Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद, 22.05.2016


माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्का. पुन्हा एकदा “मन की बात” करण्याची संधी मला मिळाली आहे. माझ्यासाठी मन की बात म्हणजे काही कर्मकांड नाही. मी स्वत: आपल्याशी संवाद साधायला उत्सुक असतो. आणि हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यातील, देशाच्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत “मन की बात” च्या माध्यमातून मी पोहचू शकतो याचा मला आनंद वाटतो. “मन की बात”चा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री आठ वाजता प्रसारित करण्याचा आकाशवाणीने जो यशस्वी प्रयत्न केला आहे, त्यासाठी मी आकाशवाणीचे आभार मानतो. आणि याही गोष्टीचा मला आनंद वाटतो की, जे नागरिक माझा मन की बात कार्यक्रम ऐकतात, ते कार्यक्रमानंतर पत्राद्वारे दूरध्वनीच्या माध्यमातून तसेच “माय गोव्ह” या संकेतस्थळाच्या माध्यमातून आणि नरेंद्र मोदी ॲपद्वारे त्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहचवतात. आपण पाठवलेले सुचवलेले मुद्दे सरकार चालवतांना मला उपयोगी पडतात. लोक कल्याणासाठी शासन किती सक्रीय असायला हवे ? लोक कल्याणाच्या कामांना किती प्राधान्य दयायला हवे ? यासाठी, आपल्याबरोबर होणारा माझ संवाद, हे नाते फार महत्त्वाचे आहे. आपण अधिक सक्रीय होऊन, जनसहभागातून लोकशाही व्यवस्था कशी चालेल यावर अवश्य भर द्याल अशी मी अपेक्षा करतो.

उन्हाळा वाढतच चालला आहे. असे वाटले होते की, त्यापासून थोडी सुटका होईल, पण तापमान वाढतच आहे. नैऋत्य मौसमी पाऊस बहुधा एक आठवडा उशीराने येईल अशी बातमीही मध्यंतरी आली. त्यामुळे चिंता अधिकच वाढली. देशाचा बराचसा भूभाग उष्णतेच्या लाटेने होरपळून निघतो आहे. तापमापकातील पारा जणू आकाशाला भिडला आहे. प्राणी असोत की पक्षी असोत, की माणसे सारेच या उन्हाळयाने त्रस्त आहेत. पर्यावरणाची काळजी न घेतल्यामुळेच या समस्या वाढत चालल्या आहे. जंगले कमी झाली, वृक्षतोड होत गेली आणि निसर्गाचा विध्वंस करुन जणू काही माणसाने आपल्याच विनाशाला, आत्मनाशाला वाट मोकळी करुन दिली.

5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन आहे. जगभरात पर्यावरण या विषयावर चर्चा होतात, काळजी व्यक्त केली जाते. यावेळी पर्यावरण दिनाची मुख्य संकल्पना संयुक्त राष्ट्रांनी ठरवली आहे ती आहे “झिरो टॉलरन्स फॉर इल्‌लिगल वाईल्ड लाईफ ट्रेड” म्हणजे वन्यजीवांच्या व्यापाराला पूर्णपणे आळा” याबद्दल तर चर्चा होईलच पण आपल्याला झाडाबद्दलही बोलले पाहिजे, पाण्याबद्दल बोलले पाहिजे. जंगले कशी वाढतील याकडे लक्ष दिले पाहिजे.

याचे कारण म्हणजे आपण हे पाहिले असेल की, उत्तराखंड,हिमाचल, जम्मू-काश्मिर या भागातील हिमालय पायथ्याजवळच्या जंगलांमध्ये नुकताच भीषण वणवा लागला होता. या भीषण अग्नी प्रलयाचे मूळ कारण होते ते म्हणजे वाळलेला पालापाचोळा आणि थोडेसे दुर्लक्ष. परिणाम विनाशकारी वणवा. म्हणून जंगले वाचवणे, पाण्याची बचत करणे हे आपल्या सगळयांचे कर्तव्य ठरते, जबाबदारी ठरते.

दुष्काळाची तीव्र झळ बसलेल्या 11 राज्यांमधील मुख्यमंत्र्यांशी काही दिवसांपूर्वीच सविस्तर चर्चा करण्याची संधी मला मिळाली. उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा ही ती राज्ये. तसे पाहल्या गेले तर शासकीय परंपरेप्रमाणे या सर्व राज्यांना एकत्रित मी घेऊ शकलो असतो. पण मी तसे केले नाही, प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी स्वतंत्र भेटलो. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सुमारे दोन-अडीच तास चर्चा केली. त्यांना काय सांगायचे आहे हे बारकाईने ऐकले. सर्वसाधारण पध्दतीनुसार भारत सरकारने, केंद्रशासनाने किती निधी दिला ? आणि किती खर्च झाला ? यापलिकडे फारशी चर्चा होत नाही. फार लक्ष दिले जात नाही.

दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक राज्यांनी केलेले उत्तम प्रयत्न पाहून केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांना अाश्चर्य वाटले. पाणी बचत, पर्यावरण संवर्धन, दुष्काळावर उपाययोजना, पशुधनाचे रक्षण, दुष्काळबाधित नागरिकांना आधार या सर्व मुद्दयांवर संपूर्ण देशभर त्या राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचे असो, या समस्येवर मात करण्यासाठी दीर्घकालीन शाश्वत उपाय कोणते आखता येतील ? याकडे विशेष लक्ष दिले गेले आहे असे लक्षात आले. एक प्रकारे हा अनुभव मला काही शिकवणारा होता. ज्या आदर्श उपाययोजना असतील, जी आदर्श धोरणे असतील त्यांची सर्व राज्यांमध्ये अंमलबजावणी कशी करता येईल ? याकडे विशेष लक्ष द्यायला मी निती आयोगाला सांगितले आहे.

काही राज्यांनी विशेषत: आंध्र प्रदेश, गुजरात यांनी तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला आहे. राज्य सरकारांनी केलेल्या या यशस्वी उपाययोजना निती आयोगाच्या माध्यमातून देशाच्या इतर राज्यांमध्येही आपण पोहोचवायला हव्यात. अशा समस्यांवर मात करण्यासाठी लोकसहभाग हे यशाचे मुख्य कारण ठरते, मुख्य आधार ठरतो. आणि त्यात अचूक नियोजन, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि निश्चित कालमर्यादेत उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न झाला तर त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात असा मला भरवसा वाटतो.

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी, जलसंवर्धनासाठी प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी कारण पाणी म्हणजे परमेश्वराचा प्रसाद आहे, असे मी मानतो. आपण देवळात जातो, कोणीतरी आपल्या हातावर प्रसाद ठेवतो, त्या प्रसादातला थोडासा जरी आपल्या हातून सांडला तरी आपल्याला वाईट वाटते, तो पडलेला प्रसाद आपण उचलतो आणि परमेश्वराकडे क्षमा याचना करतो.

पाणी म्हणजे ईश्वराचा प्रसादच आहे. एक थेंब जरी वाया गेला तरी आपल्याला दु:ख झाले पाहिजे. आणि म्हणून जलसंचय हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पाण साठवण्याबरोबरच त्याचे संरक्षण करणे, ते वाचवणे महत्वाचे आहे आणि जलसिंचन हेही महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच पर ड्रॉप मोअर क्रॉप – प्रत्येक थेंब – अधिक उत्पादन, मायक्रो इरिगेशन – सूक्ष्म सिंचन, कमी पाण्यावर तयार होणारी पिके. अनेक राज्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकरी आता ठिंबक सिंचनाचा, सूक्ष्म सिंचनाचा वापर करत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. काहीजण तुषार सिंचनाचा वापर करत आहेत. वेगवेगळया राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक मी घेतली तेव्हा मला समजले की काही राज्यांनी भात शेतीसाठी तांदूळ पिकवण्यासाठी ठिंबक सिंचन प्रणालीचा यशस्वी वापर केला आहे आणि त्यामुळे त्यांना उत्पादनही अधिक मिळाले. पाण्याची बचत झाली आणि मजूरीचा खर्चही कमी आला. त्यांच्याकडून मला हेही कळले की बऱ्याच राज्यांसमोर मोठी उद्दिष्टे आहेत, विशेषत: महाराष्ट्र, आंध्र आणि गुजरात या तीन राज्यांनी ठिंबक सिंचनाच्या बाबतीत फार मोठे काम केले आहे. त्यांचा प्रयत्न आहे की, दरवर्षी, दोन-दोन, तीन-तीन लाख हेक्टर जमिन सूक्ष्म सिंचनाखाली आणायची. ही मोहिम सर्व राज्यांमध्ये राबवली गेली तर, शेतीला मोठा फायदा तर होईलच शिवाय पाण्याचे साठेही वाढतील. तेलंगणातील आमच्या बंधूनी मिशन भागिरथी या प्रकल्पाद्वारे गोदावरी आणि कृष्णा या नद्यांच्या पाण्याचा वापर उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न केला आहे. आंध्र प्रदेशात निरु प्रगती मिशनच्या माध्यमातून, तंत्रज्ञानांच्या मदतीने भूजल पुनर्भरणाचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्रात जी लोकचळवळ उभी राहिली आहेत, त्यात लोक श्रमदानाबरोबरच आर्थिक मदतही देत आहे. “जलयुक्त शिवार अभियान” खरोखरच ही चळवळ महाराष्ट्राला भविष्यकालीन जलसंकटांपासून वाचवण्यासाठी उपयोगी पडेल असे मला निश्चितपणे वाटते आहे. छत्तीसगड राज्याने लोकसुराज्य-जलसुराज्य मोहिम हाती घेतली आहे. मध्यप्रदेशात बलराम तालाब योजना या उपक्रमातून 22,000 तळयांचे बांधकाम झाले आहे. ही संख्या लहान नाही. यावर काम सुरु आहे. त्यांची कपिलधारा कूपयोजना. उत्तरप्रदेशातले मुख्यमंत्री जलबचाव अभियान, कर्नाटकात कल्याणी योजनेतून विहीरी पुनरुज्जीवीत करण्याचे काम सुरु आहे. राजस्थन आणि गुजरात जिथे पुरातन कालव्यातल्या विहीरी आहेत त्या विहीरींना जलमंदिराच्या रुपाने पुनर्जिवीत करण्याचे मोठे अभियान हाती घेण्यात आले आहे.

