नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2021
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 4 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजता देहरादूनला भेट देतील आणि सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या बहुविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रकल्पांवर या भेटीचा एक महत्त्वाचा भर असेल, ज्यामुळे प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होईल आणि या प्रदेशात पर्यटन देखील वाढेल. एके काळी दुर्गम समजल्या जाणाऱ्या भागात संपर्क व्यवस्था (कनेक्टिव्हिटी) वाढवण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या अनुषंगाने हे प्रकल्प उभारले जात आहेत.
पंतप्रधान अकरा विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. यामध्ये दिल्लीः देहरादून आर्थिक कॉरिडॉर (ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे जंक्शन ते देहरादून) समाविष्ट आहे. त्यासाठी सुमारे 8300 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे दिल्ली ते देहरादून प्रवासाचा कालावधी सहा तासांवरून सुमारे अडीच तासांपर्यंत कमी होईल. यामध्ये हरिद्वार, मुझफ्फरनगर, शामली, यमुनागर, बागपत, मेरठ आणि बरौत या शहरांना जोडण्यासाठी सात प्रमुख अंतर्गत बदल असतील. यामध्ये वन्यजीवांच्या निर्बंधमुक्त वावरासाठी आशियातील सर्वात मोठा वन्यजीव उन्नत कॉरिडॉर (12 किमी) असेल. तसेच, देहरादूनच्या दात काली मंदिराजवळील 340 मीटर लांबीचा बोगदा, वन्यजीवांवरील अनिष्ट परिणाम कमी करण्यास मदत करेल. याशिवाय, प्राणी-वाहनांची धडक टाळण्यासाठी गणेशपूर-देहरादून विभागात प्राण्यांसाठीच्या अनेक वाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिल्ली-देहरादून आर्थिक कॉरिडॉरमध्ये 500 मीटर अंतरावर आणि 400 हून अधिक जल पुनर्भरण ठिकाणी पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था असेल.
दिल्ली-देहरादून आर्थिक कॉरिडॉरपासून हलगोवा, सहारनपूर ते भद्राबाद, हरिद्वारला जोडणारा ग्रीनफील्ड संरेखन प्रकल्पासाठी 2,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. यामुळे अखंड संपर्क व्यवस्था (कनेक्टिव्हिटी) मिळेल आणि दिल्ली ते हरिद्वार प्रवासाचा वेळही कमी होईल. मनोहरपूर ते कांगरी हा हरिद्वार रिंगरोड प्रकल्प, 1,600 कोटींहून अधिक खर्च करून बांधला जाणार आहे, यामुळे हरिद्वार शहरातील रहिवाशांना, रहदारीच्या कोंडीपासून विशेषत: पर्यटनाच्या हंगामात दिलासा मिळेल. तसेच त्यांचा कुमाऊं क्षेत्राशी संपर्क सुधारेल.
देहरादून – पावंटा साहिब (हिमाचल प्रदेश) रस्ते प्रकल्प, सुमारे 1,700 कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे, यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि दोन ठिकाणांदरम्यान अखंड संपर्क व्यवस्था (कनेक्टिव्हिटी) प्रदान करेल. त्यामुळे आंतरराज्य पर्यटनालाही चालना मिळेल. नाझिमाबाद-कोटद्वार रस्ता रुंदीकरण प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि लॅन्सडाउनशी संपर्क व्यवस्था (कनेक्टिव्हिटी) देखील सुधारेल.
लक्ष्मण झुलाच्या पुढे गंगा नदीवर पूलही बांधला जाईल. जगप्रसिद्ध लक्ष्मण झुला 1929 मध्ये बांधण्यात आला होता, परंतु भार वाहण्याची क्षमता कमी झाल्यामुळे तो आता बंद करण्यात आला आहे. बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलावर लोकांना चालण्यासाठी काचेच्या मार्गिकेची (डेकची) व्यवस्था असेल आणि हलक्या वजनाची वाहनेही हा पूल ओलांडून जाऊ शकतील.
