नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर 2021 ला सकाळी 10:30 वाजता, उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथल्या इंदिरा गांधी प्रतिष्ठान इथल्या ‘आझादी@75 – नव नागरी भारत : नागरी परिदृश्य कायापालट’ या परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत.
प्रधान मंत्री आवास –योजना शहरी (पीएमएवाय-यु ) अंतर्गत, उत्तर प्रदेशातल्या 75 जिल्ह्यांमधल्या 75,000 लाभार्थींना पंतप्रधान घरांच्या किल्ल्या डिजिटली प्रदान करणार आहेत. या योजनेच्या उत्तर प्रदेशातल्या लाभार्थीसमवेत पंतप्रधान दुरदृष्य प्रणालीद्वारे संवादही साधणार आहेत. स्मार्ट सिटी अभियान आणि अमृत योजनेंतर्गत उत्तर प्रदेशातल्या 75 नागरी विकास प्रकल्पांचे उद्घाटन/भूमिपूजन पंतप्रधान करतील.
लखनौ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज,गोरखपूर, झाशी आणि गाझियाबाद या सात शहरांसाठी एफएएमई- II अंतर्गत 75 बसगाड्यांना पंतप्रधान झेंडा दाखवतील. केंद्र सरकारच्या गृह निर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या विविध अभियानांतर्गत अंमलबजावणी केलेल्या 75 प्रकल्पांसंदर्भात एका कॉफी टेबल पुस्तिकेचे प्रकाशन ते करतील. एक्स्पोमधल्या तीन प्रदर्शनाची पाहणी पंतप्रधान करणार असून लखनौ इथल्या बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठात अटल बिहारी वाजपेयी अध्यासनाच्या स्थापनेची घोषणा पंतप्रधान करणार आहेत. संरक्षण मंत्री, केंद्रीय गृह निर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
परिषद आणि प्रदर्शनाविषयी
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत गृह निर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने 5 ते 7 ऑक्टोबर 2021 या काळात या परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. उत्तर प्रदेशात परिवर्तनकारी बदलांवर विशेष लक्ष केंद्रित करत ‘नागरी परिदृश्य परिवर्तन’ ही याची संकल्पना आहे. या परिषद आणि प्रदर्शनात सर्व राज्ये/केंद्र शासित प्रदेश सहभागी होणार असून अनुभवांची देवाणघेवाण आणि पुढील कार्यवाहीसाठी दिशा यादृष्टीने याची मदत होणार आहे.
या परिषद आणि एक्स्पोमधली तीन प्रदर्शने याप्रमाणे आहेत-
गृह निर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या नागरी अभियाना अंतर्गत आतापर्यंतची कामगिरी या प्रदर्शनात पाहायला मिळेल. स्वच्छ नागरी भारत, जल संरक्षित शहरे, सर्वांसाठी घरे, बांधकामाचे नवे तंत्रज्ञान, स्मार्ट सिटी विकास, उपजीविकेच्या संधीना प्रोत्साहन देणारी शहरे या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन आहे.
परिषद आणि प्रदर्शन 6 आणि 7 ऑक्टोबर 2021 या दोन दिवशी जनतेसाठी खुले असेल.
* * *
S.Tupe/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com