राजस्थानात मुख्यमंत्री जलस्वावलंबन मोहिम चालवली जात आहे. झारखंड हा वन्य प्रदेश. मात्र त्या राज्याच्या काही भागांमध्ये पाण्याची टंचाई आहे. तिथे चेकहॅम, छोटे बंधारे बांधून एक मोठे काम केले जात आहे. पाणी अडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही राज्यांमध्ये नदयांच्या पात्रातच छोटे छोटे बांध घालून दहा-दहा, वीस-वीस किलोमीटर क्षेत्रात पाणी अडवण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. हा खरोखरच सुखद अनुभव आहे.

मी देशवासिंयाना आवाहन करेन की येत्या जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये, पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ देणार नाही असा आपण निर्धार करुया. आतापासूनच त्यासाठी व्यवस्था करुया. कुठे पाणी वाचवता येईल ? कुठे पाणी साठवता येईल ? हे ठरवूया, देव तर आपल्या गरजेप्रमाणे पाणी देतोच. निसर्ग आमच्या गरजा पूर्ण करतो. पण भरपूर पाणी आहे म्हणून आम्ही निष्काळजी रहिलो आणि पावसाळा संपल्यावर पाणी नाही म्हणून त्रस्त झालो तर हे कसे चालेल ? आणि पाणी हा विषय केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित नाही. गाव, गरीब, मजूर, शेतकरी, शहरी, ग्रामीण, श्रीमंत-गरीब या सगळयांशी संबंधित हा विषय आहे. म्हणूनच आता पावसाळा येणार आहे तेव्हा पाणी हा आमचा प्राधान्याचा मुद्दा असायला हवा आणि यंदा जेव्हा आपण दिवाळी साजरी करु, त्यावेळी यंदाच्या पावसाळयात आपण किती पाणी वाचवले ? किती पाणी अडवले ? याचाही आनंद साजरा करु. आपण पहाल, आपला आनंद अनेकपटीने वाढेल. पाण्यात एक विलक्षण शक्ती आहे. आपण कितीही थकून आलो असलो आणि थोडेसेच पाणी चेहऱ्यावर शिंपडले तर किती ताजेतवाने वाटते. आपण कितीही दमलो असलो तरी विस्तीर्ण सरोवर, विस्तीर्ण समुद्र पाहून कसा विराटतेचा अनुभव आपल्याला येतो. परमात्म्याने दिलेला किती अनमोल खजिना आहे हा.

आपले मन त्याच्याशी थोडे जुळवून घेऊन त्याचे संरक्षण करु. पाण्याचे संवर्धन करु आणि पाण्याचा साठाही करु. जलसिंचनाच्या बाबतीत आधुनिक होऊन. ही गोष्ट आज मी आपल्याला आवर्जुन सांगतो आहे. यंदाचा हंगाम हातून जाऊ देऊ नका. येणाऱ्या चार महिन्यांमध्ये प्रत्येक थेंब पाणी वाचवण्यासाठी अभियान हाती घ्यायचे आहे. आणि हे केवळ सरकारचे नाही, राजकीय नेत्याचे नाही, तर सर्वसामान्य माणसाचे काम आहे. पाणी संकंटाच्या बातम्या गेल्या काही दिवसात माध्यमातून विस्ताराने येत आहेत. पाणी वाचवण्यासाठी, मोहिम हाती घेण्यासाठी जनतेला मार्गदर्शन करण्याच्या बाबतीत आणि जलदुर्भिक्षापासून कायमची मुक्ती मिळवण्याच्या बाबतीत ही माध्यमे नागरिकांना मार्गदर्शन करतील आणि त्यांनी याकामी भागिदार व्हावे म्हणून मी माध्यमांना आमंत्रित करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्याला आधुनिक भारताची निर्मिती करायची आहे. आपला भारत पारदर्शी घडवायचा आहे. अशा अनेक योजना, प्रणाली आहे. ज्या भारताच्या एका टोकापासून, दुसऱ्या टोकापर्यंत सारख्याच पध्दतीने पोहोचवायच्या आहेत. हे करण्यासाठी आपल्या जुन्या सवयी आपल्याला बदलाव्या लागतील. आज मी अशा एका विषयाला स्पर्श करु इच्छितो. ज्याबाबतीत आपण मला मदत केलीत तर त्या दिशेकडे आपण यशस्वीपणे जाऊ शकतो. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, आपण शाळेत हे शिकलो आहे. एक काळ असा होता, जेव्हा नाणी नव्हती, चलनी नोटा नव्हत्या. तेव्हा वस्तू विनिमय पध्दत होती, बार्टर सिस्टीम. तुम्हाला भाजी हवी असेल, तर त्याबदल्यात इतके गहू दया, तुम्हाला मीठ हवे असेल तर त्यासाठी इतकी भाजी द्या. वस्तूविनिमयातून व्यवहार होत असत.

