नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि चेंबर ऑफ ऑडिटर्स ऑफ रिपब्लिक ऑफ अझरबैजान (सीएएआर) यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे.
तपशील:
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि चेंबर ऑफ ऑडिटर्स ऑफ रिपब्लिक ऑफ अझरबैजान यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे सदस्य व्यवस्थापन, व्यावसायिक नैतिकता, तांत्रिक संशोधन, सीपीडी, व्यावसायिक लेखा प्रशिक्षण, लेखापरीक्षण गुणवत्ता देखरेख, लेखा ज्ञानाची प्रगती, व्यावसायिक आणि बौद्धिक विकास या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य प्रस्थापित होण्यास मदत होईल.
अंमलबजावणीची रणनीती आणि लक्ष्य:
आयसीएआय आणि सीएएआर दोघांचाही लेखापरीक्षण, वित्त आणि लेखा व्यावसायिकांच्या प्रशिक्षण क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्याचा हेतू आहे. व्यावसायिक संस्थानी प्रकाशित केलेली पुस्तके, मासिके आणि इतर प्रकाशनांची देवाणघेवाण, मासिके आणि दोन्ही संस्थांच्या संकेतस्थळावर लेखापरीक्षण आणि लेखाविषयक लेखांचे परस्पर प्रकाशन, संयुक्त परिषद, संगोष्ठी, बैठका, लेखापरीक्षण, वित्त आणि लेखासंबंधी प्रशिक्षण आयोजित करण्याचा आणि वित्तसहाय्य पुरवण्याचा आयसीएआय आणि सीएएआरचा उद्देश आहे. आयसीएआय आणि सीएएआर ऑडिट आणि अकाउंटिंगच्या क्षेत्रात नवीन नाविन्यपूर्ण पद्धतींचा अभ्यास करण्याबरोबरच ब्लॉकचेन, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम, पारंपारिक अकाउंटींग ते क्लाउड अकाउंटिंग संक्रमण आणि भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरूद्धच्या लढाईत संयुक्त सहकार्य करण्याचीही इच्छा आहे.
परिणाम:
आयसीएआयचे सदस्य देशभरातील विविध संस्थांमध्ये मध्यम ते उच्च स्तरीय पदांवर आहेत आणि ते देशाच्या संबंधित संस्थांच्या निर्णय/धोरण आखणीवर प्रभाव टाकू शकतात. या सामंजस्य करारामुळे ज्ञानाच्या देवाणघेवाणीकडे लक्ष केंद्रित होईल आणि लेखा क्षेत्रात नवीन नाविन्यपूर्ण पद्धती आणि तंत्रज्ञानाच्या वापरासह दोन्ही अधिकार क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती मजबूत होतील.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com