Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात” या कार्यक्रमाद्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद


माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार, आपण रेडिओवरुन माझी “मन की बात” ऐकत आहात. पण मनात मात्र काही वेगळेच सुरु आहे. मुलांच्या परिक्षा आता सुरु होतील, काही जणांच्या दहावी-बारावीच्या परीक्षा बहुधा 1 मार्च पासूनच सुरु होतील. तुमच्या मनात आता परीक्षेचेच विचार सुरु असतील. या तुमच्या प्रवासात मीही तुमच्याबरोबर सहभागी होऊ इच्छितो. तुम्हाला तुमच्या मुलांच्‍या परीक्षेबद्दल जेवढी काळजी वाटते, तितकीच मलाही वाटते आहे. पण परीक्षेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलला तर आपण चिंतामुक्त होऊ शकतो. माझ्या मन की बात कार्यक्रमाच्या मागच्या भागात मी आपल्याला सांगितले होते की तुमचे अनुभव, तुमच्या सूचना नरेंद्र मोदी ॲपवर मला पाठवा. शिक्षकांनी, जीवनात उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी, समाजाच्या हितचिंतकांनी अनेक गोष्टी या ॲपवर लिहून माझ्याकडे पाठवल्या, याचा मला आनंद वाटतो. यात दोन मुद्दे मला विशेषत्वाने जाणवले. एक म्हणजे सूचना पाठवणाऱ्यांनी, अनुभव लिहिणाऱ्यांनी विषयाला धरुन, मुद्दा न सोडता लिहिले, आणि दुसरे म्हणजे हजारोंच्या संख्येने सूचना आणि अनुभव या ॲपवर नागरिकांनी पाठवले. मला वाटते हाच यातला महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाचा षयक आहे. पण झाले असे की परीक्षा हा विषय, आपली शाळा, कुटुंब किंवा विद्यार्थी या पुरताच मर्यादित ठेवला आहे. माझ्या ॲपवर जया सूचना आल्या त्यावरुन वाटतंय की, हा महत्त्वाचा विषय आहे, पूर्ण देशभर विद्यार्थ्यांशी संबंधित या मुद्दयांची चर्चा सातत्याने व्हायला हवी.

आज माझ्या मन की बात कार्यक्रमातून खास करुन पालकांशी, विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी मला बोलायचे आहे. मी जे ऐकले आहे, जे वाचले आहे, मला जे सांगितले गेले , त्यातल्या काही गोष्टी मी सांगेन, मला स्वत:ला जे वाटते तेही सांगेन. पण जे विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत, त्यांना माझा हा 25-30 मिनिटांचा संवाद निश्चित उपयोगी ठरेल असा मला विश्वास वाटतो.

माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्याशी काही बोलण्याच्या आधी, आजच्या “मन की बात”ची सुरुवात, जगातील एका विख्यात ओपनरकडून केली तर ? जीवनात यशाची शिखरे गाठताना, त्यांना काय काय उपयोगी पडेल ? त्यांचे अनुभव तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. भारतभरातील तरुण वर्गाला ज्यांच्याबद्दल अभिमान वाटतो त्या भारतरत्न श्रीमान सचिन तेंडुलकर यांनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलाय, तो मी तुम्हाला ऐकवतो.

“नमस्‍कार, मी सचिन तेंडूलकर बोलतो आहे. काहीच दिवसात परीक्षा सुरु होणार आहेत, हे मला माहित आहे. आपल्यापैकी काही जण तणावाखाली असतील. माझा एकच संदेश आहे. तुम्हाला, तुमचे आई वडिल तुमच्याकडून अपेक्षा ठेवतील, तुमचे शिक्षक ठेवतील, तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य ठेवतील, तुमचे मित्रही ठेवतील. तुम्ही कुठेही गेलात, तरी सर्व विचारतील तुमची तयारी कशी सुरु आहे ? तुम्ही किती टक्के गुण मिळवाल ? मला हेच सांगायचे की तुम्ही स्वत:च स्वत:साठी एक ध्येय निश्चित करा, दुसऱ्या कोणाच्या अपेक्षांच्या दबावाखाली येऊ नका. तुम्ही जरुर मेहनत करा, पण एक वास्तववादी, साध्य होण्याजोगे ध्येय सवत:साठी निश्चित करा आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. मी जेव्हा क्रिकेट खेळत होतो, तेव्हा माझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. गेल्‍या 24 वर्षात अनेक कठीण क्षण आले आणि अनेकदा चांगले क्षणही आले. पण लोकांच्या अपेक्षा नेहमीच असत आणि त्या वाढतच गेल्‍या, जसजसा काळ पुढे जात राहिला, तसतशा अपेक्षाही वाढत गेल्या. आणि त्यासाठी मला एक उपाय शोधणे गरजेचे होते. तेव्हा मी असा विचार केला की मी स्वत: माझ्या अपेक्षा ठेवीन आणि स्वत:च स्वत:चे ध्येय निश्चित करीन. जर का मी स्वत:च स्वत:चे ध्येय निश्चित करत असेन, आणि ते साध्य करु शकत असेन, तर मी देशासाठी नक्कीच काही ना काही चांगले करु शकतो आहे. आणि मग तेच ध्येय साध्य करण्यासाठी मी प्रयत्न करत असे. माझे लक्ष चेंडूवर केंद्रीत असायचे आणि मग आपणहूनच सर्व ध्येय साध्य होत गेली. मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की, तुम्ही, आणि तमुचे विचार सकारात्मक असणे अत्यंत गरजेचे आहे. सकारात्मक विचारांपाठोपाठ सकारात्मक परिणाम येतील. त्यामुळे तुम्ही निश्चित सकारात्मक रहा आणि ईश्वर तुम्‍हाला नक्कीच चांगले परिणाम देईल याची मला पूर्ण आशा आहे आणि मी तुम्हाला परिक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. तणावमुक्त होऊन पेपर लिहा आणि चांगला निकाल मिळवा शुभेच्छा.