हळूहळू नाणी वापरात आली. चलन वापरात आले. नोटा वापरात आल्या. पण आता काळ बदलला आहे. सारे जग कॅशलेस सोसायटी म्हणजे रोकडविरहीत व्यवस्थेच्या दिशेने जात आहे. इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण पैसे मिळवू शकतो आणि पैसे पाठवूही शकतो. वस्तूची खरेदी करु शकतो. देयक म्हणजे बिल चुकती करु शकतो. यात तुमच्या खिशातले पाकिट चोरीला जाण्याची भितीही उद्‌भवत नाही, हिशेब ठेवण्याची चिंता ही नाही. तो आपोआप नोंदवला जाईल. ही पध्दत वापरणे सुरुवातीला थोडे कठीण वाटेल मात्र एकदा सवयीचे झाल्यानंतर ही व्यवस्था सुलभ होईल. हे यासाठी शक्य आहे कारण गेल्या काही दिवसात आम्ही जी प्रधानमंत्री जनधन योजना राबविली, त्यात देशातील जवळजवळ सर्व कुटुंबांची बँक खाती उघडली गेली. दुसरीकडे आधार क्रमांकही मिळाला आणि मोबाईल तर आता भारतात जवळजवळ प्रत्येक भारतीयांच्या हातात आला आहे. म्हणूनच जनधन, आधार-मोबाईल-जॅम (जे.ए.एम.) यांचा ताळमेळ घालून आपण रोकडविरहित व्यवस्था, कॅशलेस सोसायटीच्या दिशेने पुढे जाऊ शकतो. आपण हे बघितले असेल की, जनधन खात्यासोबत रुपेकार्ड देण्यात आले आहे. येत्या काळात ते कार्ड क्रेडिट आणि डेबिट या दोन्ही वापरांसाठी उपयोगी ठरेल. आणि हल्ली तर एक लहानसे यंत्रही उपलब्ध झाले आहे. ज्याला पी.ओ.एस. पाँईट ऑफ सेल असे म्हटले जाते. या यंत्राच्या माध्यमातून तुम्ही आधार क्रमांक, रुपे कार्ड वापरुन इतरांची देणी देऊ शकता. खिशात रक्कम बाळगण्याची ती मोजायची आवश्यकताच नाही. भारत सरकारने जे उपक्रम हाती घेतले आहे त्यापैकी एक आहे पीओएसच्या माध्यमातून पैसे कसे देता येतील ?

दुसरा उपक्रम आम्ही हातात घेतला आहे तो बँक ऑन मोबाईल. युर्निवर्सल पेमेंट इंटर फेस बँकिंग ट्रान्झॅक्शन. “युपीआय” पध्दत बदलणारी ही व्यवस्था ठरेल. तुमच्या मोबाईल फोनच्या माध्यमातून पैशाची देवाण-घेवाण करणे फार सोपे होऊन जाईल. आनंदाची गोष्ट म्हणजे एनपीसीआय आणि बँका ही व्यवस्था मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करत आहे. आणि हे प्रत्यक्षात आले तर कदाचित रुपे कार्डसुध्दा जवळ बाळगण्याची आवश्यकता उरणार नाही. देशभरात सुमारे सव्वालाख तरुणांना बँक प्रतिनिधी म्हणून भरती करण्यात आले आहे. एकाप्रकारे बँक आपल्या दारी या दिशेने उचलले हे पाऊल आहे. पोस्टाच्या कार्यालयातही बँकेच्या सेवा मिळतील यासाठी हालचाली सुरु आहेत.

