Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वातंत्र्याच्या 70व्या वर्षानिमित्त तिरंगा यात्रेला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला

स्वातंत्र्याच्या 70व्या वर्षानिमित्त तिरंगा यात्रेला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला


पंतपधान नरेंद्र मोदी यांनी आज, महान स्वातंत्र्य सैनिक चंद्रशेखर आझाद यांना मध्यप्रदेशातील अलिराजपूर जिल्हयातील भाबरा या त्यांच्या जन्मस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. पंतप्रधानांनी यावेळी शहिद चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण केला आणि त्यांच्या जन्मस्थळी असलेल्या स्मारकाला भेट दिली.

जनसभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी आठवण करुन दिली की, याच दिवशी महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरुध्द “भारत छोडो”चा नारा दिला होता. आपल्याला स्वतंत्र भारतात श्वास घेता यावा यासाठी प्राणांची आहूती देणाऱ्यांचे आपण नित्य स्मरण करावे अशी विनंती त्यांनी केली.

चंद्रशेखर आझादांच्या जन्मस्थळाला भेट द्यायला मिळाली ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे असे पंतप्रधान म्हणाले. आझादांसारख्या व्यक्ती आपल्याला नेहमी राष्ट्रकार्य करण्यासाठी प्रेरणा देतात.

पंतप्रधान म्हणाले की, आपण सर्व ज्यांना राष्ट्रासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्याची संधी मिळाली नाही, त्या सर्वांनी या संधीचा उपयोग देशासाठी जगून करावा. देश येथील लोकांची शक्ती, त्यांच्या आकांक्षा आणि त्यांचे कठोर परिश्रम या सर्वाच्या जोरावर प्रगती करत आहे यावर पंतप्रधानांनी जोर दिला.

प्रत्येक भारतीय काश्मिरवर प्रेम करतो आणि एकदा तरी काश्मिरला जायची त्याची इच्छा असते. काही चुकीचे मार्गदर्शन करणारे घटक काश्मिरची समृध्द परंपरा बिघडवत आहेत असे त्‍यांनी सांगितले.

केंद्र सरकार काश्मिरी युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलबध करु इच्छितो. “त्यांनी काश्मिरी युवकांना विनंती केली की, काश्मिरला “पृथ्वीवरील स्वर्ग” बनविण्याच्या दृष्टिकोनासह काश्मिरी युवकांनी पुढे यावे आणि मार्गक्रमण करत राहावे. काश्मिरला “शांती” हवी आहे आणि पर्यटनाद्वारे अधिकाधिक कमाई करण्याची काश्मिरमधल्या लोकांची इच्छा आहे असे ते म्हणाले.

केंद्र आणि जम्मू-काश्मिर सरकार दोघे विकासाच्या माध्यमातून सर्व समस्यांचे समाधान शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या इंसानियत, जम्हूरियत आणि काश्मिरियत हाच दृष्टिकोन घेऊन आम्ही पुढे मार्गस्थ होत आहोत असे मोदी म्‍हणाले.

देशाला नवीन उंचीवर प्रस्थापित करण्याचा समान संकल्प घेऊन सर्वांनी एकत्रित काम करणे ही सध्या काळाची गरज असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी नंतर स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखविला.

भारताचा तिरंगा आपल्याला एकसंघ ठेवतो आणि भारताचे भाग्य पुन्हा लिहिण्याची प्रेरणा देतो.

BG/SM/AK