पाहिलंत मित्रांनो, तेंडुलकरजी काय सांगत होते ? अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जाऊ नका. तुमचे भवितव्य तुम्हाला घडवायचे आहे. तुमचे उद्दिष्ट तुम्हीच ठरवा, तुमचे ध्येय तुम्हीच ठरता, मुक्त मनाने, मुक्त विचाराने आणि मुक्त सामर्थ्याने सचिनजींनी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतील असा मला विश्वास आहे. आणि हे ही तितकेच खरे आहे की, प्रतिस्पर्धा कशासाठी ? अनुस्पर्धा, स्वयंस्पर्धा का नसावी ? इतरांशी स्पर्धा करण्यात आपला वेळ का वाया घालवावा ? आपण आपल्या स्वत:शी स्पर्धा का करु नये ? आपणच याआधी गाठलेली यशाची शिखरे ओलांडून नवी शिखरे पादाक्रांत करायचा, निश्चिय का करु नये ? तुम्ही बघाल की, कुणीही तुम्हाला पुढे जायला रोखू शकणार नाही, आणि याआधी मिळवलेल्या यशापेक्षाही अधिक यश तुम्ही मिळवाल, तेव्हा आनंद मिळवण्यासाठी, समाधान मिळवण्यासाठी दुसऱ्या कुणावर अवलंबून राहण्याची तुम्हाला आवश्यकता वाटणार नाही. आत्मसमाधानाचा अनुभव घ्याल.

मित्रांनो, परीक्षा म्हणजे गुणांचा, आकडयांचा खेळ मानू नका. कुठे पोचलो, किती मिळवले ? या हिशोबात अडकू नका. एखाद्या महान उद्देशासाठी जगण्याला जोडून घ्या. मनात स्वप्न घेऊन चालायला हवे, संकल्पबध्द असायला हवे. आपण योग्य पध्दतीने पुढे चाललोय का ? हे या परीक्षांमधून कळते, आपली गति योग्य आहे का ? हे या परीक्षांमधून समजते. आणि म्हणून तुमची स्वप्न विराट, विशाल असतील तर परीक्षा म्हणजे आपोआपच आनंदाचा उत्सव होईल. तुम्ही ठरवलेल्या महान उद्देशाची पूर्तता करण्यासाठी, परीक्षा म्हणजे एक पाऊल ठरेल. तुम्हाला मिळणारे प्रत्येक यश म्हणजे ते महान-उद्दिष्ट साध्य करण्याची जणू किल्ली ठरेल. आणि म्हणूनच यावर्षी काय होईल ? या परिक्षेत काय होईल ? एवढयावरच स्वत:ला मर्यादित ठेवू नका. डोळयासमोर एक महान ध्येय ठेवून वाटचाल करा, आणि त्यातही अपेक्षापेक्षा कमी यश मिळाले तरी निराशा वाटणार नाही, अधिक जोमाने, अधिक ताकदीने, अधिक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.

हजारो नागरिकांनी माझ्या ॲपवर, त्यांच्या मोबाईलमधून छोटे छोटे मुद्दे लिहून पाठवले आहेत. निरोगी शरीरातच निरोगी मन असते या मुद्दयावर श्रेय गुप्ता यांनी भर दिला आहे, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर, स्वत:च्या आरोग्यकडेही लक्ष द्यायला हवे. त्यामुळे परीक्षेच्या काळात अडचणी येणार नाहीत. आता अगदी शेवटच्या दिवशी, आयत्यावेळी मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही जोर-बैठका काढा, तीन किलोमीटर, पाच किलोमीटर धावायला जा, पण परीक्षेच्या काळात आपली दिनचर्या कशी असावी ? हे महत्त्वाचे आहे. खरे तर पूर्ण वर्षभर, 365 दिवस, आपली दिनचर्या, आपल्या स्वप्नांना आणि संकल्पनांना अनुकूल असायला हवी. श्रीमान प्रभाकर रेड्डी यांनी मांडलेला एक मुद्दा मला पटला. वेळेवर झोपलो आणि पहाटे लवकर उठून अभ्यासाची उजळणी करणे याबद्दल ते आग्रहाने लिहितात. प्रवेशपत्र आणि अन्य आवश्यक गोष्टींसह परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचयला हवे असे प्रभाकर रेड्डी म्हणतात. हे सांगायचे धाडस मी कदाचित केले नसते, कारण झोपेच्या बाबतीत मी फारसा गंभीर नाहीये. आणि मी पुरेशी झोप घेत नाही अशी माझ्या बऱ्याच मित्रांची तक्रार असते. हे माझ्यातील न्यून काढून टाकण्याचा मी प्रयत्न करीन. पण हा मुद्दा मला पटला. झोपण्याची निश्चित वेळ, गाढ झोप हे तितकेच महत्त्वाचे आहे जितक्या आपल्या दिवसभरातील अन्य गोष्टी महत्त्वाच्या असतात. मी नशीबवान आहे. माझी झोप कमी आहे पण गाढ मात्र आहे आणि तेवढी मला पुरते. पण तुम्हाला मात्र मी आवर्जून सांगेन. नाहीतर काही लोकांना सवय असते, झोपण्यापूर्वी दूरध्वनीवर बराच वेळ बोलत राहायचे. आता तेच विचार मनात असतील तर झोप कशी येणार ? आणि झोपण्याबद्दल मी सांगतोय तेव्हा असे मानू नका समजू की परीक्षेसाठी झोपण्याबद्दल मी सांगतोय. गैरसमज नका करुन घेऊ. परीक्षेच्या काळात, तुम्ही तणावमुक्त अवस्थेत परीक्षा द्यावी यासाठी मी झोपेबद्दल बोलतोय. झोपून रहा असे मला म्हणायचे नाही. नाहीतर असे नको व्हायला की परीक्षेत कमी गुण मिळाले, आणि आईने कारण विचारले तर सांगाल, की मोदीजींनी, झोपायला सांगितले होते, म्हणून मी झोपलो. तुम्ही असे नाही ना करणार ? मला खात्री आहे, नाही करणार.