या पध्दतीचा व्यवहारात वापर करायला आपण शिकलो, त्याची सवय केली तर प्रत्यक्ष चलनाची गरजच उरणार नाही, रक्कम खिशात घेण्याची गरजच उरणार नाही. व्यवहार आपोआप होत राहतील आणि त्यामुळे पारदर्शकता येईल. बेहिशेबी व्यवहार, दोन नंबरचे व्यवहार बंद होतील. काळया पैशाचा परिणामही कमी होईल. म्हणून मी देशवासियांना आवर्जुन सांगेन की, आपण याची सुरुवात करुया. आपण बघा, एकदा ही व्यवस्था सुरु झाली की, सहजसुलभ पध्दतीने आपण पुढे जाऊ. आजपासून वीस वर्षांपूर्वी कोणाला वाटले तरी होते का ? की, इतके मोबाईल आमच्या हातात असतील म्हणून. हळूहळू सवय झाली आता त्याच्याशिवाय राहणे शक्य नाही. हे शक्य आहे की, रोकडविरहीत व्यवस्था (कॅशलेस सोसायटी ) हळूहळू तशीच आकाराला येईल. पण हे कमी कालावधीत प्रत्यक्षात आले तर अधिक चांगले होईल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सुरु होता तेव्हा आपण विचार करु लागतो की, सुवर्णपदकांच्या कमाईत आपण किती मागे राहिलो ? रौप्य पदक मिळाले की नाही मिळाले ? कास्य पदकावर समाधान मानावे की मानू नये ?हे खरे आहे की क्रीडा क्षेत्रात अनेक आव्हाने आमच्यासमोर आहेत पण देशभरात एक वातावरण निर्मिती व्हायला हवी. रिओ ऑलिम्पिंकमध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या खेळाडूंना आपण प्रोत्साहन द्यायला हवे. त्यांचा आत्मविश्वास वाढायला हवा. आप-आपल्या पध्दतीने आपण हे करायला हवे. कुणी गाणे लिहावे, कुणी चित्र काढावे, कुणी शुभेच्छापर संदेश द्यावा, कुणी एखाद्या खेळाला प्रोत्साहित करावे, पण साऱ्या देशभरात असे सकारात्मक वातावरण तयार व्हायला हवे ज्यातून आमच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल. स्पर्धेचा निकाल काहीही लागो खेळ हा खेळ आहे. विजय मिळतोच तसाच पराभवही वाटयाला येतो. पदके हाती लागतात तशीच हातातून जातातही. पण आत्मविश्वास कमी पडता कामा नये. आम्ही हे आपल्याला सांगत असतांना आपले क्रीडा मंत्री श्रीमान सर्बानंद सोनोवाल यांनी केलेले एक काम माझ्या अंत:करणाला स्पर्श करुन गेले ते आपल्यापर्यंत पोहोचवतो.

विधानसभा निवडणूकीचे निकाल काय असतील ? आसाममध्ये मतमोजणीचे आकडे काय असतील ? या विचारात आम्ही गेल्या आठवडयात होतो आणि श्रीमान सर्बानंद स्वत: आसाममधल्या निवडणूक मोहिमेचे प्रमुख होते. मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते. पण ते भारत सरकारचे मंत्रीही त्याचवेळी होते. आणि ही घटना मला जेव्हा समजली तेव्हा मला फार आनंद झाला. ती घटना अशी की आसाम विधानसभा निवडणूकीचे निकाल येण्यापूर्वी ते कुणालाही कळू न देता पटियाळा येथे पोहोचल. पंजाबमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या आमच्या खेळाडूंचे प्रशिक्षण तिथे होते. नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ स्पोर्टर्स (एनआयएस), तिथे ते अचानक गेले. खेळाडूनांही आश्चर्य वाटले आणि क्रीडा क्षेत्रासाठी सुध्दा ही नवलाची गोष्ट होती की, एखादा मंत्री इतकी चिंता करतो खेळाडूंची काय व्यवस्था आहे ? त्यांच्या जेवणाची काय सोय आहे ? आवश्यकतेनुसार पोषक अन्न त्यांना मिळतेय की नाही ? त्यांच्या शारिरीक तंदुरुस्तीसाठी जे प्रशिक्षक असायला हवेत ते आहेत की नाही ? प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी सर्व यंत्रसामुग्री कार्यरत आहे की नाही ? प्रत्येक गोष्ट त्यांनी बारकाईने बघितली आहे. प्रत्येक खेळाडूच्या खोलीची त्यांनी पाहणी केली आहे. खेळाडूंबरोबर, प्रशिक्षकांबरोबर त्यांनी संवाद साधला आहे. व्यवस्थापनातल्या अधिकाऱ्यांशी ते बोलले आहेत. सर्व खेळाडूंबरोबर ते स्वत: जेवले आहेत.

निवडणूकीचे निकाल लागणार असोत, मुख्यमंत्री म्हणून नवीन जबाबदारी सांगण्याची शक्यता असो माझे एक सहकारी अशा वातावरणातही क्रीडा मंत्री म्हणून आपल्या कामाबद्दल इतके जागृक आहेत हे पाहून मला आनंद झाला. आणि याचप्रकारे आपण खेळाचे महत्त्व समजून घेऊ असा मला विश्वास वाटतो. क्रीडा विश्वाला प्रोत्साहन देऊ या. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देऊ या. जेव्हा सव्वाशेकोटी देशवासी आपल्यासोबत उभे आहेत हा विश्वास आमच्या खेळाडूंना वाटतो तेव्हा ही मोठी शक्ती ठरते आणि त्यांचा आत्मविश्वास दुणावतो.

मागच्यावेळी मी फिफा अंडर सेव्हनटीन वर्ल्ड कपचा विषय काढला होता. देशभरातून मला त्याबद्दल सूचना प्रतिक्रिया आल्या आणि या काळात मला दिसतेय की, साऱ्या देशभरात फूटबॉलचे वातावरण तयार होऊ लागले आहे. अनेकजण पुढाकार घेऊन आपआपले संघ तयार करत आहे. नरेंद्र मोदी ॲपवर याबाबतीत अनेक सूचना मला मिळाल्या आहेत. हे शक्य आहे की, त्यांच्यापैकी अनेकजण खेळत नसतील, पण देशातल्या हजारो लाखो तरुणांच्या मनात खेळाबद्दल असलेली आवड हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. क्रिकेट आणि भारत यांच्यात असणारे नाते आपल्याला ठाऊक आहे. पण मी पाहिले की, फूटबॉलबद्दल इतकी आवड इतकी आस्था ? हे लक्षण भविष्यकाळातील सुखद संकेत म्हणावे लागेल. चला तर, रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या आमच्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता एक चैतन्यमय वातावरण येणाऱ्या काळात तयार करुया. प्रत्येक गोष्ट विजय आणि पराजय अशा तराजूत मोजता कामा नये. खेळाडू वृत्तीसह भारताने जगात आपली ओळख निर्माण करावी. क्रीडा क्षेत्रासाठी संबंधित आपल्या सहकाऱ्यांसाठी उत्साहाचे चैतन्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी आपणही काही करुया, असे आवाहन मी देशवासियांना करतो.

