पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबर 2021 रोजी उत्तर प्रदेशातील महोबा आणि झाशी या जिल्ह्यांना भेट देणार आहेत.
महोबा येथे पोहोचल्यानंतर एका महत्त्वपूर्ण उपक्रमाअंतर्गत दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी पंतप्रधान त्या भागातील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करतील. हे प्रकल्प पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी मदत करतील आणि या भागातील शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक असलेला दिलासा मिळवून देतील. या प्रकल्पांमध्ये अर्जुन सहाय्यक प्रकल्प, रतौली वैर प्रकल्प, भावनी धरण प्रकल्प आणि माझगाव-चिल्ली तुषार सिंचन प्रकल्प यांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांना एकूण 3250 कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार आहे. या प्रकल्पांच्या कार्यान्वयनानंतर महोबा, हमीरपुर, बांदा, आणि ललितपुर या जिल्ह्यांमधील 65000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे आणि त्यातून या भागातील लाखो शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
सुमारे सव्वापाचच्या सुमारास पंतप्रधानांच्या हस्ते झाशीमधील गरौथा येथे उभारण्यात येणाऱ्या 600 मेगावॉट क्षमतेच्या अतिभव्य सौर उर्जा केंद्राची कोनशीला ठेवली जाईल. 3000 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यासोबतच ग्रीडला स्थैर्य प्राप्त करून देणे असा दुहेरी लाभ करून देणार आहे.
पंतप्रधान या भेटीमध्ये झाशी येथील अटल एकता उद्यानाचे देखील उद्घाटन करणार आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने सुरु होत असलेले आणि सुमारे 11 कोटी रुपयांहून अधिक खर्च असलेले हे उद्यान सुमारे 40,000 चौरस मीटर क्षेत्रावर पसरले आहे. या उद्यानात ग्रंथसंग्रहालय तसेच अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा देखील असेल. स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याचे रचनाकार असलेले प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनीच वाजपेयी यांचा हा पुतळा तयार केला आहे.
***
Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com