जीवनात शिस्त असणे हा यशाचा पाया भक्कम असण्याचे महत्त्वाचे कारण आहे. हा भक्कम पाया शिस्तीमुळेच असू शकतो. आणि जे विस्कळीत असतात, बेशिस्त असतात, सकाळी करायचे काम संध्याकाळी करतात, दुपारी करायचे काम रात्री उशिरापर्यंत करतात, त्यांना असे वाटते की काम झाले पण त्यात त्यांची खूप ऊर्जा वाया जाते आणि क्षणोक्षणी ते तणावाखाली असतात. आपल्या शरीराचा एखादा अवयव थोडा दुखत असेल तर आपण अस्वस्थ असतो हे तुम्ही अनुभवले असेल. एवढेच नाही तर दिनचर्याही त्यामुळे बिघडते. आणि म्हणून कोणतीही गोष्ट लहान, किरकोळ समजू नका. तुम्ही बघा, तुम्ही जे साध्य करायचे ठरवले आहे, त्याच्या बाबतीत तडजोड करण्याची सवय लावून घेऊ नका. ठरवा, करुन बघा.

मित्रांनो, मी असेही काही वेळा बघितले आहे की परीक्षा दयायला जे विद्यार्थी जातात. त्यांच्यात दोन प्रकार असतात. आपण काय वाचले आहे ? काय शिकलो ? आपली बलस्थाने कोणती ? या विषयावर लक्ष केंद्रीत करणारे काही विद्यार्थी असतात आणि दुसऱ्या प्रकारातले विद्यार्थी, कोण जाणे काय प्रश्न असतील ? कुणाला माहित कसे प्रश्न असतील ? माहित नाही सोडवायला जमेल की नाही ? प्रश्नपत्रिका कठीण असेल की सोपी ? या विवंचनेत असतात. या दोन्ही प्रकारचे विद्यार्थी आपण बघितले असतील. प्रश्नपत्रिका कशी असेल ? या ताणाखाली जे असतात, त्या ताणाचा नकारात्मक प्रभाव त्यांच्या निकालावर पडतो. आणि जो अभ्यास मी केला आहे त्या बळावर मी कोणतीही प्रश्नपत्रिका सोडवेन अशा आत्मविश्वासाने जे जातात ते कशीही प्रश्नपत्रिका आली तर निर्धाराने सोडवतात. याबाबतीत माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पध्दतीने तुम्हाला कुणी सांगू शकत असेल तर ते आहेत, काटशह, देण्यात ज्यांचे प्रभूत्व आहे आणि जगभरातील भल्या-भल्यांना ज्यांनी काटशह दिला आहे ते जगविख्यात बुध्दीबळपटू विश्वनाथन् आनंद. 64 चौकडयांच्‍या राजाने अनुभव सांगितले आहेत. या परिक्षेला काटशह देऊन यश मिळविण्याचा मार्ग आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ या.

नमस्कार मी विश्वनाथन आनंद. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन मला सुरुवात करु द्या. मी माझ्या परीक्षेसाठी कसा जायचो आणि त्याबाबतचा माझा अनुभव मी आता सांगणार आहे. परीक्षा, हया तुमच्या असण्यात नंतर येणाऱ्या समस्यांप्रमाणेच असतात, हे मला जाणवले. तुम्ही व्यवस्थित आराम केला पाहिजे, रात्रीची शांत झोप घेतली पाहिजे, तुम्ही पोटभर खाल्ले पाहिजे, तुम्ही नक्कीच भुके राहता कामा नये आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही शांत राहिले पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही शांत राहिले पाहिजे. हे सर्व बुध्दीबळाच्या डावाप्रमाणेच आहे. जेव्हा तुम्ही खेळत असता, तेव्हा तुम्हाला माहिती नसते, कोणते प्यादे समोर येणार आहे, त्याचप्रमाणे वर्गातही तुम्हाला माहित नसते, की परीक्षेत कोणता प्रश्न येणार आहे ? म्हणूनच तुम्ही जर शांत राहिलात आणि तुम्ही पोटभर खाल्ले असेल, तुमची नीट झोप झालेली असेल तर तुम्हाला कळेल की तुमच्या मेंदूला योग्य वेळी योग्य उत्तर आठवते. त्यामुळे शांत रहा. स्वत:ला जास्त ताण देऊ नका, अति अपेक्षा ठेवू नका. हे महत्वपूर्ण आहे, याकडे एक आव्हान म्हणून पहा – वर्षभरात मला जे शिकवले ते मला आवठतेय का, मी हे प्रश्न सोडवू शकतो का ? अगदी शेवटच्या क्षणी सर्वात महत्त्वाच्या गोष्टीची पुन्हा उजळणी करा, ज्या गोष्टी आठवत नाही त्या आठवून पहा, तुम्ही परीक्षा देत असताना तुम्हाला कदाचित शिक्षकांबरोबरचे किंवा विद्यार्थ्यांबरोबरचे काही प्रसंग आठवतील आणि यामुळे तुम्हाला त्या विषयाबाबतचे बरेच काही आठवायला मदत होईल. जर का तुम्ही कठीण वाटणाऱ्या प्रश्नांची उजळणी केली तर तुम्हाला असे लक्षात येईल की ते तुमच्यासाठी नवीनच प्रश्न आहेत आणि मग जेव्हा तुम्ही परीक्षा द्याल तेव्हा तुम्ही ते अधिक चांगल्या प्रकारे सोडवू शकाल. त्यामुळे शांत रहा. रात्रीची चांगली झोप घ्या, अति आत्मविश्वास दाखवू नका पण त्याचवेळी निराशावादीही राहू नका. मला नेहमीच असे आढळून आले आहे की तुम्हाला भीती वाटत होती त्यापेक्षा या परीक्षा अधिक चांगल्या जातात. त्यामुळे आत्मविश्वासपूर्ण रहा. आणि तुम्हाला खूप खूप शभेच्छा.