गेल्या आठ-दहा दिवसांपासून कुठून ना कुठून तरी नवे नवे निकाल येत आहे. मी निवडणूक निकालांबद्दल बोलत नाही आहे, मी त्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय ज्यांनी वर्षभर नेटाने अभ्यास करुन परिक्षा दिली. दहावी-बारावीचे निकाल एकामागोमाग एक येणे सुरु झाले आहे आणि आमच्या मुली पराक्रम गाजवत आहे हे तर आता स्पष्ट झाले आहे. आनंदाची गोष्ट आहे. ज्यांना या परिक्षांमध्ये यश मिळाले त्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. आणि जे अनुत्तीर्ण झाले, त्यांना सांगू इच्छितो की, आयुष्यात करण्यासारखे खूप काही असते आपल्या अपेक्षेनुसार निकाल लागला नाही म्हणून आयुष्य थांबत नाही विश्वासबरोबर घेऊन जगायला हवे. विश्वासाने पुढे जायला हवे.

पण मला वेगळया नव्या प्रकारचा प्रश्न समोर आला आहे. आणि याबद्दल मी कधीसुध्दा विचार केला नव्हता. माझ्या “माय गोव्ह”वर एक ई-मेल आला तेव्हा त्याकडे माझे लक्ष गेले.

मध्यप्रदेशात राहणारे श्रीमान गौरव पटेल यांनी त्यांची फार मोठी समस्या माझ्यासमोर मांडली आहे. ते म्हणतात की, मध्यप्रदेश बोर्डाच्या परिक्षेत त्यांना 89.33 टक्के गुण मिळाले. हे वाचून मला फार छान वाटले. आनंदाची बातमी आहे पण पुढे त्यांनी त्यांचे दु:ख मांडले आहे. ते म्हणतात, की, 89.33 टक्के मार्क मिळवून मी घरी गेलो तेव्हा मला वाटले होते की, चारही बाजूनी माझे कौतुक होईल, अभिनंदाचा वर्षाव होईल पण झाले भलतेच घरातले मला म्हणाले की, अरे चार गुण जास्त मिळाले असते तर 90 टक्के झाले असते. माझे कुटुंब माझे मित्र, माझे शिक्षक कुणालाही माझ्या 89.33 टक्के गुणांमुळे आनंद झाला नव्हता. आता ही परिस्थिती मी कशी हाताळू, हे मला समजत नाही. हे म्हणजेच सर्व आयुष्य आहे का ? मला जे गुण मिळाले ते चांगले नाही आहेत का ? मी कुठे कमी पडलो का कळत नाही ? पण माझ्या मनावर दडपण आल्यासारखे वाटते.

गौरव, तुमचे पत्र मी बारकाईने वाचले मला वाटते की, ही वेदना तुमच्या एकटयाची नाही तर तुमच्यासारख्या लाखो-करोडो विद्यार्थ्यांची असू शकते. कारण वातावरणच असे तयार झाले आहे की, जे मिळाले त्यात आनंद मानण्यापेक्षा त्रुटी शोधायच्या. नकारात्मक वृत्तीचे हे दुसरे रुप आहे. प्रत्येक गोष्टीत उणीवा काढल्या समाधान मानलेच नाही तर समाजाला कधीच समाधानाच्या दिशेने नेऊ शकत नाही. तुमच्या कुटुंबियांनी, सहकाऱ्यांनी, मित्रांनी तुम्हाला मिळालेल्या उत्कृष्ट गुणांचे कौतुक करायला हवे होते म्हणजे आणखी काही करण्याचे बळ तुम्हाला मिळाले असते. मी आजूबाजुच्या लोकांना, पालकांना आवर्जुन सांगू इच्छितो की, तुमची मुले जो निकाल घेऊन येतील त्याचा स्विकार करा, स्वागत करा. त्या मुलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्या. अन्यथा असाही एक दिवस येईल की, तुम्हाला 100 टक्के गुण मिळतील आणि तरीही कुणी म्हणेल की, तुला शंभर टक्के गुण मिळाले हे खरे आहे पण तू अमूक-अमूक केले असते तर आणखी चांगले झाले असते. म्हणून प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असणे आवश्यक आहे.

