्गांनी आमच्या मार्गात येणाऱ्या अडचणी, समस्यांवर उपाय शोधतो आहोत. मात्र देशात असेही काही लोक आहेत , ज्यांना हा विकासाचा मार्ग पचत नाही, रुचत नाही, त्यांना केवळ विनाशाचा मार्ग हवा आहे. मी देशातल्या राजकीय पक्षांचा, विशेषतः कांग्रेसचा आभारी आहे की त्यांनी आणि इतर सर्व राजकीय पक्षांनी अतिशय परिपक्व आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात काश्मीरच्या समस्येवर चर्चा केली, तोडगा शोधण्याचा प्रयत्न केला. आजही देशातील सर्व राजकीय पक्ष काश्मीरविषयी एका स्वरात प्रतिक्रिया देत आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी संकल्पबद्ध आहेत. हीच भारताची ताकद आहे, भारताचे सामर्थ्य आहे. हेच सामर्थ्य घेऊन आम्ही पुढे जात आहोत. काश्मीरला शांतता हवी आहे. काश्मीरचे सर्वसामान्य लोक पर्यटनाच्या भरवशावर आपली उपजीविका चालवतात. लवकरच सफरचंदाचा मोसम सुरु होईल. सगळ्या भारताला काश्मीरचे सफरचंद खाण्याची इच्छा असते. माझ्या काश्मीरच्या बंधू भगिनिनो, तुमची ही सफरचंदे देशभरात पोचायला हवी. आपण काबाडकष्ट करून जे पीक घेतले आहे, त्याचा मोबदला आपल्याला मिळायलाच हवा, त्याला बाजारपेठ मिळायला हवी. यासाठी आपल्याला जे मदत हवी आहे , टी करायला भारत सरकार सज्ज आहे. तुम्ही डॉक्टर असा, वकील असा,इंजिनियर असा , प्राध्यापक असा, व्यापारी असा किंवा शेतकरी असा, तुम्हाला आपले काम- व्यवसाय करायचा आहे,रोजगार कमवायचा आहे.

जम्मू-काश्मीरचे सरकार, दिल्लीचे सरकार ,भारतातील सगळे राजकीय पक्ष आणि सव्वाशे कोटी भारतीय सगळेजण तुमच्या भल्याचीच कामना करतात, काश्मीरचा विकास व्हावा हीच सगळ्यांची इच्छा आहे. आणि त्यासाठी जी काही मदत लागेल ती करायला केंद्र सरकार नेहमीच तयार असेल. इतर कुठे विकासकामे कमी झाली तरी चालतील, मात्र आम्ही काश्मीरला काहीही कमी पडू देणार नाही.

बंधू भगिनीनो, आम्ही विकासाचा मंत्र घेऊन वाटचाल करतो आहोत. आज जेव्हा आपण स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करतो ,तेव्हा मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, की, देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांमध्ये काश्मीरचेही लोक होते. बंधू भगिनीनो, काश्मीर पासून कन्या कुमारीपर्यंत रामसेतू, हिमालय असा हा देश एकत्र येऊन स्वातंत्र्याचे स्वप्न साकार करण्यासाठी झटत होता. आजही या देशाला एकत्र, एकसंध राहून, प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी दृढ संकल्प करून एकत्र येण्याची गरज आहे, देशासाठी काही करण्याची, आपली जबाबदारी पार पाडण्याची हीच योग्य वेळ आणि संधी आहे.

आगामी काळात देशभर तिरंगा यात्रा सुरु होणार आहे. ही तिरंगा यात्रा, हा तिरंगा झेंडा आपल्या सगळ्यांना एकत्र जोडतो. हा तिरंगा आपल्याला वीरांच्या बलिदानाचे स्मरण करून देतो. भारताचे भाग्य बदलण्याची प्रेरणा देतो. आपल्यासाठी तिरंग्यापेक्षा अधिक महत्वाचे काय आहे? या तिरंग्याला हातात घेऊन देशाच्या गावागावात, गल्ली गल्लीत तिरंगा हातात घेऊन होणाऱ्या या यात्रेमुळे देशभरात पुन्हा एकदा देशभक्तीची प्रेरणा जागृत होईल. देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल. मला विश्वास आहे की संपूर्ण भारत देशात या सत्तराव्या स्वातंत्र्यदिनाला नवा उत्साह, नवी चेतना जागृत होईल.

मला आज इथे येण्याची संधी मिळाली, आणि मी इथे येऊ शकलो, त्याबद्दल मी मध्यप्रदेश सरकारचे आणि जिल्हा प्रशासनातील छोट्या मोठ्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो, कारण मी इथे उतरलो, तेव्हा पाहिले की सगळीकडे पाणी जमा झाले होते . या अशा परिस्थितीत तुम्ही सगळ्यांनी कसे काम केले असेल? याची कल्पना करूनच माझे मन चिंतातूर झाले.तुम्ही सगळ्यांनी अशा परिस्थितीत रात्रंदिवस काम केले असेल, तुम्ही आजारी पडू नये अशी मला काळजी वाटत होती. मात्र चंद्रशेखर आझाद यांच्या या भूमीची प्रेरणाच अशी आहे की तुम्ही तहानभूक हरपुउन , भर पावसात काम केले असेल आणि हीच तर आपल्या देशाची प्रेरणा आहे. हीच देशाची ताकद आहे.

मी आज या चंद्रशेखर आझादांच्या भूमीवरून भारतात अशा प्रकारे मेहनत करणाऱ्या सभी लोकांच्या या ‘टीम इंडिया’ला मनापासून शुभेच्छा देतो. खूप खूप अभिनंदन करतो. मी जनता जनता जनार्दनाचेही अभिनंदन करतो. मी बघतोय, आपणा सगळे पाण्यात उभे आहात, जमीन दिसतच नाही.मात्र अशा पावसात, पाण्यात उभे राहून या सभेला उपस्थित असणे ,चंद्रशेखर आझादांना यापेक्षा मोठी श्रद्धांजली काय असू शकते? खरे तर चंद्रशेखर आझाद फक्त निमित्त आहे, मात्र आपण सगळे इथे जे कशात करत आहात, हे वंदन देशभरातल्या सर्व स्वातंत्र्यवीरांना आहे. ज्यांनी अंदमान निकोबार हा तुरुंगवास भोगला, जे भर तारुण्यात देशासाठी हसत हस्त फासावर गेले, जे लोक आयुष्यभर समाजाच्या कल्याणासाठी कष्ट करत आहेत ते, जे अहिंसेच्या मार्गावर चालले त्यांनाही आणि ज्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला त्यांनाही, हे वंदन अशा सर्व महापुरुषांना आहे ज्यांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. . त्या सर्वाना मी वंदन करतो . तुम्हा सर्वांचे मी अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद!!

B.Gokhale/R.Aghor/AK