विश्वनाथन्‌ आनंद यांनी खरोरखरच महत्त्वाची गोष्ट सांगितली. आणि आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ सामना खेळताना तुम्हीही त्यांना पाहिले असेल, की ते कसे ठामपणे बसतात. एकाग्र होऊन बसतात, त्यांची नजरसुध्दा किंचित विचलित होत नाही हे तुम्ही बघितले असेल. अर्जुन आणि पक्षाचा डोळा ही गोष्ट आपण ऐकली आहे. अर्जुनाची दृष्टी जशी त्‍या पक्षाच्या डोळयावरच खिळली होती, त्याप्रमाणेच विश्वनाथन्‌ आनंद यांची दृष्टी केवळ ध्येयाकडेच केंद्रीत झालेली असते आणि स्वत:मधील शांतीची ती अभिव्यक्ती असते, प्रगटीकरण असते. आता जर कोणी असे म्हणेल की यामुळे आतील शांतीवस्था येणारच. तर असे सांगणे कठीण आहे हे खरे आहे. पण प्रयत्न केले पाहिजेत. ते हसत हसत का करु नयेत ? तुम्ही बघा, हसत रहा अगदी परीक्षेच्या काळातही हास्य विनोदाचा मनमोकळा आनंद घ्याल, तर हा शांततेचा अनुभव तुम्हाला आपोआप येईल.

तुम्ही मित्रांशी बोलत नाही, एकटेच जाता, कोमेजून गेल्‍यासारखे राहता, शेवटच्या क्षणापर्यंत पुस्तक धुंडाळत राहता तर मग तुमचे मन शांत राहणार नाही. हसा, खळखळून हसा, मित्रांबरोबर विनोद, गंमती यांची देवाण घेवाण करा. आणि मग बघा शांत वातावरण कसे आपोआपच निर्माण होते ते.

एक छोटी गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगतो. अशी कल्पना करा, की तुम्ही एका तलावाच्या काठावर उभे आहात, आणि नितळ, पारदर्शक पाण्यामधून, पाण्याखालच्या गोष्टी स्वच्छ दिसत आहेत. पण अचानक त्या पाण्यात कुणीतरी दगड टाकला, तर पाणी डचमळू लागेल. आणि पाण्याखालच्या गोष्टी ज्या स्वच्छ दिसत होत्या, त्या आता दिसतील का ?

जर पाणी शांत असेल तर अगदी खोलवरच्या गोष्टीही दिसतात पण पाण्याचा पृष्ठभाग विचलित झाला तर खालचे काहीच दिसत नाही. तुमच्याजवळ खूप काही आहे. वर्षभर तुम्ही केलेल्या मेहनतीचे संचित तुमच्यापाशी आहे. पण तुमचे मन शांत नसेल तर हे संचित गवसणार नाही. आणि मन स्थिर असेल तर, या साऱ्या मेहनतीचे फलित स्पष्टपणे तुमच्यासमोर येईल आणि तुम्ही परीक्षा सहज, निर्विघ्न देऊ शकाल.

माझ्या बाबतीतली एक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. कधी कधी मी एखादे व्याख्यान ऐकायला जातो किंवा सरकार चालवताना असे काही मुद्दे, विषय समोर येतात ज्याबद्दल मला माहित नसते, आणि मला अधिक एकाग्रतेने त्याकडे पहावे लागते, कधी कधी विशेष लक्ष देऊन विषय समजून घेण्याचा प्रयत्न मी करतो. त्यावेळी अनुभव येतो आतल्या ताणाचा. मग मला वाटते की थोडा आराम केला तर बरे वाटेल. त्यासाठी मी स्वत:च एक तंत्र विकसित केले आहे. मी दीर्घ श्वसन करतो, खोलवर श्वास घेतो, तीन वेळा, पाच वेळा खोल श्वास घेतो. या सगळयासाठी 30 सेकंद, 40 सेकंद किंवा 50 सेकंद लागतात, पण हे केल्यानंतर माझे मन शांत होते आणि विषय समजून घेण्यासाठी मनाची तयारी होते. हा माझा अनुभव तुम्हालाही उपयोगी पडेल असेही शक्य आहे.

रजत अग्रवाल यांनी एक चांगली गोष्ट सांगितली आहे. माझ्या ॲपवर जे लिहितात, “ रोज कमीत कमी अर्धातास तरी आपण आपल्या मित्रांबरोबर, कुटुंबियांवर आनंदात वेळ घालवायला हवा. त्यांच्याशी गप्पा मारायला हव्यात.