जोधपूरच्या संतोष गिरी गोस्वामी यांनीही अशाच अर्थाचे पत्र लिहिले आहे. ते म्हणतात की, त्यांच्या जवळचे लोक त्यांचा निकाल स्विकारायला तयार नाहीत. त्यांचे म्हणणे हेच की, आणखी काहीतरी चांगले करता आले असते, आणखी काहीतरी चांगले करता आले असते.

मला ती कविता पूर्ण आठवत नाहीय पण खूप काळापूर्वी मी ती वाचली होती. कुण्या कविने लिहिले होते की, जीवनाच्या पटावर मी वेदनेचे चित्र काढले आणि त्याचे प्रदर्शन मांडले तेव्हा बघणारे म्हणाले यात सुधारणा हवी. कुणी म्हणाले निळयाऐवजी पिवळा वापरला असता तर बरे झाले असते. कुणी म्हणाले ही रेष इथे असती तर बरे झाले असते. अरे, अरे, माझ्या या वेदनेच्या चित्राला पाहून किमान एकाने तरी आसवे ढाळली असती तर ? असे त्या कवितेचे शब्द होते. मला आता नीट आठवत नाही. खूप आधीच्या काळात वाचलेली कविता. पण त्याचा अर्थ असाच होता. त्या चित्रातली वेदना कुणालाच कळली नाही. प्रत्येकजण सुधारणेबद्दल बोलत होता. संतोष गिरीजी तुम्ही व्यक्त केलेली चिंता अशीच आहे, जशी गौरव यांची आहे, तशीच आपल्या सारख्या करोडो विद्यार्थ्यांची असेल. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे म्हणजे तुमच्यासाठी ओझे ठरु शकते.

मी तर आपल्याला इतकेच सांगेन की, अशा अवस्थेत तुम्ही स्वत:चे संतुलन ढळू देऊ नका. प्रत्येकजण अपेक्षा व्यक्त करतो, ऐकून घ्या. आपल्या आपल्या निश्चियावर ठाम राहा आणि काही अधिक चांगले करण्याचा प्रयत्नही करीत राहा. पण जे प्राप्त झाले आहे त्यावर समाधान मानले नाही तर नवीन वास्तू कधीच उभारु शकणार नाही. यशाचा भक्कम पायाच, मोठया यशाचा आधार ठरतो. यशातून जन्माला येणारा असमाधानाचा भाव यशाकडे जाण्याची शिडी बनू शकत नाही. उलट अपयशाची ही हमी ठरते. आणि म्हणून मी आपल्याला आग्रहपूर्वक सांगेन की, जेवढे यश मिळाले आहे, त्या यशाचे गाणे गा. त्यातून नव्या यशाचे नवे मार्ग खुले होतील. हा मुद्दा मी शेजारी, आईवडिल आणि मित्रांना मुद्दाम सांगू इच्छितो की, तुमच्या अपेक्षा तुमच्या मुलांवर कृपया लादू नका आणि मित्रांनो, जीवनात कधी अपयश आले तर जीवन थांबते का ? ज्याला परिक्षेत चांगले गुण मिळत नाहीत तो खेळात पुढे जातो, संगीत क्षेत्रात पुढे जातो, कलाकुसरीच्या प्रांतात पुढे जातो, व्यापार व्यवसायात पुढे जातो. ईश्वराने प्रत्येकाला काहीना काही कौशल्य दिले आहे. बस्स तुम्ही तुमचे आंतरिक सामर्थ्य ओळखा, त्यावर भर द्या, जीवनात तुम्ही प्रगती कराल. आणि जीवन जगताना हा अनुभव प्रत्येक ठिकाणी येतो. संतुरवाद्याची आपल्याला माहिती असेल. एक काळ असा होता की, संतुर वाद्य काश्मिर खोऱ्यातील लोकसंगीताचे अभिन्न अंग होते. पण पंडित शिवकुमार ज्यांनी या वाद्याला हात लावला आणि आज जागतिक संगीत क्षेत्रात ते एक महत्त्वाचे वाद्य बनले. सनई – भारतीय संगीत क्षेत्रात सनई या वाद्याला मर्यादित वाव होता. राजा-महाराजांच्या काळात दरबाराच्या प्रवेशद्वारांपाशी सनईची जागा होती. पण उस्ताद बिसिमिल्ला खान यांनी हे वाद्य हातात घेतले आणि जगातील एक उत्तम वाद्य या उंचीवर सनईला नेऊन ठेवले. सनईची स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली. म्हणून तुमच्यापाशी काय आहे ? कसे आहे ? याची चिंता करु नका ? जे आहे त्यावर एकाग्र व्हा, एकचित्त व्हा. त्याचे फळ हे मिळाल्याशिवाय राहणार नाही.

