नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी कोविड-19 साठी सार्वजनिक आरोग्य सज्जता आणि लसीकरण संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सुमारे 2 तास सर्वंकष बैठक झाली.
कोविड-19 संसर्ग आणि कोविड रुग्णांबाबतचा जागतिक कल यासंदर्भात पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.जगभरातील देशांनी महामारीच्या सुरुवातीपासून अनेक कोविड-19 च्या उद्रेकांचा अनुभव घेतला आहे, असे अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी कोविड-19 प्रकरणांशी संबंधित राष्ट्रीय परिस्थिती आणि चाचणी संसर्ग दरांचाही आढावा घेतला.
पंतप्रधानांना लसीकरणातील प्रगती आणि ‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली.कोविड प्रतिबंधक दुसऱ्या मात्रेची व्याप्ती वाढवण्याची गरज असून ज्यांना पहिली मात्रा मिळाली आहे त्यांना दुसरी मात्रा वेळेवर दिली जाईल हे सुनिश्चित करण्यासाठी राज्यांनी संवेदनशील व्हायला हवे असे निर्देश पंतप्रधानांनी दिले. देशात वेळोवेळी करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणातून समोर आलेला संसर्ग दर आणि त्याचा सार्वजनिक आरोग्य प्रतिसादावरील परिणाम याबद्दल पंतप्रधानांना तपशील देण्यात आला.
अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना ‘ओमिक्रॉन‘ हा विषाणूचा नवीन प्रकार आणि त्याची लक्षणे तसेच विविध देशांमध्ये दिसलेल्या त्याच्या प्रभावाविषयी माहिती दिली.विषाणूच्या या स्वरूपाचे भारतावर होऊ शकणााऱ्या परिणामांबाबतही चर्चा करण्यात आली. विषाणूच्या नवीन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर सक्रिय पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या नवीन धोक्यामुळे नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आणि मास्क लावणे आणि सामाजिक अंतर यांसारखी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे असे पंतप्रधान म्हणाले. ‘धोका ‘ असल्याचे निश्चित करण्यात आलेल्या देशांवर विशिष्ट लक्ष केंद्रित करून सर्व भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची, मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांची चाचणी करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. विषाणूचा नवा प्रकार उद्भवल्याच्या पार्श्वभूमीवर,आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध कमी करण्याच्या नियोजनाचा आढावा घेण्याच्या सूचना पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
देशात विषाणूच्या जनुकीय अनुक्रम निर्धारित करण्यासाठी आणि देशात पसरणाऱ्या विषाणूचा रुपांसंदर्भात पंतप्रधानांना आढावा देण्यात आला. जनुकीय अनुक्रमाचे नमुने आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि समुदायाकडून नियमांनुसार संकलित केले जातील, या नमुन्यांची चाचणी आयएनएसएसीओजी (INSACOG) अंतर्गत पूर्वीच स्थापित केलेल्या प्रयोगशाळांच्या नेटवर्कद्वारे आणि कोविड-19 व्यवस्थापनासाठी निश्चित करण्यात आलेल्या पूर्व इशारा संकेताद्बारे केली जाईल, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले. विषाणूचे जनुकीय अनुक्रमाचे प्रयत्न वाढवण्याच्या आणि ते अधिक व्यापक करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.
राज्य आणि जिल्हा स्तरावर योग्य जनजागृती व्हावी यासाठी राज्य सरकारांसोबत काम करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. कोविडचे मोठ्या संख्येने रुग्ण नोंदवणाऱ्या समूहांमध्ये कठोर प्रतिबंध आणि सक्रिय देखरेख ठेवणे सुरू ठेवावी आणि सध्या जास्त रुग्ण नोंदवणाऱ्या राज्यांना आवश्यक तांत्रिक सहाय्य दिले जावे, असेही निर्देश पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले. वायुवीजन आणि हवेतून पसरणाऱ्या विषाणूच्या वर्तनाबद्दल जनजागृती करण्याची गरज असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
नवीन औषधोत्पादनासंबंधीत उत्पादनांसाठी एक सोयीस्कर दृष्टिकोन अवलंबत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली. विविध औषधांचा पुरेसा अतिरिक्त साठा असल्याची खात्री करण्यासाठी पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना राज्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले.बालरोग सुविधांसह वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राज्यांसोबत काम करण्याची सूचना पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना केली.
पीसीए ऑक्सिजन सयंत्रे आणि व्हेंटिलेटर्सचे योग्य कार्यान्वयन कायम राहण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना राज्यांशी समन्वय साधण्यास सांगितले.
या बैठकीला कॅबिनेट सचिव श्री. राजीव गौबा, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के.पॉल, गृह सचिव श्री. ए.के.भल्ला, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव श्री. राजेश भूषण, सचिव (औषधोत्पादनसंबंधी), सचिव (जैवतंत्रज्ञान) डॉ.राजेश गोखले, आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव, सचिव (आयुष) श्री. वैद्य राजेश कोटेचा, सचिव (नगरविकास) श्री दुर्गा शंकर मिश्रा ,राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आर.एस. शर्मा ; (भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार) प्रा. के. विजय राघवन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
Reviewed the COVID-19 and vaccination related situation. In light of the new variant, we remain vigilant, with a focus on containment and ensuring increased second dose coverage. Would urge people to continue following social distancing and wear masks. https://t.co/ySXtQsPCag
— Narendra Modi (@narendramodi) November 27, 2021