ही एक महत्त्वाची गोष्‍ट रजतजींनी सांगितली कारण आपण अनुभवले असेल की, जेव्हा आपण परीक्षा देऊन घरी येतो. तेव्हा काय लिहिले? किती सोडवले? याचा धांडोळा घ्यायला बसतो. किती चुकले? काय बरोबर लिहिले? हे तपासायला लागतो. घरात आईवडील शिकलेले असतील आणि त्यातही ते शिक्षक असतील, तर पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला पुन्हा सोडवायला लावतात. सांग, काय लिहिलेस? काय आले? आणि मग गुणांची बेरीज करुन दाखवतात. बघ तुला 40 मिळतील की 80 की 90 गुण. ज्‍या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून तुम्ही आलात. त्याच विषयात तुमचे मन गुंतून राहते. आणि तुम्ही काय करता? मित्रांना फोन करुन विचारता अरे तू काय लिहिलेस? तो विषय तुला कसा गेला? काय वाटतेय तुला? अरे मी गडबड केली, माझे चुकलेच, मित्रा काय करु मला माहित होते पण आठवलेच नाही रे, आपण यातच अडकून जातो.

मित्रांनो, असे करु नका. उत्तरपत्रिकेत जे लिहिले ते लिहिले, आता इतर विषयांवर घरातल्यांशी बोला. जुने आनंदाचे क्षण आठवा. आई-वडीलांबरोबर एखाद्या ठिकाणी कधी गेला असाल तर ते क्षण आठवा, अभ्यास, परीक्षा यातून बाहेर पडून किमान अर्धा तास यासाठी द्या. रजतजींनी सांगितलेला मुद्दा समजून घ्यावा असाच आहे.

मित्रहो, “शांती” या विषयावर मी काय तुम्हाला सांगणार? आज तुम्ही परीक्षा द्यायला जायच्या आधी, अशा एका व्यक्तीने तुमच्याकरता संदेश पाठवला आहे की जे मूळात शिक्षक आहेत आणि आज एका अर्थानं संस्कार शिक्षक झाले आहेत. रामचरित मानस या महान ग्रंथाला वर्तमानकाळाशी जोडून घेऊन देशभर आणि जगभर हा संस्कारांचा ओघ पोचवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्या पूज्य मुरारी बापू यांनी विद्यार्थ्यांकरता एक क्लुप्ती सांगितली आहे. ते शिक्षक आहेत आणि चिंतनही करतात. या संदेशात या दोन्ही गोष्टींचं प्रत्यंतर येईल.

मी मुरारी बापू बोलतोय. मी विद्यार्थी बंधू-भगिनींना हेच सांगू इच्छितो की परीक्षेच्या वेळी मनावर कोणताही ताण न ठेवता, विचारपूर्वक निर्णय घेऊन आणि एकाग्र चित्ताने परीक्षा द्या आणि जी परिस्थिती समोर आली आहे तिचा स्विकार करा. माझा अनुभव आहे की परिस्थितीचा स्विकार केला तर आपण खूप प्रसन्न आणि आनंदी राहू शकतो. तुमच्या परीक्षेत तुम्ही निर्भर होऊन आणि प्रसन्नचित्ताने पुढे गेलात तर जरुर यश मिळेल आणि जर कदाचित यश नाही मिळाले तरीही “नापास” झाल्याचे दु:ख होणार नाही आणि यशस्वी झाल्याचा अभिमानही वाटेल. एक शेर सांगून मी माझा संदेश आणि शुभेच्छा देतो. लाजिम नही कि हर कोई हो कामयाब ही, जीना भी सिखिए नाकामियों मे साथ | आपल्या आदरणीय पंतप्रधानांचा हा जो मन की बात कार्यक्रम आहे त्याचे मी खूप स्वागत करतो. सर्वांना माझ्या अनेक अनेक शुभेच्छा | धन्यवाद.

एक मार्गदर्शक, मूल्यवान संदेश पाठवल्याबद्दल मी पूज्य मुरारी बापू यांचे आभार मानतो. मित्रहो आज आणखी एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. यावेळी नागरिकांनी, त्यांचे जे अनुभव माझ्यापर्यंत पोचवले त्यात योग विषयाची चर्चा केली आहे. हे माझ्या लक्षात आले. आणि मला याचा आनंद वाटतो की, जगभरात मी जिथे जातो, तिथे मला भेटणाऱ्या व्यक्ति थोडा वेळ का होईना, योग या विषयावर बोलतात. ती व्यक्ती परदेशी असो, भारतीय असो, योगाबद्दल लोकांच्या मनात आकर्षण निर्माण होऊ लागले आहे. याचा मला आनंद वाटतो. नागरिकांना या विषयी जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली आहे हेच बघा ना, श्री. अतनु मंडल, श्री. के. जी. आनंद, श्री. अभिजीत कुलकर्णी आणि असे खूप जण, ज्यांनी ध्यानधारणेबद्दल, लिहिलेय माझ्या ॲपवर, योग यावर त्यांनी भर दिला आहे. असो, मित्रहो, तुम्ही उद्यापासून योगसाधना करायला लागा, असे मी आज आपल्याला सांगितले. तर ते काही योग्य नाही. पण जे विद्यार्थी नियमितपणे योगासने करतात त्यांनी आज परीक्षा आहे म्हणून योगासने केली नाही, असे करु नये. मात्र एक गोष्ट निश्चित. विद्यार्थीदशा असो की आयुष्याचा उत्तरार्ध अंतर्मनाचा विकास साधण्याच्या प्रवासात योगसाधना ही जणू गुरुकिल्ली आहे. यावर तुम्ही वश्य लक्ष द्या. आपल्या आसपास योगसाधना करणारे, योगविद्या जाणणारे कुणी असतील, तर त्यांना अवश्य भेटा. जरी यापूर्वी तुम्ही कधीही योगविद्येचा अभ्यास केला नसेल, तरीही योगसाधनेतल्या अशा काही सोप्या गोष्टी ते तुम्हाला सांगतील, ज्या चार ते पाच मिनिटात तुम्ही करु शकाल. बघा, तुम्हाला शक्य आहे का? माझा मात्र त्यावर पूर्ण विश्वास आहे.