माझ्या प्रिय देशवासियांनो, कधी-कधी माझ्या लक्षात येते की, आपल्या देशातील गरीब कुटुंबांत औषधांवर होणारा खर्च त्या कुटुंबाचा आर्थिक गाडा घसरणीला लावणारा ठरतो. आणि हे खरे आहे की, आजारी न पडण्यासाठी खर्च खूप कमी येतो. पण आजारी पडल्यानंतर पुन्हा आरोग्य पहिल्यासारखे व्हायला मात्र खूप खर्च येतो. आपण आपली जीवनशैली अशी का ठेऊ नये की, आपल्याला आजार शिवणारच नाही. कुटुंबांवर त्याचा आर्थिक भार पडणारच नाही. एक म्हणजे, स्वच्छता राखणे हा आजारापासून दूर राहण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे, आधार आहे. गरीबांची सर्वात मोठी सेवा कोणी करु शकत असेल ? तर ती आहे स्वच्छता. आणि दुसरे म्हणजे ज्यासाठी मी सतत आग्रह धरतो तो विषय म्हणजे योग. काहीजण त्याला योगा असेही म्हणतात. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. संपूर्ण जगभर योगाविषयी एक आकर्षण आहे, श्रध्दा आहे आणि जगाने त्याचा स्विकार केला आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली ही अनमोल भेट आहे, जी आपण जगाला दिली आहे. तणावग्रस्त जगाला संतुलित जीवन जगण्याचे बळ योगातून मिळते. प्रिव्हेनशन इज बेटर दॅन क्युअर, आजारी पडल्यावर उपाय करण्यापेक्षा आजार होऊच नये म्हणून काळजी घेणे उत्तम. योग विद्येशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींसाठी निरोगी राहणे, संतुलित असणे, ठाम इच्छाशक्ती मनात निर्माण होणे, प्रत्येक कामात एकाग्रता साधणे या गोष्टी सहज शक्य होतात. 21 जून – योगदिन हा काही केवळ एक कार्यक्रम सोहळा नाही. योगाचा विस्तार व्हावा, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योग विद्येचे स्थान असावे, प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन आयुष्यातील 20 मिनिटे, 25 मिनिटे, 30 मिनिटे योगसाधनेसाठी देईल, यासाठी 21 जून हा योग दिन आम्हाला प्रेरणा देतो. आणि कधी कधी सामूहिक वातावरणामुळे व्यक्तीच्या जीवनात बदल घडू शकतो. मला आशा आहे येत्या 21 जूनला आपण याबाबतीत नक्की काहीतरी कराल. तुम्हाला पुढाकार घेण्यासाठी अजून एक महिन्याचा अवधी आहे. आपण भारत सरकारच्या संकेतस्थळाला भेट द्या, योग विद्येचा या वेळचा अभ्यासक्रम कोणता ? कोण-कोणती आसने करायची आहेत ? ती कशी करायची ? याची संपूर्ण माहिती त्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. ती माहिती पहा, आपल्या गावात, आपल्या गल्लीत, आपल्या शहरात त्याप्रमाणे करवून घ्या. आपल्या शाळेत, संस्थेत, अगदी कार्यालयातसुध्दा. अजुन एक महिना आपल्या हातात आहे. सुरुवात करा आणि पहा. 21 जून रोजी या उपक्रमाचा तुम्ही एक भाग व्हाल. मी अनेकदा वाचले आहे की, बऱ्याच कार्यालयांमध्ये रोज सकाळी नियमितपणे योगसाधाना केली जाते. सामूहिक प्राणायाम केला जातो. त्यामुळे संपूर्ण कार्यालयाची कार्यकुशलता वाढते. पूर्ण कार्यालयाची संस्कृती बदलते आणि वातावरणही बदलते. 21 जून या दिवसाचा उपयोग आपण आपल्या जीवनात योगविद्या यासाठी करु शकतो का ? आपल्या सामाजिक जीवनात योगशास्त्र असावे यासाठी करु शकतो का ? आपल्या अवतीभवती योगविद्येचा प्रसार व्हावा यासाठी करु शकतो का ? मी यावेळी चंदीगड येथे एका कार्यक्रमात सहभागी होणार आहे. 21 जून रोजी चंदीगडच्या नागरिकांबरोबर मी योगासन करणार आहे. आपणही त्यादिवशी सहभागी व्हा. सारे जग त्या दिवशी योगासने करणार आहे. आपण मागे राहू नका अशी माझी विनंती आहे. आपण निरोगी असणे हे भारताला निरोगी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, “मन की बात” माध्यमातून मी सतत तुमच्याशी जोडला जातो. अनेक दिवसांपूर्वी मी आपल्याला एक मोबाईल क्रमांक दिला होता. त्यावर मिस्ड कॉल देऊन आपण “मन की बात” ऐकू शकत होता. पण आता हे आणखी सोपे करण्यात आले आहे. आता “मन की बात” ऐकण्यासाठी फक्त चार आकडी क्रमाकांवर मिस्ड कॉल द्या. तो चार आकडी क्रमांक आहे एक नऊ दोन दोन, एकोणीसशे बावीस, वन नाईन टू टू. या नंबरवर मिस्ड कॉल देऊन “मन की बात” केव्हाही, कधीही, आपल्याला हव्या त्या भाषेत आपण ऐकू शकाल.

माझ्या देशवासियांनो, आपणा सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. पाण्याबद्दल मी सांगितलेले विसरु नका. लक्षात ठेवाल ना ? ठिक आहे. धन्यवाद. नमस्ते.

B.Gokhale