बालकांच्या प्रवासासाठी रस्ते अधिक सुरक्षित करून शहर बालस्नेही बनवण्यासाठी देहरादून येथील बालस्नेही शहर प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. देहरादूनमध्ये 700 कोटींहून अधिक खर्चाच्या पाणीपुरवठा, रस्ते आणि सांडपाणी व्यवस्थेच्या विकासाशी संबंधित प्रकल्पांची पायाभरणीही केली जाईल.
आधुनिक(स्मार्ट) अध्यात्मिक शहरे विकसित करण्याच्या आणि पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, श्री बद्रीनाथ धाम आणि गंगोत्री-यमुनोत्री धाम येथे पायाभूत सुविधांच्या विकास कामांची पायाभरणी केली जाईल. तसेच, हरिद्वारमध्ये 500 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून नवीन वैद्यकीय महाविद्यालय बांधले जाणार आहे.
प्रदेशातील जोखमीच्या भूस्खलनाची समस्या सोडवून प्रवास अधिक सुरक्षित करण्यावर भर देणार्या सात प्रकल्पांचेही पंतप्रधान उद्घाटन करतील. या प्रकल्पांमध्ये लांबागड (बद्रीनाथ धामच्या मार्गावर असलेल्या) येथील भूस्खलनरोधी उपाययोजना प्रकल्प आणि एनएच-58 वरील सकनीधर, श्रीनगर आणि देवप्रयाग येथे जोखमीच्या भूस्खलन उपाययोजनांचा समावेश आहे. जोखमीच्या भूस्खलन क्षेत्रामधील लांबागड भूस्खलन रोधी उपाययोजना प्रकल्पामध्ये खडकाच्या भिंतीचे सशक्तीकरण आणि खडक पडण्याला अडथळा आणणारे बांधकाम समाविष्ट आहे. प्रकल्पाचे स्थान त्याचे भौगोलीक महत्त्व वाढवते.
चारधाम रस्ता जोड प्रकल्पांतर्गत देवप्रयाग ते श्रीकोट आणि एनएच-58 वरील ब्रह्मपुरी ते कोडियाला या रस्त्याच्या रुंदीकरण प्रकल्पाचेही उद्घाटन केले जाणार आहे.
देहरादून येथील हिमालय सांस्कृतिक केन्द्रासह, यमुना नदीवर 1,700 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 120 मेगावॅट व्यासी जलविद्युत प्रकल्पाचेही उद्घाटन केले जाईल. हिमालय सांस्कृतिक केन्द्रामधे 800 आसनक्षमता असलेले कला सभागृह, ग्रंथालय, परिसंवाद सभागृह इत्यादी असेल. यामुळे सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यास तसेच राज्याचा सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यासाठी लोकांना मदत होईल.
देहरादूनमध्ये अत्याधुनिक परफ्युमरी आणि अरोमा प्रयोगशाळेचे (सुगंधी वनस्पती केंद्र) उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. येथे केलेले संशोधन अत्तर (परफ्यूम), साबण, सॅनिटायझर्स, एअर फ्रेशनर, अगरबत्ती इत्यादींसह विविध उत्पादनांच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरेल आणि या भागात संबंधित उद्योगांच्या उभारणीला चालना देखील देईल. सुगंधी वनस्पतींच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या प्रगत जातींच्या विकासावरही भर दिला जाणार आहे.
Jaydevi PS/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
देवभूमि उत्तराखंड की विकास यात्रा में कल एक स्वर्णिम अध्याय जुड़ेगा। देहरादून में दोपहर 1 बजे मुझे 18 हजार करोड़ रुपये की कई परियोजनाओं के उद्घाटन और शिलान्यास का सौभाग्य प्राप्त होगा। इनमें दिल्ली-देहरादून आर्थिक गलियारा समेत कई प्रोजेक्ट शामिल हैं।https://t.co/nGzlXpGVGN
— Narendra Modi (@narendramodi) December 3, 2021