माझ्या तरुण मित्रांनो, परीक्षा केंद्रात जाण्याची तुम्हाला फार घाई असते. पटापट जावे आणि आपल्या बाकावर बसावे, असे वाटते ना? हे सगळे घाईगडबडीत का करायचे? आपल्या पूर्ण दिवसाचे नियोजन असे का नसावे की रस्त्यात वाहनांच्या वर्दळीमुळे आपल्याला थांबावे लागले तरीही परीक्षा केंद्रावर आपण वेळेतच पोहचू. अन्यथा त्यामुळे मनात तणाव निर्माण होतो.

आणखी एक गोष्ट, प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला आपल्यासाठी काही सूचना असतात. आपण त्या वाचत बसलो, तर वेळ जाईल, असे आपल्याला वाटते. पण असे नाही मित्रांनो, त्या सूचना लक्षपूर्वक वाचा, दोन मिनिटे, तीन, पाच मिनिटे लागतील, काही बिघडत नाही. त्या सूचना बारकाईने वाचल्यामुळे, तुम्हाला हे कळेल की उत्तरपत्रिका कशी लिहायची आहे. त्या सूचना समजून घेतल्यात तर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप बदलले आहे, हे प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर कळते, असेही मी बघितले आहे. अशावेळी या सूचना वाचून, समजून घेतल्या तर, बदललेल्या स्वरुपाशी आपण स्वत:ला जुळवून घेऊ शकतो. भले यासाठी तुमची पाच मिनिटे जातील, पण हे करा असे मी आपल्याला आवर्जून सांगेन.

श्रीमान यश नागर यांनी त्यांचा अनुभव मोबाईल अपॅवर लिहून पाठवला आहे. ते लिहितात की, प्रश्नपत्रिका पहिल्यांदा नजरेखालून घातली तेव्हा ती फारच अवघड वाटली. पण तीच प्रश्नपत्रिका दुसऱ्यांदा वाचली आत्मविश्वासाने, तेव्हा लक्षात आले की आता हीच प्रश्नपत्रिका माझ्यासमारे आहे. आता कोणताही नवीन प्रश्न येणार नाही. यात आहेत, तेवढेच प्रश्न मला सोडवायचे आहेत. आणि मी पुन्हा विचार केला. पुढे यश नागर लिहितात की आता ही प्रश्नपत्रिका मला नीट समजली. पहिल्यांदा वाचली तेव्हा वाटले की आपल्याला यातले काहीच सोडवता येणार नाही. पण दुसऱ्यांदा वाचल्यावर लक्षात आले की, प्रश्न तेच आहेत, फक्त मांडणी वेगळ्या पद्धतीने केली आहे आणि त्याची उत्तरे मला माहित आहेत. प्रश्न समजून घेणे महत्त्वाचे आहे. तसे न केल्याने ते फार कठीण आहेत, असे आपल्याला वाटते. तुम्ही प्रश्न दोनदा, तीनदा, चार वेळा वाचा आणि तुम्ही केलेल्या अभ्यासाशी ते ताडून पहा. हा यश नागर यांनी मांडलेला मुद्दा आपण लक्षात घ्यावा, असे मी आपल्याला सुचवेन. आणि मग तुम्ही बघाल की किचकट वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कशी सहज लिहिता येतात ते.

भारतरत्न आणि ज्येष्‍ठ वैज्ञानिक सी. एन. आर. राव यांनी त्यांच्या संदेशात धैर्य हा मुद्दा अधोरेखित केला आहे. याचा मला आज आनंद होतो आहे. किमान शब्दांमध्ये पण कमालीचा सुंदर संदेश राव साहेबांनी पाठवला आहे, आपण तो ऐकूया-

“बंगळूरहून मी सी. एन. आर. राव बोलतोय. परीक्षांमुळे त्यातही स्पर्धात्मक परीक्षांमुळे अस्वस्थता येते हे मला पूर्ण माहित आहे. काळजी करु नका. तुमचे सर्वोत्तम द्या, हेच मी माझ्या सर्व तरुण मित्रांनो सांगतो. पण त्याचवेळी हेही लक्षात ठेवा की या देशात इतर अनेक संधी उपलब्ध आहे. आयुष्यात तुम्हाला काय करायचे आहे ते ठरवा आणि ते सोडू नका, तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही या विश्वाची लेकरे आहात हे विसरु नका, झाडे आणि डोंगरांप्रमाणेच तुम्हालाही इथे राहायचा हक्क आहे. तुम्हाला गरज आहे ती निग्रहाची, समर्पणाची आणि चिकाटीची. या गुणांमुळे तुम्ही सर्व परीक्षा आणि इतर प्रयत्नांमधे यशस्वी व्हाल. तुम्हाला जे जे काही करायचे आहे, त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. अनेक आशिर्वाद.”

पाहिलेत, मुद्दा सांगण्याची एखाद्या वैज्ञानिकाची पद्धत कशी असते? जे सांगायला मला अर्धा तास लागतो, तेच ते तीन मिनिटात सांगतात. हीच तर विज्ञानाची शक्ती आहे आणि हीच वैज्ञानिकमनाची शक्ती आहे. देशभरातील मुलांना प्रेरणा दिल्याबद्दल मी राव साहेबांचा मी खूप आभारी आहे. दृढता, निष्ठा, तप याबद्दल ते बोलले. dedication, determination, diligence याबद्दल ते बोलले. ठामपणे उभे रहा मित्रांनो ठाम रहा. जर तुम्ही ठामपणाने उभे राहिलात तर, भितीलाही भिती वाटेल. आणि तुमच्या हातून सत्कृत्य व्हावे यासाठी सोनेरी भविष्यकाळ तुमची प्रतिक्षा करेल.

रूचिका डाबस यांनी माझ्या ॲपवर संदेश पाठवला आहे. परीक्षेबद्दलचा त्यांचा अनुभव रुचिका यांनी सांगितला आहे. त्या म्हणतात की, परीक्षेच्या काळात घरामध्ये सकारात्मक वातावरण असावे, याकडे त्यांचे कुटुंबिय लक्ष देतात, अशीच चर्चा, असेच वातावरण शेजारच्या घरांमध्येही असते. सर्वत्र सकारात्मकता. आणि हे खरे आहे, सचिनजींनीही सांगितले, सकारात्मक दृष्टीकोन, मनाची सकारात्मक अवस्था यातून निर्माण होते, सकारात्मक ऊर्जा.

आपल्याला प्रेरणा देतील अशा खूप गोष्टी कधी कधी घडतात. असा विचार करु नका की प्रेरणा फक्त विद्यार्थ्यांनाच मिळते. जगण्याच्या कोणत्याही क्षणी, आयुष्याच्या कोणत्याही वळणावर, उत्तम उदारणे, सत्य घटना फार मोठी प्रेरणा आपल्यालाही देतात, मोठं सामर्थ्य देतात आणि संकटाच्या वेळी याच प्रेरणेच्या बळावर नवा मार्ग सापडू शकतो.

वीजेच्या दिव्याचे जनक थॉमस अल्वा एडीसन यांच्याबद्दलची माहिती अभ्यासक्रमात आपण वाचतो. पण मित्रांनो, कधी याचा विचार केलात का, की ह्या शोधासाठी किती वर्ष त्यांनी घालवली? अनेकदा अपयश सोसावे लागले, वेळ गेला, पैसेही खूप खर्च झाले. यश न मिळाल्याने किती उद्विग्न झाले असतील ते? पण त्यांनी जन्माला घातलेला तो वीजेचा दिवा आज आपल्या सगळ्यांचे आयुष्य प्रकाशमान करणारा ठरला. म्हणूनच तर म्हणतात अपयशाच्या पोटात यशाच्या शक्ता दडलेल्या असतात.

श्रीनिवास रामानुजन हे नाव सर्वांना ठाऊक आहे. आधुनिक काळातील महान गणिततज्ञांमधले एक, भारतीय गणिततज्ञ.

गणित या विषयाचे काही विशेष शिक्षण त्यांनी घेतले नव्हते, तरीही गणितीय वर्गीकरण, अंकसिद्धांत यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये रामानुजन यांनी मोलाची भर घातली. अत्यंत हलाखीचं, कष्टप्रद जीवन त्यांच्या वाट्याला आले, तरीही या जगासाठी महान देणगी ते देऊन गेले.

कुणालाही, कधीही यश मिळू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे जे. के. रॉलिंग. हॅरी पॉटर ही त्यांची मालिका जगभर लोकप्रिय झाली. पण सुरुवातीचा काळ वेगळा होता, अनेक संकटांचा सामना त्यांना करावा लागला, अनेकदा निराशा वाट्याला आली. मात्र अशा परिस्थितीतही चिकाटीने त्यांची सारी शक्ती त्यांनी कामाला लावली, असे जे. के. रॉलिंग यांनी स्वत: सांगितले होते, हीच शक्ती त्यांच्यासाठी महत्त्वाची होती.

आजच्या काळात परिक्षा ही फक्त विद्यार्थ्यांची नसते, सगळ्या कुटुंबाची, शाळेची, शिक्षकांची असते. पण पालक आणि शिक्षक यांचा पाठिंबा नसलेला विद्यार्थी असणे काही चांगले नाही. शिक्षक असोत, पालक असोत, वरच्या वर्गातले विद्यार्थी असोत, या सगळ्यांनी एकत्र येऊन, समान विचाराने विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला तर विद्यार्थ्यांना परीक्षेची भिती वाटणार नाही.

श्रीमान केशव वैष्णव यांनी माझ्या ॲपवर लिहिले आहे. अधिक गुण मिळवावे असा दबाव पालकांनी मुलांवर टाकू नये असे त्यांचे मत आहे. फक्त अभ्यासाच्या तयारीसाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मुले चिंतामुक्त कशी राहतील, याची काळजी पालकांनी घ्यायला पाहिजे.

आपल्या अपेक्षांचे ओझे पालकांनी मुलांवर लादू नये असे मत मांडले आहे विजय जिंदल यांनी. जेवढे शक्य असेल, तेवढे मुलांना प्रोत्साहन द्यावे, त्यांचा विश्वास टिकून राहील, यासाठी मदत करावी. जिंदल यांचा मुद्दा बरोबर आहे. मी आज पालकांना जास्त काही नाही सांगणार. कृपया, तुमच्या मुलांवर दबाव टाकू नका, तो त्याच्या मित्राशी बोलत असेल तर त्याला अडवू नका. एक हसतंखेळतं, सकारात्मक वातावरण तयार करा. आणि मग बघा, तुमचा मुलगा, तुमची मुलगी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जातील. हा आत्मविश्वास तुम्हालाही जाणवेल.

मित्रहो, एक मात्र निश्चित आहे, विशेषत: माझ्या तरुण मित्रांना मी सांगू इच्छितो. आपल्या आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत आपल्या जीवनात खूपच बदल झाले आहेत. नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञान, विज्ञान यांची नवनवी रुप क्षणोक्षणी पहायला मिळत आहेत. आणि हे पाहून आपण केवळ दिपून जातो, असे नाही, तर त्या साऱ्याशी हात मिळवायला, आपल्याला आवडते. विज्ञानाच्या वेगाने आपणही प्रगती करावी, असे आपल्याला वाटते. हे मी सांगतोय याचे कारण म्हणजे आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. विज्ञानाचा हा महोत्सव दरवर्षी साऱ्या देशभर आपण साजरा करतो, 28 फेब्रुवारी रोजी. 28 फेब्रुवारी 1928, सर. सी. व्ही. रमन यांनी रमन परिणाम याची घोषणा केली होती. याच शोधासाठी ते नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरले.

आणि त्याचे स्मरण म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून आपण साऱ्या देशभर साजरा करतो. जिज्ञासा ही विज्ञानाची जननी आहे. प्रत्येक मनात वैज्ञानिक विचार रुजावेत, विज्ञानाचे प्रत्येकाला आकर्षण वाटावे, नवीन संशोधनावर प्रत्येक पिढीला लक्ष द्यावे लागते. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या सहभागाशिवाय नवीन संशोधन शक्य नाही. आज राष्ट्रीय विज्ञान दिनी साऱ्या देशभर नवीन संशोधनाला चालना मिळाली पाहिजे.

ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या गोष्टी आमच्या विकास यात्रेचा सहज भाग व्हायला हव्यात आणि यावेळच्या राष्ट्रय विज्ञान दिनाची संकल्पना आहे, “मेक इन इंडिया सायन्स अँड टेक्नॉलॉजी ड्रिव्हन इनोव्हेशन्स.” मी सर सी.व्ही. रमन यांना प्रणाम करतो आणि आपण सर्वांनी विज्ञानाच्या क्षेत्रात अधिक रस घ्यावा असे आवर्जून सांगतो.

मित्रहो, कधी कधी यश मिळण्यासाठी फार वेळ लागतो. आणि जेव्हा यश मिळते तेव्हा जगाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनही बदलतो. तुम्ही परीक्षेच्या तयारीत मग्न असाल, कदाचित काही बातम्या तुमच्यापर्यंत पोहचल्या नसतील किंवा तुम्ही त्याकडे लक्ष दिले नसेल. पण देशवासियांना मी ही गोष्ट पुन्हा सांगू इच्छितो. गेल्या काही दिवसात विज्ञान जगतात एक मोठा आणि महत्वाचा शोध लागला आहे हे आपण ऐकले असेल. जगभरातील वैज्ञानिकांनी मेहनत केली, अनेक पिढया आल्या, काही ना काही भर त्यांनी घातली. आणि जवळ जवळ शंभर वर्षानंतर एक यश गवसले. ग्रॅव्हीटेशनल फोर्स, गुरुत्वीय बल, आमच्या वैज्ञानिकांच्या कठोर परिश्रमांमधून त्याचा शोध लागला. हे विज्ञानाचे मोठे यश मानावे लागेल. ज्याचा भविष्यकाळावर परिणाम होणार आहे. गेल्या शतकातील महान शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांच्या सिध्दांताला या शोधामुळे पुष्टी मिळाली. एवढेच नव्हे तर भौतिक शास्त्राच्या क्षेत्रातला हा एक महान शोध ठरला. साऱ्या मानवसमाजाला , साऱ्या विश्वाला लाभदायक ठरेल अशी गोष्ट आहे. या साऱ्या शोध प्रक्रियेत आमच्या देशातील सुपुत्र, आमच्या देशातील कुशल शास्त्रज्ञ यांचाही वाटा होता याचा भारतीय म्हणून आपल्याला विशेष अभिमान आणि आनंद आहे. या साऱ्या शास्त्रज्ञांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचे अभिनंदन करतो. येत्या काळात या नव्या शोधाला आणखी पुढे नेण्यासाठी आमचे शास्त्रज्ञ प्रयत्न करतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या प्रयत्नांचा भारत एक भाग असेल. आणि माझ्या देशवासियांनो नुकताच यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे. या शोधाची पुढची पायरी गाठण्यासाठी लेसर इंटरफेमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑबझर्व्हेटरी म्हणजेच एलआयजीओ भारतात स्थापन करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. जगात या प्रकारची दोन केंद्रे आहेत, तिसरे भारतात राहील. भारताच्या सहभागामुळे या प्रक्रियेला नवी शक्ती, नवी गति मिळेल.

मर्यादित साधनसामुग्रीच्या जोरावर भारत मानव कल्याणाच्या या महान वैज्ञानिक शोधात सक्रीय सहभागी होणार आहे. सर्व शास्त्रज्ञांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. अभिनंदन करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो एक क्रमांक मी आपल्याला सांगतो, तो टिपून घ्या. या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुम्ही उद्यापासून मन की बात ऐकू शकाल. आपल्या मातृभाषेतही ऐकू शकाल. मिस्ड कॉल देण्यासाठी क्रमांक आहे 81908 81908 मी पुन्हा सांगतो 81908 81908. मित्रांनो तुमच्या परीक्षा सुरु होत आहेत, मलाही उद्या परीक्षा दयायची आहे. सव्वाशे कोटी देशवासी माझी परीक्षा घेणार आहेत. ठाऊक आहे ना, उद्या अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. 29 फेब्रुवारी, लिप वर्ष. पण तुम्ही पाहिलं असेल, माझे बोलणे ऐकल्यावर तुम्हाला वाटेले असेल, की माझी तब्येत ठणठणीत आहे, आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. बस, उद्या माझी परीक्षा झाली की परवा तुमची सुरु होईल. आणि आपण सर्व यशस्वी होऊ, तेव्हाच देश यशस्वी होईल. तेव्हा, मित्रहो आपल्याला अनेकानेक शुभेच्छा. यश-अपयश याच्या तणावातून मुक्त होऊन, मुक्त मनाने पुढे जा, ठाम रहा. धन्यवाद.

S.Tupe/M.Desai